Turkey Syria earthquake updates : सोमवारी झालेल्या महा भयंकर भूकंपामध्ये आतापर्यंत तुर्की आणि सीरियातून मृतांची संख्या 11 हजारांच्याही पलिकडे पोहोचली आहे. (Turkey Syria earthquake death toll) यामध्ये एकट्या तुर्कीतून 8500 मृतांचा आकडा समोर आला आहे. सीरियातही परिस्थिती वेगळी नाही. आपल्या माणसांचा शोध घेण्याचं काम अद्यापही सुरु आहे, तर इमारतींच्या ढिगाऱ्यांकडून अद्यापही माणसांना काढण्याचं काम सुरुच आहे. सध्याच्या घडीला तुर्कीमधील परिस्थिती इतकी बिकट आहे, की या संकटात गंभीर जखमी असणाऱ्या आणि जीव वाचलेल्या नागरिकांना प्रथमोपचार मिळणंही कठीण झालं आहे.
तुर्की आणि सीरियामध्ये मृतांचा आकडा सातत्यानं वाढत आहे, तर जखमी असणाऱ्यांच्या संख्येतही वाढ होताना दिसत आहे. असं असतानाच देशाची आरोग्य यंत्रणा पूर्णपणे कोलमडली आहे. ज्यामुळं भारतासह इतरही राष्ट्रांनी तुर्की आणि सीरियाच्या भूकंप प्रभावित क्षेत्रांमध्ये मदत पोहोचवण्यास सुरुवात केली आहे.
तुर्कीमध्ये मोठमोठ्या इमारती कोसळल्या आणि या भूकंपानं अनेकांनाच गिळंकृत केलं. परिणामी मोठ्या संख्येनं नागरिक ढिगाऱ्याखाली दबले गेले. यातून काहींचं नशीब बलवत्तर म्हणून त्यांची सुटका झाली. पण, काहीजण मात्र अद्यापही मदतीच्या प्रतिक्षेत आहेत. काहींनी ढिगाऱ्याखालीच अखेरचा श्वास घेतला आहे. ज्यामुळं आता ढिगाऱ्याखाली असणारे मृतदेह कुजून या भागात रोगराई पसरण्यास सुरुवात होईल अशी भीतीही व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, तुर्कीमध्ये आलेल्या या प्रचंड तीव्रतेच्या भूकंपामध्ये मृतांचा आकडा वाढत असतानाच आणखी एक हादरवणारी माहिती समोर आली आहे. या आपत्तीमध्ये 10 भारतीय अडकले असून एकजण बेपत्ता असल्याची प्राथमिक माहिती केंद्र सरकारकडून देण्यात आली आहे. सदरील व्यक्तींच्या कुटुंबाला याबद्दल सतर्क करण्यात आलं आहे. बेपत्ता व्यक्ती एक भारतीय व्यावसायिक असून, ते एका बैठकीसाठी तुर्कीला गेले होते.
आपल्या देशावर आलेलं मोठं संकट पाहता तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष तय्यीप एद्रोगन यांनी नागरिकांना धीर दिला. तुर्कीतील सर्व नागरिकांना योग्य निवाऱ्याच्या सुविधा देणार असून, कुणालाहा वाऱ्यावर सोडणार नसल्याचं ते म्हणाले. देशातील आपत्तीग्रस्त भागा भेट देत त्यांनी मदतीचा वेग वाढवण्याचेही आदेश दिले.