चिनी सैनिकांनी खिळे लावलेल्या काठ्यांनी केला भारतीय जवानांवर हल्ला

चीनने आधीच हल्ल्याची आखली होती योजना

Updated: Jun 18, 2020, 02:26 PM IST
चिनी सैनिकांनी खिळे लावलेल्या काठ्यांनी केला भारतीय जवानांवर हल्ला

नवी दिल्ली : लडाखमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून भारत आणि चीनमध्ये तणावाची परिस्थिती होती. पण १५ आणि १६ जूनच्या रात्री या तणावाचं एका हिंसक संघर्षात रूपांतर झालं. ज्यामध्ये भारताचे २० सैनिक शहीद झाले. देशातील लोकांच्या मनात संतापाची भावना आहे.

गलवान खोऱ्यात झालेल्या हिंसक संघर्षात गोळीबार झाला नाही. पण आधीच हल्ल्याच्या तयारीत असलेल्या चिनी सैनिकांनी भारतीय जवानांवर खिळे लावलेल्या काठ्यांनी हल्ला केला. चर्चेसाठी आलेल्या भारतीय जवानांवर चीनने हल्ला केला. तारा, दगड आणि खिळे लावलेल्या काठ्यांनी हल्ला केल्याने अनेक भारतीय सैनिकांना गंभीर दुखापत झाली.

6 जून रोजी भारत आणि चीनच्या अधिकाऱ्यांमध्ये चर्चा झाली होती. ज्यामध्ये असे ठरवले गेले होते की, 15 जूननंतर सैन्य मागे जाईल. पण चिनी सैन्य मागे गेले नाही. याबाबत विचारणी करण्यासाठी गेलेल्या भारतीय जवानांवर चिनी सैनिकांनी हल्ला केला. 

बिहार रेजिमेंटचे कमांडिंग ऑफिसर कर्नल संतोष बाबू यांच्या नेतृत्वात चिनी सैन्याला मागे जाण्यासाठी हे एक पथक गेलं होतं. पण चिनी सैनिक आधीच हल्ला करण्याच्या तयारीत होते.