कोण आहे नताशा दानिश अली? बाप-लेकीला कार खाली चिरडल्यानंतर का हसली? वकिल म्हणतात ती तर...

Hit and Run Case : भारत असो की पाकिस्तान हिट अँड रन प्रकरणात बड्या बापाच्या मुलांना सुटकेचा मार्ग नेहमीच मोकळा असतो. पाकिस्तानमध्येही हिट अँड रनचा अशीच एक घटना समोर आली आहे. बड्या उद्योगपतीच्या पत्नीने अलिशान कारखाली चार जणांना चिरडलं. यातल्या दोन जणांचा मृत्यू झाला. 

राजीव कासले | Updated: Aug 29, 2024, 07:20 PM IST
कोण आहे नताशा दानिश अली? बाप-लेकीला कार खाली चिरडल्यानंतर का हसली? वकिल म्हणतात ती तर... title=

Hit and Run Case : पाकिस्तानमधला एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आपल्या अलिशान कारने चार जणांना चिरडणारी महिला व्हिडिओत चक्क हसताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून लोकांचा संताप अनावर झाला आहे. हिट अँड रन (Hit and Run) प्रकरणात चारपैकी दोघांचा मृत्यू झालाय. मृत झालेले बाप-लेक असल्याचं समोर आलंय. चार जणांना कारखाली चिरडल्यानंतर ही महिला हसत होती. त्यानंतर तीने धमकीही दिली. व्हिडिओत ही महिला 'माझ्या बापाला तुम्ही ओळखत नाही' असं म्हणताना दिसत आहे. लोकांच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याचा तिला जराही पश्चाताप नाही.

कोण आहे ही महिला?
हिट अँड रन प्रकरणातील या आरोपी महिलेचं नाव आहे नताशा दानिश अली (Natasha Danish Ali). नताशा ही पाकिस्तानी उद्योगपती दानिश इक्बालची पत्नी आहे. 19 ऑगस्टला नताशाने आपल्या अलिशान टोयोटा लँड क्रुझरने (Toyota Land Cruiser) चार जणांना चिरडलं. एक वळणावर नताशाने आपल्या कारने दुचाकी आणि कारसहित अनेक गाड्यांना धडक दिली. यात एका बाप-लेकीचा मृत्यू झाला. तर चार जणं गंभीर जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं हे. यातला एक जखमी व्हेंटिलेटरवर आहे. या प्रकरणी नताशा दानिशला अटक करण्यात आली आहे. 

नताशाचा पती दानिश इक्बाल हा कराचीतला बडा उद्योगपती आहे. गुल अहमद एनर्जी लिमिटेडचा मालक आहे. त्याचबरोबर मेट्रो पॉवर ग्रुपचा अध्यक्षही आहे. दानिश आणि नताशा कराचीतल्या उच्चभ्रू केडीएम स्कीम-I परिसरात राहातात.

मिळालेल्या माहितीनुसार नताशाला दोन लोकांच्या हत्येला कारणीभूत ठरल्याप्रकरणी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. नताशाच्या वकिलांनी मात्र धक्कादायक दावा केला आहे. नताशाची मानसिक स्थिती ठिक नसल्याचं वकिलांचं म्हणणं आहे. त्यामुळे नताशाला जामीन देण्याची मागणी करण्यात आली आहे. ती काय करत याचं तिला भान नसतं असा दावाही नताशाच्या वकिलांनी केलाय. 

काय घडलं होतं?
व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओत अपघात केल्यानंतर महिला कारमधून उतरताना दिसत आहे. महिलेच्या चेहऱ्यावर जराही पश्चाताप दिसत नाही. कारमधून उतरल्यानंतर रस्त्यावर उतरून तीने धिंगाणा घातला. यादरम्यान ती हसतानाही दिसत आहे. कराची पोलिसांनी या महिलेला अटक केली आहे. पण सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर जगभरातून संतापची लाट उमटली असून या महिलेवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.