Honduras Prison Riot: अमेरिकी देश होंडुरासच्या (Honduras) एका महिला जेलमध्ये मोठ्या प्रमाणात दंगल आणि जाळपोळ झाली आहे. यामध्ये तब्बल 41 महिला कैद्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. यामधील काहींचा मृत्यू गोळीबारात झाला असून, काहीजणी जिवंत जळाल्या आहेत. मृत्यू झालेल्या सर्व महिला कैद्यांची ओळख पटवली जात आहे. दरम्यान होंडुरासचे अध्यक्ष कॅस्ट्रो (Xiomara Castro) यांनी ही दंगल पूर्वनियोजित होती असा आरोप केला आहे.
रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, सरकारी वकील कार्यालयाच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार होंडुरासची राजधानी तेगुसीगाल्पानपासून जवळपास 20 किमी अंतरावर असणाऱ्या या जेलमध्ये 900 महिला कैदी आहेत. सेंट्रो फेमेनिनो डी एडाप्टेसियन सोशल (CFAS) जेलमध्ये हे घडलं असून सध्या मृतदेहांची ओळख पटवण्याचं काम सुरु आहे. दरम्यान होंडुरासच्या अध्यक्षांनी या दंगलीसाठी 'मारा' (Mara) या रस्त्यावरील टोळीला जबाबदार धरलं आहे.
होंडुरासच्या राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जवळपास 26 महिला कैद्यांचा जळून मृत्यू झाला आहे तर इतरांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. जवळपास 7 महिला कैद्यांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. घटनास्थळी फॉरेन्सिक टीम पोहोचली असून मृतदेह बाजूला केले जात आहेत. त्यांनी केलेल्या मोजणीनुसार 41 मृतदेह हाती लागले आहेत.
सरकारने कारागृहाच्या आतील काही व्हिडिओ दाखवले आहेत. यामध्ये दंगलीनंतर अनेक पिस्तूलं आणि चाकूचा ढीग तसंच इतर धारदार शस्त्रं पडून असल्याचं दिसून आलं. अध्यक्ष कॅस्ट्रो यांनी ही दंगल मारा यांचा पूर्वनियोजित कट होता असा आरोप केला आहे. आपण यासंबंधी महत्त्वाचे निर्णय घेणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलं आहे.
प्राथामिक माहितीनुसार, बॅरिओ 18 टोळीशी संबंधित कैद्यांनी सेल ब्लॉकमध्ये घुसून इतर कैद्यांना गोळ्या घातल्या आणि आग लावली. दरम्यान घटनेची माहिती मिळाल्यानंतर जेलबाहेर नातेवाईकांची एकच गर्दी केली आहे.
होंडुसारमध्ये जेलमध्ये अशा दुर्घटनांचा एक इतिहासच आहे. 2019 मध्ये येथे दोन गट भिडले होते. यामध्ये 18 कैद्यांचा मृत्यू झाला होता. तर 2012 मध्ये जेलमध्ये आग लागली होती. यामध्ये 350 कैदी ठार झाले होते.