भारताची संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेच्या अस्थायी सदस्यपदी निवड

भारताची आठव्यांदा अस्थायी सदस्यपदी निवड झाली आहे.

Updated: Jun 18, 2020, 08:21 AM IST
भारताची संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेच्या अस्थायी सदस्यपदी निवड title=

नवी दिल्ली : भारत आठव्यांदा संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा (यूएनएससी) अस्थायी सदस्य म्हणून निवडला गेला आहे. 192 मतांपैकी 184 मते भारताला मिळाली. ही माहिती देताना संयुक्त राष्ट्रातील भारताचे प्रतिनिधी टी.एस. त्रिमूर्ती यांनी लिहिले की, सदस्य देशांनी भारताला मोठा पाठिंबा दर्शविला आहे आणि सन 2021-22 साठी UNSC चा अस्थायी सदस्य म्हणून निवडलं आहे. भारताला 192 पैकी 184 देशांनी पाठिंबा दिला आहे.

अस्थायी सदस्य म्हणून निवडून येण्यासाठी भारताला केवळ 128 मतांची आवश्यकता होती. भारताला आधीपासूनच आशा होती की ते बुधवारी सुरक्षा परिषद निवडणूक सहज जिंकू शकतील. संयुक्त राष्ट्रसंघाच्या 2021-22 या कालावधीसाठी भारत अस्थायी सदस्य म्हणून राहिल. भारताला प्रथम 1950 मध्ये अस्थायी सदस्य म्हणून निवडलं गेलं होतं आणि आज आठव्यांदा 2021-22 या कालावधीत आशिया-पॅसिफिक प्रवर्गातून भारताची निवड झाली आहे. ज्यात भारत एकमेव उमेदवार होता.

कोरोना साथीच्या आजारामुळे युएनचे मुख्यालय 15 मार्चपासून बंद होते. आज येथे तीन निवडणुका झाल्या. सर्व सदस्य राष्ट्रांनी संयुक्त राष्ट्र महासभेच्या पुढील अध्यक्षांच्या, संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या पाच अस्थायी देशांच्या आणि संयुक्त राष्ट्रांच्या आर्थिक आणि सामाजिक परिषदेच्या (ECOSOC) सदस्यांच्या निवडणुकीसाठी मतदान केले.भारत संयुक्त राष्ट्राच्या शक्तिशाली 15 सदस्यांच्या सुरक्षा परिषदेत अस्थायी सदस्य म्हणून सामील झाला आहे.

प्रादेशिक आधारावर अस्थायी सदस्याची निवड केली जाते. ज्यामध्ये आफ्रिकन आणि आशियाई देशांसाठी 5 जागा; पूर्व युरोपियन देशांसाठी 1; लॅटिन अमेरिकन आणि कॅरिबियन देशांसाठी 2; आणि पश्चिम युरोपियन आणि अन्य देशांसाठी 2 जागा निश्चित केल्या आहेत.

कौन्सिलवर निवडून येण्यासाठी, उमेदवारांना महासभेत उपस्थित असलेल्या आणि सदस्य असलेल्या देशांच्या मतदानापैकी दोन तृतीयांश बहुमत आवश्यक असते.

संयुक्त राष्ट्रातील भारताचे प्रतिनिधी टी.एस. त्रिमूर्ती यांनी म्हटले की, 'सुरक्षा परिषदेत भारताची उपस्थिती जगातील वसुधैव कुटुंबकमाविषयीची धारणा बळकट करेल.'

याआधी, 1950-1951, 1967-1968, 1972-1973, 1977-1978, 1984-1985, 1991-1992 आणि 2011-2012 मध्ये भारत सुरक्षा परिषदेवर अस्थायी सदस्य म्हणून निवडला गेला होता.