World in next 10 years : पुढच्या 10 वर्षांमध्ये नेमकं काय होणार? असा प्रश्न विचारला असता येत्या काळात नेमकं काय होणार याची कल्पना असल्यास त्या दृष्टीनं अनेकजण उत्तर देतात. पण, तुम्हाला माहितीये का जग याच वेगानं आणि अशाच पद्धतीनं निसर्गाचे नियम धुडकावून लावत पुढे जात राहिलं तर अनेक गोष्टींचा ऱ्हास होणं अटळ आहे. जगाचा विनाश कैक हजार वर्षांपलीकडे असला तरीही त्याची सुरुवात मात्र पुढल्या 10 वर्षांमध्येच होणार आहे हे नाकारता येत नाही.
शास्त्रज्ञांनी केलेल्या एका अभ्यासानुसार पुढच्या 10 वर्षांमध्ये आर्क्टिकवर असणारी बर्फाची चादर पूर्णपणे नाहीशी होणार आहे. यूनिवर्सिटी ऑफ कोलोराडो बोल्डरच्या एका अभ्यासपर अहवालानुसार आर्क्टिक खंडामध्ये उष्ण दिवसांमध्येही बर्फाची चादर पाहायला मिळते. पण, आता मात्र हे चित्र धास्तावणाऱ्या स्वरुपात बदलताना दिसणार आहे.
नेचर रिव्यू अर्थ एंड एनवायरमेंट जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या या अहवालानुसार आर्क्टिकमधून बर्फ दिसेनासा होणार हे अटळ आहे. जागतिक तापमानवाढीचा वेग आणि त्याचे परिणाम पाहता ही परिस्थिती आता टाळता येणं शक्य नाही. दरवर्षी या बर्फाच्छादित भागातील बर्फ वितळणार असून, हळुहळू त्याचं प्रमाण लक्षणीयरित्या कमी होणार आहे. शास्त्रीय भाषेमधील संदर्भांनुसार जेव्हा आर्क्टिकमध्ये 10 लाख चौरस किमी बर्फ उरतो तेव्हा या भागाचा उल्लेख बिना बर्फाचा आर्क्टिक असा होतो आणि भविष्यात हीच परिस्थिती निर्माण होण्याची चिन्हं आहेत.
वैज्ञानिकांच्या अभ्यासानुसार 2030 पर्यंत आर्क्टिकच्या बहुतांश भागातील बर्फाळ प्रदेश नष्ट झालेला असेल. याचा थेट परिणाम तेथील जीवसृष्टीवर होताना दिसणार आहे. सील, पांढरे अस्वल या आणि अशा अनेक प्रजाती आणि पर्यायी अन्नसाखळीवरही याचा परिणाम होणार आहे. आणखी एक संकट म्हणजे बर्फ वितळल्यामुळं समुद्रातील लाटा अधिक वेगानं किनारी भागांमध्ये धडकणार आहेत. त्यामुळं निसर्गातील एका घटकाचा ऱ्हास प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या अनेक घटकांच्या विनाशाचं कारण ठरणार आहे.