Firing on Donald Trump: अमेरिकेमध्ये एक मोठी घटना घडली आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर त्यांच्याच सुरु असलेल्या रॅलीमध्ये गोळ्या झाडण्यात आल्या आहेत. मुख्य म्हणजे यामध्ये ट्रम्प जखमी झाले आहेत. ते पेनसिल्व्हेनियामध्ये रॅली काढत होते. यावेळी एकामागून एक अनेक गोळीबारीचा आवाज ऐकू आला. या दुर्घटनेचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. या रॅलीच्या व्हिडिओमध्ये डोनाल्ड ट्रम्प गोळ्या झाडल्यानंतर व्यासपीठावर खाली झुकलेले दिसले. यानंतर सीक्रेट सर्व्हिसने त्यांना घेरलं. समोर आलेल्या माहितीनुसार, ट्रम्प यांच्या कानात रक्त दिसत येत आहे. दरम्यान गोळीबार करणाऱ्या शूटरचा मारला गेलाय.
सीक्रेट सर्व्हिसने यासंदर्भात एक निवेदन जाहीर केलं आहे. यावेळी एका निवेदनात म्हटलंय की, ट्रम्प सुरक्षित आहेत आणि त्यांच्या संरक्षणासाठी उपाययोजना लागू करण्यात आल्या आहेत. ट्रम्प मंचावरून खाली आल्यानंतर लगेचच पोलिसांनी रॅली घेण्यात आलेलं मैदान रिकामं केलं. सीक्रेट सर्व्हिसकडून हा गोळीबार म्हणजे खुनाचा प्रयत्न असल्याचा तपास केला जातोय. दरम्यान, एफबीआयची टीमही घटनास्थळी पोहोचली होती.
ही रॅली पेनसिल्व्हेनियाच्या ग्रेटर पिट्सबर्ग भागातील बटलर काउंटीमध्ये आयोजित करण्यात आली होती. यावेळी बटलर काउंटी डिस्ट्रिक्ट ॲटर्नी रिचर्ड गोल्डिंगर यांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित बंदूकधारी व्यक्तीला गोळी मारण्यात आली. यावेली रॅलीत सहभागी झालेल्या एकाचा मृत्यू झाला. आणखी एकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येतेय.
माजी अध्यक्षांच्या रॅलीत जसा गोळीबारीचा आवाज आला तसा ट्रम्प यांनी उजव्या हाताने उजवा कान धरला. दरम्यान हे पाहण्यासाठी त्यांनी हात खाली आणला आणि नंतर व्यासपीठाच्या मागील बाजूला ते गुढघ्यावर बसले. यावेळी क्षणाचाही विलंब न करता सीक्रेट सर्व्हिस एजंट्सनी लगेच त्यांना घेरलं. लगेच मिनिटानंतर ते बाहेर पडले, त्यांची लाल "मेक अमेरिका ग्रेट अगेन" टोपी काढली आणि ते "थांबा, थांबा" असे म्हणत होते. यानंतर सीक्रेट सर्व्हिस एजंट त्यांना कारमध्ये घेऊन निघून गेले.
या घटनेनंतर ट्रम्प यांच्या उजव्या कानावर आणि चेहऱ्यावर रक्ताचे डाग दिसून आले. दरम्यान ट्रम्प यांच्या कानाजवळ रक्त कसं आलं आणि ते कसे जखमी झाले हे अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये. व्हिडिओमध्ये ट्रम्प यांच्या उजव्या कानाला आणि चेहऱ्याच्या उजव्या बाजूला रक्त दिसून येतंय.
अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन डेलावेरमध्ये होते. यावेळी त्यांनी चर्चमधून निघाल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. त्यांनी एक निवेदन जारी करून म्हटलंय की, "मला पेनसिल्व्हेनियामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्या रॅलीत झालेल्या गोळीबाराची माहिती मिळाली आहे. ते सुरक्षित आहेत हे ऐकून मला बंर वाटलं. अमेरिकेत अशा प्रकारच्या हिंसाचाराला जागा नाही एक राष्ट्र म्हणून याचा निषेध केला पाहिजे."