Temperature Reached -46 Degree Celsius In USA: अमेरिकेतील (USA) न्यू हॅम्पशायरमधील माऊंट वॉशिंग्टनसहीत संपूर्ण परिसरामधील तापमानामध्ये मोठी घट झाली आहे. न्यूयॉर्कसहीत न्यू इंग्लंड म्हणून ओळल्या जाणाऱ्या प्रांतातील मॅसॅच्युसेट्स, कनेक्टिक्ट, रोड आइलॅण्ड, न्यू हॅम्पशायर, वार्मोंट आणि मेन येथे राहणाऱ्या जवळजवळ 1 कोटी 60 लाख लोकांसाठी विंड-चिल वॉर्निंग म्हणजेच तपामानामध्ये घट होण्यासंदर्भातील इशारा जारी केला आहे, असं 'रॉयटर्स' या वृत्तसंस्थेनं दिलेल्या वृत्तामध्ये म्हटलं आहे. नॅशनल वेदर सर्व्हिसने (एनडब्ल्यूएस) मोठ्या प्रमाणात तापमानात घट होण्यासाठी कारणीभूत असलेली ही डीप फ्रीज परिस्थिती कमी वेळासाठी राहणार आहे. मात्र आज दिवसभर या ठिकाणी थंड वारे वाहतील असा इशारा देण्यात आला आहे. न्यू इंग्लंडमधील मॅसॅच्युसेट्समधील दोन सर्वात मोठ्या शहरांमध्ये समावेश होणाऱ्या बोस्टन आणि वॉर्सेस्टरमध्ये शुक्रवारी शाळा बंद ठेवण्यात आल्या.
बोस्टनचे महापौर मिशेल वू यांनी रविवारी आपत्कालीन परिस्थिती घोषणा केली आहे. शहरातील 6 लाख 50 हजार लोकांसाठी मदत करण्यासाठी वॉर्मिंग सेंटर्स सुरु करत असल्याची घोषणा केली. एनडबल्यूएसने दिलेल्या इशारानुसार ही या सध्याच्या पिढीमधील सर्वाधिक थंडी असणार आहे. म्हणजेच ही थंडी वन्स इन जनरेशन प्रकारातील असल्याचं एनडब्ल्यूएसचं म्हणणं आहे. या थंडीमुळे पाण्यावर तरंगणारं एक संग्रहालय बंद करण्यात आलं आहे. 1773 साली झालेल्या बोस्ट टी पार्टीसंदर्भातील हे संग्रहालय बंद करण्यात आलं आहे.
हवामानासंदर्भातील भविष्यवक्ता असलेल्या बॉब ओरेवेक यांनी शुक्रवारी दिलेल्या माहितीनुसार पूर्व कॅनडामधून अमेरिकेच्या बाजूला थंड वारे वाहत आहेत. हे सर्व थंड वारे अमेरिकेतील मैदानी भागांमध्ये असलेल्या प्रांतांच्या दिशेन वाहत आहेत. काबेतोगामा, मिनेसोटा, ओंटारियोच्या सीमांवर दुपारी एक वाजता (ईएसटी) मायनस 39.5 डिग्री सेल्सियस इतकं होतं. हे अमेरिकेतील सर्वात थंड स्थान होतं. एनडब्ल्यूएसचे हवामान वैज्ञानिक असलेल्या ब्रायन हर्ले यांनी थंडी, वादळ दिवसा अमेरिकेच्या पूर्वेकडे सरकत असल्याचं सांगितलं.
ब्रायन हर्ले यांनी दिलेल्या माहितीनुसार माऊंट वॉशिंग्टन स्टेट पार्कमधील सर्वात उंच शिखरावर शुक्रवारी सायंकाळी तापमान मायनस 45 डिग्री सेल्सियसपर्यंत पडलं होतं. कॅनडाच्या सर्वात उत्तरेकडे असलेल्या यूरेका नावाच्या आर्टिक हवामान केंद्रावरील तापमान शुक्रवारी सकाळी मायनस 41 डिग्री सेल्सियस होतं. बोस्टन शुक्रवारी सायंकाळी मायनस 8 डिग्री सेल्सियस इतकं होतं. त्याचप्रमाणे वॉर्सेस्टर, मॅसॅच्युसेट्समध्ये पारा मायनस 16 डिग्री सेल्सियसवर होता.
आज या शहरांमधील तापमान अधिक घसरण्याची शक्यता आहे. बोस्टमधील तापमान मायनस 10 डिग्री सेल्सियसपर्यंत जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 1886 नंतर पहिल्यांदाच या ठिकाणी एवढी थंडी पडली आहे. वॉर्सेस्टरमध्ये शनिवारी तापमान अधिक पडणार असल्याची शक्यता असून येथे 1934 नंतर पहिल्यांदाच एवढी थंडी पडली आहे.