थायलंड गुंफा रेस्क्यू ऑपरेशनचं 'भारतीय' कनेक्शन

कंपनीनं भारत, थायलंड आणि ब्रिटनहून आपल्या तज्ज्ञांच्या टीमला घटनास्थळी धाडलं होतं

Updated: Jul 11, 2018, 01:28 PM IST
थायलंड गुंफा रेस्क्यू ऑपरेशनचं 'भारतीय' कनेक्शन

पुणे : थायलंड गुंफा रेस्क्यू ऑपरेशनचा थरार तुम्ही पाहिलाच असेल... पण, या रेस्क्यू ऑपरेशनचं भारतीय कनेक्शन तुम्हाला ठावूक आहे का? पुणे मुख्यालय असणारी प्रसिद्ध 'किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेड'च्या (KBL) तज्ज्ञांनी थायलंडमध्ये गुंफेत फसलेल्या फुटबॉल टीमच्या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. या रेस्क्यू टीमला आवश्यक असणारा सगळा टेक्निकल सपोर्ट किर्लोस्करच्या तज्ज्ञांचा होता, याचा उल्लेख करावाच लागेल. कंपनीनं मंगळवारी एका प्रचारपत्रकाद्वारे ही माहिती दिली. 

थायलंड स्थित भारतीय दूतावासानं थाई अधिकाऱ्यांना रेस्क्यू ऑपरेशनमध्ये KBL च्या तज्ज्ञांची मदत आवश्यक असल्याचं कळवलं होतं. त्यानंतर कंपनीनं भारत, थायलंड आणि ब्रिटनहून आपल्या तज्ज्ञांच्या टीमला घटनास्थळी धाडलं होतं. 

कंपनीच्या माहितीनुसार, पाणी रिकामं करण्यासाठी KBL चा अनुभव यासाठी गाठिशी होताच. ५ जुलैपासूनच कंपनीची एक टीम लुआंग स्थित गुंफेजवळ होती. रेस्क्यू ऑपरेशन दरम्यान गुंफेत पाणी कमी करण्यासाठी तांत्रिक मदतीची गरज होती... यासाठी कंपनीनं आपले उच्च क्षमतेचे चार डिवॉटरिंग पंप उपलब्ध केले होते. हे डिवॉटरिंग पंप महाराष्ट्रातील किर्लोस्करवाडी प्लान्टहून थायलंडला एअरलिफ्ट करण्यासाठीही तयार ठेवण्यात आले होते. 

थायलंडच्या थाम लुआंग प्रांतात एक अंडर-१६ टीमचे १२ खेळाडू आणि त्यांचा एक कोच २३ जून रोजी मुसळधार पावसानंतर गुंफेत अडकले होते. या मुलांना गुंफेतून बाहेर काढण्यासाठी अनेक देशांनी मदत केली. सर्वात अगोदर चार मुलांना बाहेर काढण्यात आलं. त्यानंतर आणखी चार मुलांना आणि सरतेशेवटी मंगळवारी उरलेल्या चार मुलांना सहीसलामत बाहेर काढण्यात रेस्क्यू टीमला यश मिळालं.