रशियन लष्कराचं पुतिनविरोधात बंड! रशियाच्या दिशेनं 25 हजार सैनिक निघाले; मॉस्कोत High Alert

Russia Ukraine War Wagner Rebellion: युक्रेन युद्धाला नाट्यमय वळण मिळालं असून रशियाला मोठा धक्का बसणारी माहिती समोर आलीय. खासगी लष्करी तुकडीच्या एका मोठ्या गटाने रशियाविरोधातच बंड पुकारलं असून युक्रेनमधून रशियाच्या दिशेने वाटचाल सुरु केली आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jun 24, 2023, 09:43 AM IST
रशियन लष्कराचं पुतिनविरोधात बंड! रशियाच्या दिशेनं 25 हजार सैनिक निघाले; मॉस्कोत High Alert title=
'वॅगनर ग्रुप'चे सैनिक युक्रेनमधून रशियात शिरले

Wagner Group Vs Russia: दीड वर्षांहून अधिक काळापासून सुरु असलेल्या युक्रेन युद्धाला (Russia Ukraine War) नाट्यमय वळण मिळालं आहे. काल रात्रीपासून राशियामध्ये नाट्यमय घडामोडी घडण्यास सुरुवात झाली असून रशियाच्या राजधानीमध्ये म्हणजेच मॉस्कोमध्ये व्लादिमीर पुतीन सरकारने अलर्ट जारी केला आहे. अंतर्गत कलहामुळे राशियाने पैशांच्या मोबदल्यात सेवा घेतलेल्या लष्कराच्या 'वॅगनर ग्रुप'चा प्रमुख येवगेनी प्रोगोझिन याने शसस्त्र बंड पुकारण्याचं आव्हान केल्याचा आरोप केला जात आहे. प्रोगोझिनने शनिवारी केलेल्या एका घोषणेमध्ये 'वॅगनर ग्रुप'चे सैनिक युक्रेनमधून रशियात शिरले असून आता पुढे वाटचाल करत आहेत असं सांगितलं. तसेच रशियन लष्कराविरोधात आपण कोणत्याही थराला जाऊन लढण्यास तयार आहोत असंही प्रोगोझिनने म्हटलं आहे. 'वॅगनर ग्रुप'ने रशियाची राजधानी असलेल्या मॉस्कोकडे वाटचाल सुरु केली आहे. मॉस्को सध्या हाय अलर्टवर आहे. दरम्यान 'वॅगनर ग्रुप'ने शनिवारी सकाळी रशियातील रोस्तोव शहरावर ताबा मिळवला आहे.

प्रोगोझिनला रोखण्यासाठी हलचाली

टास (TASS) या वृत्तसंस्थेनं या विद्रोहासंदर्भातील वृत्त दिलं आहे. येवगेनी प्रोगोझिन आणि अन्य लष्करी अधिकाऱ्यांमध्ये मागील बऱ्याच काळापासून सुरु असलेला अंतर्गत कलह शिगेला पोहोचला आहे. रशियामधील एफएसबी सुरक्षादलाने प्रोगोझिनविरोधातील एक प्रकरण पुन्हा चौकशीसाठी हाती घेतल्याने वाद निर्माण झाला आहे. प्रोगोझिनची खासगी लष्करी कंपनी 'वॅगनर' ही रशियाच्या आदेशाकडे दुर्लक्ष करत आहे असा रशियाचा आरोप आहे. आता प्रोगोझिनला ताब्यात घेण्यासाठी 'वॅगनर'मधील सैनिकांनी आम्हाला मदत करावी असं आवाहनही रशियाकडून करण्यात आलं आहे. रशियाचं सत्ता केंद्र असलेल्या क्रेमलिन म्हणजेच रशियन सरकारने प्रिगोझिनविरोधात शसस्त्र आंदोलनाचं आवाहन केल्याचा ठपका ठेवल्यानंतर लगेचच त्याला ताब्यात घेण्यासंदर्भातील प्रयत्न सुरु केले आहेत. 

मरायलाही तयार राहा

येवगेनी प्रोगोझिनने आता 'वॅगनर ग्रुप'मधील 25 सैनिकांना थेट मरणासाठीही तयार राहा असं आवाहन करत मॉस्कोच्या दिशेने वाटचाल सुरु केली आहे.  'सीबीसी'ने दिलेल्या वृत्तानुसार सोशल मीडियावर अनेकदा 'वॅगनर' या खासगी लष्करी तुकडचे प्रमुख असलेल्या प्रोगोझिनला मर्यादित कारवाईचा आरोप करत हेटाळलं जात होतं. मागील अनेक महिन्यांपासून संरक्षणमंत्री सर्गेई शोइगु आणि रशियन लष्कराचे मुख्य जनरल वालेरी गेरासिमोव यांनी 'वॅगनर ग्रुप' सक्षम नसल्याचा ठपका ठेवत त्यांना दारुगोळा देण्यास नकार दिल्याचे आरोप केले जात आहेत.

पाठीत खंजीर खुपसला

प्रोगोझिननने रशियन लोकांना 'वॅगनर ग्रुप'मध्ये सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे. त्यानंतर 'वॅगनर ग्रुप'चं नेतृत्व करणाऱ्या प्रोगोझिनने थेट रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना आव्हान दिलं. मॉस्कोमधील लष्करी नेतृत्वाला पुतिन यांनी कठोर शिक्षा करावी अशी मागणी प्रोगोझिनने केली. "प्रोगोझिन जे काही करत आहे ते रशियामध्ये शसस्त्र उठावासाठी आवाहन देण्याचं आणि लोकांना सरकारविरुद्ध शस्त्र उठाव करण्यास प्रवृत्त करण्यासारखं आहे. प्रोगोझिनने युक्रेनविरुद्ध लढणाऱ्या रशियन लष्करी सैनिकांच्या पाठीत खंजीर खुपसला आहे," असं रशियाच्या एफएसबीने म्हटलं आहे. 

रशियाने सुरु केले हल्ले

पुतिन यांना प्रोगोझिनच्या कारवाया आणि त्याने दिलेल्या आव्हानाबद्दलची माहिती देण्यात आली आहे. सध्या आवश्यक ती कारवाई करण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. 'वॅगनर'च्या छावण्यांवर सध्या रशियन लष्कराने रॉकेट, हेलीकॉप्टर गन्स आणि तोफांनी हल्ला करण्यात आला आहे. हा संघर्ष अधिक चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.