विजय माल्ल्याची प्रत्यार्पणविरोधातील याचिका ब्रिटन हायकोर्टाने फेटाळली

भारतासाठी हे एक मोठं यश मानलं जात आहे.

Updated: Apr 20, 2020, 08:17 PM IST
विजय माल्ल्याची प्रत्यार्पणविरोधातील याचिका ब्रिटन हायकोर्टाने फेटाळली title=

लंडन : भारतातून इंग्लंडला पळून गेलेले उद्योजक विजय माल्ल्याची भारतात प्रर्त्यापणविरोधातील याचिका ब्रिटन हायकोर्टाने रद्द केली आहे. भारतासाठी हे एक मोठं यश मानलं जात आहे. या प्रकरणाचा निर्वाळा न्यायमूर्ती स्टिफन इरविन आणि न्यायमूर्ती एलिझाबेथ लाइंग यांनी ईमेलने दिला आहे.

लिंकर किंग म्हणून प्रसिद्ध असलेले ६४ वर्षीय मद्य उद्योजक विजय माल्ल्यांनी भारतात प्रत्यार्पण करण्याच्या विरोधात याचिका दाखल केली होती. माल्ल्या यांची याचिका फेटाळण्यात आली आहे, ते आता सुप्रीम कोर्टात जावू शकतात, त्यांच्याकडे १४ दिवसांचा वेळ आहे. जर विजय माल्ल्यांनी याविरोधात याचिका दाखल केली नाही, तर त्यांना २८ दिवसांच्या आत भारतात प्रत्यार्पण करावे लागेल.

विजय माल्ल्या हे मार्च २०१६ साली भारत सोडून इंग्लंडला पळून गेले होते. माल्ल्या यांच्यावर बँकेचं कर्ज बुडवण्याचा आरोप आहे. माल्ल्या यांनी किंगफिशर एअरलाईन्स कंपनीसाठी बँकांकडून कर्ज घेतलं होतं. हे कर्ज न देताच ते परदेशात पळून गेल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

हे कर्ज १० हजार कोटी रूपयांच्या आसपास असल्याचं सांगण्यात येतं. किंगफिशर एअरलाईन्स डबघाईत आल्याने सध्या बंद आहे.