China Corona Virus : चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा उद्रेक झाल्याने परिस्थिती पुन्हा एकदा हाताबाहेर जातान दिसत आहे. चीनमध्ये दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. यामुळेच तिथलं आरोग्य व्यवस्था कोलमडून पडण्याची शक्यता आहे. औषधांच्या तुटवड्यासह डॉक्टर्स आणि नर्स यांचाही तुटवडा चीनमध्ये जाणवत आहे. पण दुसरीकडे चीनमधील लोकांनी लिंबू आणि संत्रे खरेदी करण्यासाठी एकच गर्दी केली आहे. याचे व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
लिंबाच्या किमती गगनाला भिडल्या
चीनमध्ये कोरोनाचे नवीन BF.7 या व्हेरिएंटची घातक लाट आल्यानंतर लिंबाच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे लिंबू उत्पादक शेतकऱ्यांच्या व्यवसायात अचानक वाढ झाली आहे. लिंबाच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. चीनमधील लोक कोरोना विषाणूच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी नैसर्गिक उपायांचा वापर करत आहेत. कोणत्याही आजाराशी लढण्यासाठी त्या व्यक्तीमध्ये रोगप्रतिकारक शक्ती असणे महत्त्वाचे असते. लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते आणि ते रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. वाढत्या कोरोना संसर्गामुळे प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी चीनमध्ये व्हिटॅमिन सी असलेल्या उत्पादनांची मागणी झपाट्याने वाढली आहे. त्यामध्ये लिंबू वरच्या स्थानी आहे.
संत्र्यांनाही मोठी मागणी
चीनमधल्या डिटेन्शन कॅम्पमध्ये औषधांचा तुटवडा असल्याने लोक लिंबू, संत्री मिळवण्यासाठी धडपड करत आहेत. याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. शांघायमधील एका आरोग्य केंद्राचे रूपांतर डिटेंशन कॅम्पमध्ये करण्यात आले आहे. येथे कोरोना रुग्णांना ठेवण्यात आले आहे. औषधे त्यांच्यापर्यंत पोहोचत नसल्याने ते प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी संत्र्यांवर तुटून पडत आहेत.
People in China Rush and Struggle for Oranges and Lemons as these fruits have Vitamin C…
#COVID #chinacovid #COVID19 #coronavirus #China #CovidIsNotOver #CovidIsntOver #Corona pic.twitter.com/enAuGemCqu
— Jyot Jeet (@activistjyot) December 23, 2022
दररोज 10 लाख कोरोना रुग्णांची नोंद
चीनमध्ये अपुऱ्या व्यवस्थेमुळे गदारोळ सुरू असल्याचे आता जगाने सुद्धा मान्य केले आहे. लंडनस्थित ग्लोबल हेल्थ इंटेलिजन्स कंपनी एअरफिनिटीच्या म्हणण्यानुसार, चीनमध्ये दररोज 10 लाख कोरोना रुग्णांची नोंद होत आहे. तर 24 तासांत 5 हजारांहून अधिक रुग्णांचे मृत्यू होत आहेत. माध्यमांच्या वृत्तानुसार, चीनमध्ये 21 लाख मृत्यू होऊ शकतात.
दरम्यान, चीनमध्ये कोरोनामुळे झिरो कोविड पॉलिसी लागू करण्यात आली होती. यामुळे लोकांना अक्षरशः डांबून ठेवण्यात आले होते. पण लोकांनी त्याचा विरोध केला आणि नियम रद्द करण्याची मागणी केली. यासाठी मोठ्या प्रमाणात विरोध होऊ लागला. त्यानंतर सरकारने कोरोनाचे नियम शिथिल केले. मात्र आता कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे.