Viral Video: गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय स्तरावर दुबई चर्चेत आली आहे. याचं कारण दुबईत गेल्या काही दिवसांपासून वातावरणात अचानक बदल झाले असून मुसळधार पाऊस आणि वादळाने हजेरी लावली आहे. मुसळधार पावसामुळे दुबईत पूरस्थिती निर्माण झाली आहे. रस्ते, विमानतळं, दुकानं सगळीकडे पाणी साचलं आहे. रस्त्यांवर पाण्यात कित्येक गाड्या अडकून पडल्या असून, विमानसेवाही ठप्प आहे. दुबईत गेल्या 75 वर्षात पहिल्यांदाच इतक्या पावसाची नोंद झाली आहे. हवामान विभागाने हा ऐतिहासिक वातावरण बदल असल्याचं म्हटलं आहे. सोशल मीडियावर सगळीकडे दुबईची स्थिती दर्शवणारे फोटो, व्हिडीओ व्हायरल होत आहेत.
यादरम्यान सोशल मीडियावर दुबईतील आणखी एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत मुसळधार पाऊस आणि वादळादरम्यान आकाशाच रंग बदलून हिरवा होताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. तर काहींनी हे येणाऱ्या वादळाचे संकेत आहेत असं म्हटलं आहे.
Actual footage from the storm in Dubai today.
You can see the sky turn GREEN!!! pic.twitter.com/A9aXgsBnkd
— Steve Bambury (@steve_bambury) April 16, 2024
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओत टाइम लॅप्स क्लिप दिसत आहे. यामध्ये धुक्यात हरवलेलं राखाडी रंगातील आकाश अचानक हिरवं होताना दिसतं. हा बदल वादळाचं सूचक असल्याचं म्हटलं जात आहे. 17 एप्रिल रोजी पोस्ट केलेल्या 23 सेकंदाच्या व्हिडिओला 'दुबईमध्ये आकाश हिरवे झाले! दुबईतील वादळाचे आजचे खरे फुटेज' अशी कॅप्शन देण्यात आली आहे.
सोशल मीडियावर अनेकांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. दरम्यान एका युजरने म्हटलं आहे की, जेव्हा कधी आकाश असं वागतं, याचा अर्थ वादळ येत आहे. “हे सुपरसेल आहे, वादळाचा रंग आहे. मी नैऋत्य युनायटेड स्टेट्सच्या वाळवंटात हे पाहिलं आहे,” असा दावा एका युजरने केला.
Heavy rain in Dubai right now , live footage sky turns green the whole city looks like dusty#Dubai #rain
pic.twitter.com/mzfeYjNuE0— farheenkhan (@farheenkhansam2) April 16, 2024
फॉक्स न्यूजच्या रिपोर्टनुसार, वातावरणाद्वारे प्रकाशाचा प्रसार होत असताना ढगातील थेंब प्रकाशात आल्याने हिरवा रंग होतो. नॅशनल वेदर सर्व्हिस ऑथॉरिटीजचा हवाला देत रिपोर्टमध्ये म्हटलं आहे की, “खूप खोली आणि पाण्याचे प्रमाण असलेल्या वादळाच्या ढगांमधील पाण्याचे/बर्फाचे कण प्रामुख्याने निळा प्रकाश पसरवतात. जेव्हा वातावरणात विखुरलेला लालसर प्रकाश ढगातील निळ्या पाण्याच्या/बर्फाच्या थेंबाला प्रकाशित करतो तेव्हा ते हिरवे होतात”. रिपोर्टमध्ये वादळ निर्मितीचा निळ्या आणि हिरव्या ढगांशी नेमका काय संबंध आहे हे स्पष्ट होत नसल्याचंही सांगण्यात आलं आहे.