सहा वर्षांचा चिमुरडा रुग्णालयात आपल्याला नवं ह्रदय मिळणार असल्याचं सर्वांना ओरडून सांगत असल्याचा ह्रदयस्पर्शी व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एक्सवर ओहिओ रुग्णालयाने शेअर केलेला व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हीदेखील भावूक व्हाल. जॉन हेन्री असं या चिमुरड्याच नाव असून त्याला हायपोप्लास्टिक लेफ्ट हार्ट सिंड्रोम किंवा HLHS हा दुर्मिळ आजार आहे. जॉन हेन्री गेल्या सहा महिन्यांपासून ह्रदय प्रत्यारोपणासाठी वाट पाहत होता. अखेर जेव्हा त्याला डोनर आणि नवं ह्रदय मिळाल्याचं समजलं तेव्हा त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. आपला हा आनंद त्याने Cleveland Clinic Children रुग्णालयातील मित्रांसह शेअर केला.
हा व्हिडीओ शेअर करताना रुग्णालयाने पोस्टमध्ये लिहिलं आहे की, "मला नवीन ह्रदय मिळत आहे! सहा वर्षाच्या जॉन हेन्रीला जेव्हा आपल्याला डोनरकडून ह्रदय मिळत असल्याचं समजलं तो दिवस आम्ही विसरु शकत नाही. जॉन हेन्री आणि त्याचं कुटुंब ही बातमी मिळण्याआधी सहा महिने ह्रदय प्रत्यारोपणासाठी वाट पाहत होतं".
क्लीव्हलँड क्लिनिक चिल्ड्रन्सने दिलेल्या माहितीनुसार, गर्भधारणेदरम्यान जेव्हा हृदयाची डावी बाजू अपेक्षेप्रमाणे तयार होत नाही तेव्हा HLHS उद्भवते. या स्थितीत हृदयातून होणाऱ्या रक्तप्रवाहावर परिणाम होतो. यामुळे हृदयाच्या उजव्या बाजूला फुफ्फुसात आणि शरीराच्या उर्वरित भागात रक्त पंप करावे लागते, ज्यामुळे हृदयाची उजव्या बाजूवर जास्त जोर पडतो.
“I’m getting a new heart!”
We won’t forget the day 6-year-old John-Henry learned a donor heart was available for him.
John-Henry had been waiting for a life-saving heart transplant for six months before he and his family received the news.
More: https://t.co/9ZdE0oBeHb pic.twitter.com/YjeAWGAbal— Cleveland Clinic Children’s (@CleClinicKids) August 27, 2024
सहा वर्षांच्या चिमुरड्याला दुर्मिळ स्थितीवर उपचार करण्यासाठी अनेक शस्त्रक्रियांची आवश्यकता होती. पण जेव्हा ह्रदय नीट काम करत नसल्याचं लक्षात आलं तेव्हा डॉक्टरांनी ह्रदय प्रत्यारोपण हा एकमेव पर्याय असल्याचं सांगितलं. जॉन हेन्रीला डिसेंबर 2023 मध्ये प्रत्यारोपणाच्या प्रतिक्षा यादीत ठेवण्यात आलं होतं. मे 2024 मध्ये, त्याला आणि त्याच्या कुटुंबाला हवं असलेलं ह्रदय उपलब्ध असल्याचं समजलं.
सहा वर्षीय चिमुरड्याची आई सारा लीने आपण जेव्हा मुलाला ही बातमी सांगितली तेव्हा त्याची काय प्रतिक्रिया होती याची माहिती दिली. "मी रुममध्ये गेले तेव्हा डोळे पाण्याने भरलेले होते. मी जेव्हा त्याला सांगितलं, तेव्हा मला हे सगळ्यांना सांगायचं आहे असं म्हणाला".
आपल्या मुलामुळे अवयवदान वाढावं आणि जनजागृती व्हावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. "अवयवदानामुळे माझ्या मुलाचा जीव वाचला. त्याशिवाय तो जगूच शकत नव्हता. आम्ही त्याच्या ह्रदयाची विशेष काळजी घेणार आहोत. आम्ही डोनरचे आयुष्यभर आभारी असू".