फुकट बर्गर न दिल्याने पाकिस्तानी पोलिसांनी हॉटेलच्या कर्मचाऱ्यांना घेतलं ताब्यात

 पाकिस्तानी पोलिसांचा अजब गजब कारनामा समोर आला आहे. 

Updated: Jun 14, 2021, 11:31 PM IST
फुकट बर्गर न दिल्याने पाकिस्तानी पोलिसांनी हॉटेलच्या कर्मचाऱ्यांना घेतलं ताब्यात title=

मुंबई : पाकिस्तानी पोलिसांचा अजब गजब कारनामा समोर आला आहे. काही पोलीस अधिकाऱ्यांनी फुकटात बर्गर न दिल्याने हॉटेलच्या 19 कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतलं आहे. हॉटेल कर्मचाऱ्यांनी फुकटात बर्गर देण्यास नकार दिला. त्यामुळे पोलिसांनी हॉटेल कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतलं. जॉनी अॅन्ड जुग्नून या लाहोर स्थित हॉटेलमधील कर्मचाऱ्यांसोबत हा प्रकार घडला. (Pakistani police detainde hotel staff for not providing free burgers) 

या सर्व कर्मचाऱ्यांना शनिवारी एकूण 7 तास ताब्यात ठेवण्यात आले. या कर्मचाऱ्यांना पोलिसांनी उपस्थित ग्राहकांना खाद्यपदार्थ न देता ताब्यात घेतलं. याबाबतीत या हॉटेलकडून एक पत्रक जारी करुन बाजू मांडण्यात आली आहे. या पत्रकानुसार,"आमच्या हॉटेल स्टाफसोबत हे सर्व घडण्याची ही काही पहिली वेळ नाही. पण ही वेळ अखेरची असेल, अशी आम्ही आशा व्यक्त करतो."  या सर्व प्रकारावरुन पाकिस्तान पोलिसांवर सोशल माीडियावरुन टीका करण्यात येत आहे.  

9 पोलिस कर्मचाऱ्यांचं निलंबन  

हॉटेल कर्मचाऱ्यांनुसार, "पोलिसांनी आमच्या कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतलं, त्यापैकी बहुतांश हे  महाविद्यालयीन विद्यार्थी होते." या सर्व प्रकारानंतर तिथे जमलेल्या जमावाने आरडाओरड केली. यावर वरिष्ठ पोलीस अधिकारी इनाम घानी यांनी ट्विट केलं. "कोणालाही कायदा हातात घेण्याची गरज नाही", असं ट्विट त्यांनी केलं.  9 आरोपी पोलिसांवर निलंबनाची कारवाई केली आहे. दरम्यान पोलिसांबाबत अशी घटना घडण्याची ही काही पहिली वेळ नाही.