लंडन पुन्हा दहशतवादी हल्ल्याने हादरलं

दुसरीकडे एका रेस्टॉरन्टमध्ये एका व्यक्तीने लोकांवर चाकू हल्ला केल्याने परिसरात खळबऴ माजली आहे. 

Updated: Jun 4, 2017, 09:31 AM IST
लंडन पुन्हा दहशतवादी हल्ल्याने हादरलं  title=

लंडन : लंडन पुन्हा दहशतवादी हल्ल्याने हादरलं आहे. लंडन ब्रीजवरुन चालणाऱ्या पादचाऱ्यांना एका व्हॅन चालकाने उडवले आहे. या घटनेत एकाचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. तर, दुसरीकडे एका रेस्टॉरन्टमध्ये एका व्यक्तीने लोकांवर चाकू हल्ला केल्याने परिसरात खळबऴ माजली आहे. 

लंडन ब्रीजवर एका व्हॅन चालकाने पादचाऱ्यांना चिरडल्याची घटना शनिवारी रात्री साडे दहाच्या सुमारास घडली. व्हॅनच्या चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरु आहे. तसेच, या घटनेच्या पार्श्वभूमीवर लंडन ब्रीजवरील दोन्ही मार्गावरील वाहतूक बंद केली आहे. या भागातील बसचे मार्गही बदलण्यात आले असून लंडनमधील भुयारी रेल्वे स्टेशन्स बंद करण्यात आली आहेत. 

तर, दुसरीकडे लंडन ब्रीजजवळच असलेल्या प्रसिद्ध बॉरो मार्केटमधील एका रेस्टॉरन्टमध्ये असलेल्या लोकांवर एका व्यक्तीने चाकू हल्ला आणि गोळीबार केल्याची घटना सुद्धा याचवेळी घडली. या घटनेतही अनेक जण जखमी झाले आहेत. 

दरम्यान, इंग्लंडच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी या घटनेच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा विभागाच्या अधिकाऱ्यांची आपत्कालीन बैठक बोलाविली असून त्यांनीही हा हल्ला दहशतवादी असल्याची शक्यता नाकारता येत नाही, असे म्हटले आहे. तर, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रॅम्प यांनी सुद्धा या घटनेच्या पार्श्वभूमीवर ट्विट करुन इंग्लंडला मदत करण्याची तयारी दर्शविली आहे.