नवी दिल्ली : रशियाच्या फौजा युक्रेनची राजधानी कीव्हमध्ये घुसल्या असून, शहरात मोठी आणीबाणीची स्थिती आहे. कीव्हमध्ये प्रचंड गोळीबार सुरू आहे. युक्रेन आणि रशियन फौजा अक्षरशः एकमेकांच्या जीवावर उठल्या आहेत. यात युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू झालेत.
युद्धाच्या तिस-या दिवशी रशियन फौजांनी तब्बल 600 किलोमीटरची मुसंडी मारत युक्रेनची राजधानी कीव्हमध्ये शिरकाव केलाय. किव्हमध्ये दोन्ही देशांच्या फौजांमध्ये तुफान फायरिंग सुरू आहे.
बंकरमध्ये लपून युक्रेनच्या फौजा रशियाचा हल्ला परतवून लावत आहेत. विशेष म्हणजे कीव्हच्या जनतेकडूनही जोरदार प्रतिकार सुरू आहे. कीव्हमधील जनतेच्या हाती शस्त्र देण्यात आली असून तब्बल 17 हजार रायफली वाटण्यात आल्या आहेत.
या सगळ्या धामधुमीत युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की राजधानी कीव्हमध्येच ठाण मांडून आहेत. कोणत्याही स्थितीत देश सोडणार नसल्याची ठाम भूमिका त्यांनी मांडलीय.
रशियाच्या हिट टिम्स जानेवारीपासूनच युक्रेनमध्ये दाखल झाल्याची माहिती अमेरिकन गुप्तचरांनी दिली होती. रशिया युक्रेनवर हल्ला करणार अशी गुप्तवार्ता झेलेन्सी यांना अधीच दिली होती असा दावा अमेरिकेनं केलाय.
देश सोडण्यासाठी झेलेन्स्की यांना आम्ही केव्हाही मदत करण्यास तयार आहोत असं अमेरिकेनं म्हटलंय. झेलेन्स्की यांनी अमेरिकेची मागणी सपशेल धुडकावून लावलीय. सध्या मला अँटी टँक मिसाईल्सची गरज आहे, सुटकेची नाही असं झेलेन्स्की अमेरिकेला बजावलंय.
बंकरमध्ये असलेल्या झेलेन्स्की यांनी राजधानी वाचवा, युक्रेन वाचवा अशी साद कीव्हवासियांना घातली. दरम्यान झेलेन्स्की यांनी युक्रेन आर्मीला हत्यारं खाली ठेवण्यास सांगितल्याची अफवा शहरात पसरली होती. त्या अफवा खोट्या असल्याचं सांगण्यासाठी झेलेन्स्की यांनी एक नवा व्हिडिओ जारी केला.
झेलेन्स्की शरण येत नाहीत तोवर हल्ले सुरू ठेवणार असल्याचा रशियन फौजांचा निर्धार आहे. कोणत्याही स्थितीत रशियाविरोधात शेवटपर्यंत लढण्याचा पवित्रा सध्या तरी युक्रेननं घेतलाय.