This City Make Laughting Compulsory By Law: आरोग्यासाठी हसणं किती महत्त्वाचं आहे हे अधोरेखित करण्यासाठी जपानमधील एका शहराने चक्क दिवसभरातून एकदा हसणं अनिवार्य केलं आहे. यासंदर्भातील आदेशच जारी करण्यात आला असून असा आदेश जारी करणाऱ्या शहराचा नाव आहे यामागाटा! जपानमधील या शहरामधील लोकांना दिवसभरातून एकदा हसणं आता बंधनकारक असणार आहे. हृदविकाराचा धोका कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून येथील एका स्थानिक विद्यापिठामध्ये केलेल्या अभ्यास हसण्यामुळे आरोग्यावर कसा सकारात्मक परिणा होतो हे दाखवून देण्यात आल्यानंतर हा नवा नियमवजा कायदा करण्यात आला.
'जर्नल ऑफ एपिडेमीओलॉजी'मध्ये यामागाटा युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसीन टीम या गटाने केलेल्या अभ्यासाच्या जोरावर पाच वर्षांपूर्वी छापलेल्या अहवालाचा आधार हा कायदा तयार करण्यात घेण्यात आला आहे. आरोग्यवर्धक गोष्टींसाठी आणि सदृढ शरीराठी हसणं हे फार फायद्याचं असल्याचं या अहवालामध्ये वैज्ञानिक दृष्टाकोनातून संशोधन करुन दाखवून देण्यात आलं होतं.
नव्या कायदामध्ये, आता यामागातामधील नागरिकांनी, "हसण्यामुळे आरोग्याला होणाऱ्या फायद्यांसंदर्भातील आपलं ज्ञान वाढवण्याची गरज आहे. तसेच आपलं मानसिक आणि शारीरिक आरोग्य टिकून ठेवण्यासाठी दिवसातून किमान एकदा आवर्जून हासण्याच्या माध्यमातून उत्तम आरोग्य राखण्याचा प्रयत्न करावा," असं म्हटलं आहे. तसेच कामाच्या ठिकाणीही, हसतं खेळतं वातावरणं ठेवलं जावं असं कायद्यात नमूद करण्यात आलं आहे. दर महिन्याची आठवी तारीख ही डे फॉर लाफ्टर म्हणजेच हसण्याचा दिवस असणार असून या दिवशी सदर उपक्रम अधिक उत्तम पद्धतीने कसा राबवता येईल यासंदर्भातील नियोजन आणि सल्लामसलत होईल, असं सांगण्यात आलं आहे.
चांगल्या उद्देशाने हा कायदा तयार करण्यात आला असता तरी विरोधी पक्षातील नेत्यांचा याला विरोध आहे. या कायद्यावर टीका करणाऱ्यांनी हसणं अनिवार्य करणं हे मूलभूत हक्कांवर गदा आणणारं आहे, असं म्हटलं आहे. तसेच आरोग्यविषय आणि खासगी कारणांमुळे ज्यांना हसणं शक्य नाही त्यांच्यासाठी हे अन्यायकारक असल्याचा दावा विरोधकांनी केला आहे. तर काहींना हसण्याने आरोग्याला फायदा होत असला तरी ती प्रत्येकाची खासगी निवड असावी. अशापद्धतीने कायदा करुन बळजबरीने एखाद्याला दिवसभरातून एकदा हसावेच लागेल असं सांगणं चुकीचं असल्याचं म्हटलं आहे.
ज्या अभ्यासाचा आधारे हा कायदा करण्यात आला त्यामध्ये 40 हून कमी वयोगटातील 17 हजार 152 लोक सहभागी झाले होते. त्यांनी स्वत:च्या हसण्यासंदर्भातील सवयींची माहिती यात दिली होती. त्यानंतर या व्यक्तींच्या आरोग्याविषय माहिती पुढील काही वर्ष गोळा करण्यात आली. त्यामध्ये आठवड्याभरातून किमान एकदा हसणाऱ्यांना हदयविकाराच्या त्रासाची शक्यता कमी असल्याचं दिसून आलं. महिन्यातून एकदाही न हसणाऱ्यांमध्ये मात्र हृदयविकाराचा प्रमाण अधिक दिसून आलं. यामध्ये मोठ्याने हसणंच ग्राह्य धरण्यात आलं होतं, असंही सांगितलं आहे.