10 Year Old Girl Travel 50 Countries: जास्तीत जास्त देश फिरावेत, तेथील खाद्य संस्कृती, पर्यटनस्थळं पहावीत अशी भटकंतीची आवड असलेल्या प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते. मात्र इच्छा असणे आणि ही इच्छा प्रत्यक्षात आणण्यामध्ये फार फरक आहे. मात्र एकीकडे जग फिरण्याचं स्वप्न पाहत असतानाच दुसरीकडे त्यासाठी पुरेशा सुट्ट्या मिळत नसल्याची अडचण आपल्यापैकी अनेकांना भेडसावते. मात्र बहुतांश लोकांसाठी आजही स्वप्न असलेली ही जगभ्रमंती सध्या एक 10 वर्षीय मुलगी करत आहे. विशेष म्हणजे ही चिमुकली भारतीय वंशाची आहे.
जगभ्रमंती करत असलेल्या या 10 वर्षीय चिमुकलीचं नाव आहे अदिती त्रिपाठी. अदिती आतापर्यंत संपूर्ण युरोप फिरली आहे. तिने मलेशिया आणि थायलंडसारखे देशही पाहिले आहेत. अदितीचे वडील दिपक आणि आई अविलाशा यांनी आपली मुलगी ही प्रवासातील अनुभवाने समृद्ध झालेली व्यक्ती असावी असं ठरवलं आणि त्यांची भटकंती सुरु झाली. मात्र जगभर फिरुन दुनियादारीचा अनुभव घेताना शालेय शिक्षणही कायम रहावं असा दिपक आणि अविलाशा यांचा प्रयत्न होता. त्यामुळे या तिघांनी तसेच नियोजन केले. त्यामुळे हे तिघे जी सुट्टी मिळेल त्या सुट्टीला भटकंतीला जातात. अगदी बँकांच्या सुट्ट्या असल्या तरी ते भटकंतीसाठी निघतात.
लंडनमधील ग्रीनवीच येथे दिपक, अविलाशा आणि अदिती राहतात. दरवर्षी दिपक आणि अविलाशा त्यांच्या मुलीबरोबर भटकण्यासाठी 20 हजार पौंड म्हणजेच भारतीय चलनानुसार 21 लाख रुपये खर्च करतात. दिपक आणि अविलाशा दोघेही अकाऊटंट म्हणून काम करतात. कमवलेली पै अन् पै ते अदितीला वेगवेगळ्या देशांतील संस्कृती, खाद्य संस्कृती आणि लोकांशी भेट घालून देण्यासाठी वापरतात. "तिने अनेकदा क्रूजवरुनही प्रवास केला आहे. तिला नेपाळ, भारत आणि थायलंडमधील संस्कृती फारच आवडली," असं दिपक सांगतात.
अदिती अवघ्या 3 वर्षांची असताना दिपक आणि अविलाशा या दोघांनी तिला घेऊन भटकंती सुरु केली. त्यांनी आधी जर्मनीचा दौरा केला. त्यावेळेस अदिती आठवड्यातून केवळ अडीच दिवस नर्सरी स्कूलला जायची. "हल्ली आम्ही तिला शुक्रवारी सायंकाळी थेट शाळेतूनच पिकअप करतो आणि रात्री उशीराच्या विमानाने ट्रीपसाठी निघतो. आम्ही थेट रविवारी रात्री 11 वाजता परत येतो," असं दिपक सांगतात.