कराची : पाकिस्तानच्या इतिहासात प्रथमच एक हिंदू महिला राष्ट्रीय सिनेटवर निवडून आलीय. कृष्णकुमारी कोहली असं या सिनेट सदस्येचं नाव असून त्या ३९ वर्षाच्या आहेत.
पाकिस्तानच्या दिवंगत पंतप्रधान बेनझिर भुट्टो यांच्या पाकिस्तान पीपल्स पार्टी या पक्षानं त्यांना सिनेटच्या निव़डणूकीत सिंध प्रांतातून तिकीट दिलं. राष्ट्राच्या जन्मापासून इस्लामी राष्ट्र म्हणून मान्यता असलेल्या पाकिस्तानमध्ये हिंदू अल्पसंख्यांक आहेत. त्यातही त्यांना सिनेटवर प्रतिनिधीत्व मिळण्याची ही गेल्या सात दशकातली पहिलीच वेळ आहे.
कोहली पाकिस्तानातल्या अल्पसंख्यांक विशेषतः हिंदूंच्या आणि समाजातल्या सर्वात खालच्या स्तरावर असणाऱ्यांच्या समस्यांना वाचा फोडण्याचं काम करतात. त्यांनी स्वतः लहानपणी हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराची झळ सोसलीय. पाकिस्तानच्या सिंध प्रांतात मोठ्या संख्येनं हिंदू जनता आहे.
सरकारच्या अल्पसंख्यांक जनतेविषयीच्या दुजाभावामुळे अनेकदा त्यांच्या समस्यांवर तोडगा तर दूरच चर्चाही होत नाही. कृष्णाकुमारी कोहलींच्या रुपानं आता हा आवाज पाकिस्तानात सर्वोच्च स्तरापर्यंत पोहचेल अशी आशा करायला हरकत नाही.