Robot Self Death in south Korea : कामाचा ताण.... फक्त उल्लेख केला तरीही अनेकांकडे या मुद्द्यावर बोलण्या- सांगण्यासारखं बरंच असतं. धकाधकीच्या जीवनशैलीमध्ये कामाचे वाढीव तास, त्यात सातत्यानं होणारे चढ- ऊतार ही सर्व परिस्थिती अनेकदा काहींच्या हाताबाहेर जाते. त्यातूनच शेवटी उद्रेक होऊन जगभरात असंख्य मंडळी अनेकदा टोकाची पावलं उचलताना दिसतात.
जगभरातून कामाच्या किंवा इतर कारणांमुळे येणाऱ्या तत्सम ताणामुळं टोकाचे निर्णय घेणाऱ्यांमध्ये वयवर्ष 15 ते 25 मधील तरुणाईचा समावेश असून, ताणतणाव, नैराश्य आणि अशाच इतर काही कारणांमुळे ही मंडळी या निर्णयापर्यंत पोहोचतात असं म्हटलं जातं. हे सर्व मान्य, पण या दाहक वास्तवापलिकडे जाऊनही 21 व्या शतकात काही अशा घटना घडत आहेत, ज्या संपूर्ण जगासह मानवी संस्कृतीच्या चिंतेत भर पडत आहे.
दक्षिण कोरियातून हादरवणारं वृत्त समोर आलं असून, इथं कथित स्वरुपात एका रोबोटनं पायऱ्यांवरून उडी मारून स्वत:चं आयुष्य संपवलं. या घटनेमुळं तज्ज्ञांनासुद्धा हादरा बसला असून, या प्रकरणी तपास सुरु करण्यात आला आहे.
गुमी सिटी काऊन्सिलनं 26 जून रोजी अधिकृत घोषणा करत त्यांच्याकडे सेवेत असणआऱ्या एका अधिकृत यंत्रमानवानं साधारण साडेसहा फूट उंचीच्या पायऱ्यांवरून उडी मारली आणि त्यानंतर हा यंत्रमान मृतावस्थेत/ निकामी आढळला. माध्यमांच्या वृत्तानुसार रोबोटवरही कामाचा ताण वाढत असून, यामुळंच दक्षिण कोरियामध्ये चक्क एका यंत्रमानवानं हे पाऊल उचलल्याचं सांगितलं जात आहे.
एजेन्स फ्रान्सच्या वृत्तानुसार या घटनेआधी ज्यावेळी एका अधिकाऱ्यानं हा रोबोट पाहिला होता तेव्हा तो एकाच ठिकाणी घिरट्या घालताना दिसला, जणू तिथं काहीतरी आहे. 2023 पासून हा रोबोट सिटी काऊन्सिल ऑफिसर म्हणून सेवेत रुजू असून, लिफ्ट बोलवून अपेक्षित स्थळी ये-जा करु शकत होता.
सर्वसामान्य कर्मचाऱ्यांप्रमाणेच हा रोबोट सकाळी 9 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंतच्या कार्यालयीन वेळेत काम करत होता. त्याच्याकडे त्याचं स्वत:चं रोजगार ओळखपत्रही होतं. गुमी सिटीच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार हा रोबोट मागील काही दिवसांपासून दु:खी होता. यंतमानवालाही भावना असतात, हे सांगणारं हे एक आगळवेगळं उदाहरण असलं तरीही हेच कारण सध्या पुढे येत आहे. हा रोबोट निकामी झाल्यानंतर त्याचे विविध भाग एकत्र करण्यात आले असून, आता त्याचं परिक्षण तज्ज्ञ करत असल्याचं सांगितलं जात आहे.
रुट स्टार्टअप बिअर रोबोटीक्स या अमेरिकेतील रेस्तराँ आणि हॉटेलांमध्ये रोबोट तयार करणाऱ्या कंपनीनं हा कोरियातील या रोबोटची निर्मिती केल्याचं म्हटलं जातं. नगर परिषद अधिकारीपदी नियुक्त होणारा आणि काम करणारा हा पहिलाच रोबोट होता. दर दिवशी फाईल इथून तिथं पोहोचवणं, शहर विकास, माहिती इतरांपर्यंत पोहोचवणं अशा कामांमध्ये या रोबोटची मदत मिळत होती. पण, कामाचा वाढता ताण आणि कामाचे तास या साऱ्यामध्ये हा रोबोट स्वत:लाच संपवून बसला आणि संपूर्ण जगाचीच चिंता वाढली.