बॅग, छुपा कॅमेरा आणि....; आगामी निवडणुकांपूर्वी 'या' बड्या राजकीय नेत्याची खुर्ची धोक्यात?

Dior Bag Scandal: साधारण एखाद्या बॅगेची किंमत जास्तीत जास्त किती असू शकते असं तुम्हाला वाटतं? मुळात एक बॅग कधी कोणाला कितपत धोक्यात टाकू शकते ?   

सायली पाटील | Updated: Jan 25, 2024, 03:07 PM IST
बॅग, छुपा कॅमेरा आणि....; आगामी निवडणुकांपूर्वी 'या' बड्या राजकीय नेत्याची खुर्ची धोक्यात? title=
South Korea Dior Bag Scandal hidden camera controversy Explained

Dior Bag Scandal: राजकारणाच्या पटलावर कोणाचा डाव कधी आणि कोणावर पलटेल याचा काहीच नेम नसतो. सत्ताधाऱ्यांना अडचणीत आणण्यासाठी विरोधक असे कैक डाव रचत असतात. अशाच एका चालीला देशातील मोठी राजकीय व्यक्ती बळी पडली असून, आगामी निवडणुकांमध्ये या व्यक्तीच्या खुर्चीलाच धोका निर्माण झाल्याची परिस्थिती उदभवली आहे. निमित्त काय? निमित्त ठरतेय ती म्हणजे एक लहानशी पर्स. 

जगभरात चर्चा सुरु असणाऱ्या आणि अनेकांच्याच भुवया उंचावणारी ही राजकीय व्यक्ती खुद्द एका राष्ट्राच्या राष्ट्राध्यक्ष पदी विराजमान आहे. ही व्यक्ती म्हणजे दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष यून सुक यिओल. येत्या काळात त्यांच्या या पदावरच संकटांचं सावट असून, यासाठी त्यांची पत्नीच कारणीभूत ठरू शकते. थोडक्यात एप्रिल महिन्यात होऊ घातलेल्या निवडणुकांमध्ये यून आणि त्यांच्या पक्षाला पराभवाचा सामना करावा लागू शकतो. 

हे सारंकाही Christian Dior या लक्झरी ब्रँडच्या एका बॅगेमुळं घडणार आहे. साधारण मागील दोन महिन्यांपासून दक्षिण कोरियामध्ये याच बॅगेची चर्चा सुरु असून, एका छुप्या कॅमेरातून चित्रीत करण्यात आलेल्या व्हिडीओमुळं त्यासंदर्भातील अनेक गोपनीय गोष्टी समोर आल्या आहेत. छुप्या कॅमेरामुळं समोर आलेल्या माहितीनुसार यून यांच्या पत्नी फर्स्ट लेडी किम कियोन एका पास्टरकडून Dior कंपनीची हँडबॅग खरेदी करताना दिसत आहेत. 3 मिलियन वॉन म्हणजेच $2,250 किंवा ₹1,87,026 इतकी या बॅगेची किममत असून, आता यून यांच्याच पक्षाकडून त्यांच्या आणि त्यांच्या पत्नीनं या कृत्यासाठी माफी मागावी अशी मागणी केली आहे. 

व्हिडीओ बरंच काही सांगतोय 

कोरियन- अमेरिकन पास्टर चोई जे-यंगनं गोपनीय पद्धतीनं हा व्हिडीओ तयार केला होता.  Seol News च्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून हा व्हिडीओ समोर आला होता. जिथं, यून यांच्या पत्नी Christian Dior च्या दुकानात जाऊ हँडबॅग खरेदी करून त्यासाठी 3 मिलियन वॉनची पावती दाखवत आहेत. 

हेसुद्धा वाचा : वडिलांची कमाल, मुलं झाली मालामाल; 'या' भारतीय उद्योजकाकडून मुलांना अंबानींहूनही मोठं गिफ्ट

कोरिया हेराल्डच्या माहितीनुसार राष्ट्रपती कार्यालयाकडून किम यांना ही बॅग मिळाल्याचं सांगण्यात आलं. दक्षिण कोरियातील कायद्यानुसार सार्वजनिक स्तरावर सरकारी संस्थांमध्ये विविध पदांवर असणाऱ्या व्यक्ती आणि त्यांच्या जोडीदारांसाठी एकाच वेळी 1 मिलियन कोरियन वॉन ($750) हून जास्त किंमतीची भेटवस्तू घेणं बेकायदेशीर आहे. सार्वजनिक क्षेत्रांमधील व्यक्ती 3 मिलियन वॉनहून जास्त दरांच्या भेटवस्तू घेऊ शकत नाही.

दरम्यान, चोईनं राष्ट्रीय संमेलनामध्ये आपण घडाळ्यात कॅमेरा लपवून हा सर्व प्रकार टीपला, कॅमेराशिवाय हे सारंकाही शक्य नव्हतं असं म्हणत त्यांचा खरा चेहरा समोर आला नसता ही बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. पण, हे सर्वकाही किमला अडकवण्यासाठी केलं जात असल्याचं मत मांडलं जात आहे. पण, राष्ट्रपती कार्यालयाच्या माहितीनुसार किम यांना मिळालेली भेट व्यक्तीगत नसून त्यांना Gift स्वरुपात मिळाली होती. त्यामुळं त्यांनी सरकारचं प्रतिनिधीत्वं करतच त्याचा स्वीकार केल्याचं इथं प्रतीत झालं. आता या साऱ्या वादाचे परिणाम राष्ट्राध्यक्षांच्या पदावर नेमके कसे होतात हे पाहणं महत्त्वाचं असेल.