Pakistan Economic Crisis: आर्थिक संकटामुळे पाकिस्तानचे तुकडे होणार? इम्रान खान यांनी व्यक्त केली भीती

Pakistan may split into parts: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये पाकिस्तानच्या भवितव्याबद्दलची ही शंका उपस्थित केली आहे.

Updated: Feb 16, 2023, 09:39 PM IST
Pakistan Economic Crisis: आर्थिक संकटामुळे पाकिस्तानचे तुकडे होणार? इम्रान खान यांनी व्यक्त केली भीती title=
pakistan economic crisis

Pakistan Split in Parts: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान तहरीक इन्साफ पार्टीचे (पीटीआय) सर्वेसर्वा इम्रान खान (Imran Khan) यांनी पाकिस्तानचे तुकडे होतील अशी भीती व्यक्त केली आहे. इम्रान यांनी गुरुवारी एका रेडिओ इंटरव्ह्यूमध्ये देशाच्या विभाजनासंदर्भातील भिती व्यक्त करताना, "पाकिस्तानची वाटचाल अशा दिशेने सुरु आहे की परिस्थिती सर्वांच्या हाताबाहेर जाईल. जेव्हा आर्थिक संकट आलं तेव्हा जागतिक महासत्ता असलेला सोव्हिएत यूनियनही तुटला होता," असं विधान केलं आहे. पाकिस्तानमध्ये सध्या मोठं आर्थिक संकट आलं असून जागतिक नाणेनिधीकडूनही पाकिस्तानला कर्ज मिळत नसल्याने दैनंदिन वापराच्या वस्तूंच्या किंमतही गगनाला भिडल्या आहेत.

कट रचून मला हटवलं

याचप्रमाणे माजी पंतप्रधानांनी आपल्याला पदावरुन हटवण्यामागे अमेरिकेतील डोनाल्ड लू आणि पाकिस्तानी सेनेचे माजी प्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांचा हात होता असाही आरोप केला आहे. या दोघांनी कट रचून आपल्याला पदावरुन बाजूला केल्याचं इम्रान खान यांनी म्हटलं आहे. डोनाल्ड लू हे अमेरिकन सरकारमध्ये दक्षिण आणि मध्य आशियामधील देशांसंदर्भातील विभागाचे उप-सचिव आहेत.

बाजवा कसं ठरवू शकतात की...

इम्रान यांनी या पॉडकास्ट इंटरव्ह्यूमध्ये, "डोनाल्ड लू यांनी असं म्हटलं होतं की इम्रान खान यांना हटवण्यात आलं नाही तर पाकिस्तानसाठी येणारा काळ फार चांगला नसेल आणि त्याचा परिणाम देशाला भोगावा लागेल. जनरल बाजवाने माझ्याविरोधात कॅम्पेन करण्यासाठी हुसैन हक्कानी ला नियुक्त केलं होतं. बाजवा यांच्या सांगण्यावरुनच ही धमकी देण्यात आली," असा दावा केला आहे. इम्रान खान यांनी तत्काली सेनाप्रमुखांच्या भूमिकेसंदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. "बाजवा कसं काय ठरवू शकतात की देशाचे पंतप्रधान हे देशासाठी चांगले आहेत की वाईट?" असा प्रश्न इम्रान खान यांनी विचारला आहे.

मला ब्लॅकमेल करण्यासाठी पत्नीचं नाव वापरलं

इम्रान खान यांनी जनरल बाजवा ब्लॅकमेल केल्याचे आरोप केले आहेत. पीटीआयचे प्रमुख नेते असलेल्या इम्रान यांनी, "बाजवाने बुशरा बेगम यांची (इम्रान खान यांची पत्नी) टेप एडीट करुन रिलीज केली. बाजवा यांनी मला ब्लॅकमेल करण्यासाठी हे कृत्य केलं," असं म्हटलं आहे.

शहबाज यांना टोला...

विद्यमान पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावर टीका करताना, "शहबाज शरीफ यांच्याविरोधात 16 अब्ज रुपयांच्या भ्रष्टाचाराचे खटले आहेत. या प्रकरणातील 4 साक्षीदारांचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला आहे. या प्रकरणातील तपास अधिकारीही मरण पावला आहे," असं इम्रान यांनी म्हटलं. यामधून त्यांनी यामागे काही काळंबेरं तर नाही ना अशी शंका उपस्थित केली आहे. 

तुर्कीवरुनही टोला...

इम्रान यांनी शहबाज यांच्या प्रस्तावित तुर्की दौऱ्याच्या मुद्द्यावरुन टोला लगावला आहे. "शहबाज शरीफ यांच्याबरोबर तुर्कीने जे काही केलं... विचार केला तर ते तुर्कीला वाचवण्यासाठी जाणार होते. मात्र तुर्कीने त्यांना नकार दिला. दुसरीकडे कतारसारख्या छोट्या देशाला मात्र त्यांनी परवानगी दिली," असा शाब्दिक चिमटा इम्रान खान यांनी काढला.

तुर्कीमधील भीषण भूकंपानंतर आम्ही सोबत आहोत हे दर्शवण्यासाठी शहबाज शरीफ 8 फेब्रुवारी रोजी तुर्कीला जाणार होते. मात्र तुर्कीच्या राष्ट्रध्यक्षांनी या दौरा पुढे ढकलण्यास सांगितल्याने दौरा स्थगित करण्यात आला.

...तर पाकिस्तानचे तीन तुकडे

आता इम्रान यांनी आर्थिक संकटाचा दाखला दिला असला तरी यापूर्वीही त्यांनी देशाचे तुकडे होतील असं विधान केलं होतं. इम्रान यांनी मागील वर्षीही एका मुलाखतीमध्ये पाकिस्तान अण्विक हत्यारं असल्याची क्षमता गमावली तर देशाचे तीन तुकडे होतील असं विधान केलं होतं. योग्य निर्णय न घेतल्यास पाकिस्तानची वाटचाल सुसाईडच्या दिशेने आहे असं म्हटलं होतं.