नवी दिल्ली : एकीकडे पंतप्रधान मोदी आणि जिनपिंग यांची भेट होत असताना आशियामध्ये आणखी एक मोठी घटना घडलीय. गेल्या दशकभराचं वैर बाजुला सारून उत्तर आणि दक्षिण कोरियानं शांततेच्या दिशेनं दमदार पाऊल टाकलंय. जगाच्या इतिहासावर ठसा उमटवणारी ही घटना आहे... उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया... कोरियन प्रदेशातले हाडवैरी... एकेकाळी एकच देश असलेले पण फाळणीमुळे एकमेकांचे कट्टर शत्रू झालेले दोन देश... दक्षिण अमेरिकेच्या दावणीला बांधलेला... तर कम्युनिस्ट उत्तर कोरिया चीनचा घनिष्ट मित्र... कोणत्याही क्षणी युद्धाचा भडका उडेल अशी स्थिती असताना आंतरराष्ट्रीय राजकारणात मोठी उलथापालथ घडून आलीय.
उत्तर कोरियाचे हुकुमशाह किम जोंग उन सीमा ओलांडून दक्षिणेला आले आणि दक्षिण कोरियाचे अध्यक्ष मून जी इन यांची गळाभेट घेतली. बुधवारपासून निर्लष्करीकरण करण्यात आलेल्या भागामध्ये आंतर कोरियन परिषद सुरू झाली. शुक्रवारचा दिवस या परिषदेसाठी ऐतिहासिक ठरला. गेलं दशकभर दोन्ही देशांमध्ये धुमसत असलेली युद्धजन्य स्थिती संपवून दोन्ही देशांच्या नेत्यांनी बंधुत्वाच्या आणाभाका घेतल्या. या भेटीनंतर जारी करण्यात आलेल्या निवेदनात यापुढे कोरियन प्रदेशामध्ये कोणतंही युद्ध होणार नाही. त्यामुळे शांततेचं नवं पर्व आता सुरू होतंय, असं म्हटलं गेलंय.
जगभरात माथेफिरू म्हणून कुख्यात असलेले उत्तर कोरियाचे हुकुमशाह किम जोंग उन यांनीही 'दोन्ही देश हे सख्खे भाऊ आहेत... ते एकमेकांना सोडून राहू शकत नाहीत,' असं म्हणत या ऐतिहासिक क्षणाचं वर्णन केलंय... दक्षिण कोरियाचे अध्यक्ष मून यांच्या आई-वडिलांना उत्तर कोरियाच्या जुलमी राजवटीतून परागंदा व्हावं लागलं होतं. त्यामुळे त्यांच्यासाठी या घटनेचं महत्त्व अधिकच वाढतं...
आता दोन्ही कोरियांमध्ये दिलजमाई झाल्यानंतर एवढे दिवस एकमेकांवर गुरगुरणारे किम जोंग उन आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हेदेखील लवकरच भेटणार आहेत. ट्रम्प यांनी या भेटीच्या 3-4 संभाव्य तारखाही सांगितल्यात... आंतरराष्ट्रीय राजकारणात अत्यंत महत्त्वाची असलेली ही घटना आहे. यामुळे अनेक संदर्भ बदलणार आहेत... कोरिया शांत झाल्यामुळे आता चीन आणि अमेरिकेत पेटलेलं व्यापारयुद्ध आणखी भडकण्याची शक्यता नाकारता येत नाही.