तेहरान : मेडिकल क्लिनिकमध्ये भीषण स्फोट, १९ जणांचा मृत्यू

इराणच्या उत्तर तेहरानमधील (Tehran) वैद्यकीय क्लिनिकमध्ये झालेल्या भीषण स्फोटात १९ जणांचा मृत्यू झाला आहे.  

Updated: Jul 1, 2020, 09:08 AM IST
तेहरान : मेडिकल क्लिनिकमध्ये भीषण स्फोट, १९ जणांचा मृत्यू

तेहरान : इराणच्या उत्तर तेहरानमधील (Tehran) वैद्यकीय क्लिनिकमध्ये झालेल्या भीषण स्फोटात १९ जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक लोक जखमी झाले आहेत. या आगीचे कारण समजू शकलेले नाही. मात्र, गॅसच्या कॅप्सूलमध्ये स्फोट झाल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

तेहरानच्या अधिकृत सरकारी वाहिनीने या घटनेत १९ लोकांचा मृत्यू झाल्याचे म्हटले आहे. या अपघातात १५ महिला आणि ४ पुरुष ठार झाल्याचे त्यांनी सांगितले. मात्र तेहरानच्या अधिकाऱ्यांने १३ लोकांच्या मृत्यू झाल्याचे स्पष्ट केले आहे. त्याचबरोबर तेहरानच्या नायब राज्यपाल यांनी राज्यातील सरकारी वाहिनीला सांगितले की, गॅस गळतीमुळे हा अपघात झाला आहे.

तेहरान अग्निशमन विभागाचे प्रवक्ते जलाल मालेकी यांनी सांगितले की, स्फोटानंतर पसरलेल्या आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले आहे. याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल होत आहे. ज्यामध्ये अनेक स्फोटानंतर आगीचे रौद्ररुप पाहायला मिळाले आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार आणखी काही स्फोट होऊ शकतात. कारण वैद्यकीय केंद्रात ऑक्सिजनच्या अनेक टाक्या शिल्लक आहेत. स्थानिक अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार या क्लिनिकमध्ये एकूण २५ कर्मचारी काम करतात, ज्यात लहान शस्त्रक्रिया आणि काही आजारांवर उपचार केले जातात.