Viral News: ...अन् तिचा नवराच निघाला तिचा चुलत भाऊ! गंमत म्हणून केलेल्या चाचणीतून समोर आलं सत्य

Woman Got To Know Husband Is Brother: तिने सर्वच जोडप्यांनी वेळीच डीएनए चाचणी करुन घ्यावी असा सल्लाही दिला आहे. तिच्या पोस्टवर शेकडोच्या संख्येनं लोकांनी प्रतिक्रिया नोंदवल्या असून या प्रकाराबद्दल अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे.

Updated: Mar 29, 2023, 09:03 PM IST
Viral News: ...अन् तिचा नवराच निघाला तिचा चुलत भाऊ! गंमत म्हणून केलेल्या चाचणीतून समोर आलं सत्य
Celina Quinones & her husband (realestatesmommaz/Instagram)

Woman Got To Know Her Husband Is Her Brother: लग्न ही सामाजव्यवस्थेमधील जागतिक स्तरावरील संकल्पना असली तरी प्रत्येक देशात लग्नासंदर्भात वेगवेगळ्या मान्यता आहेत. भारतामध्ये अगदी गोत्र आणि इतर अनेक गोष्टी तपासूनच लग्न ठरवणाऱ्यांचं प्रमाण आजही फार मोठं आहे. अर्थात गोत्र वगैरे न मानणाऱ्या लोकांचं प्रमाणही हळूहळू वाढत असलं तरी या संकल्पनांना वैज्ञानिक आधार असल्याचं वेळोवेळी सिद्ध झालं आहे. विवाह करणाऱ्या व्यक्तींचं रक्ताचं नातं असेल तर पुढील पिढीला अनुवंशिक समस्या निर्माण होण्याची शक्यता वाढते. त्यामुळेच जवळच्या नात्यात लग्न करु नये असं म्हणतात. मात्र अमेरिकेमध्ये एका जोडप्याबरोबर नेमकं हेच घडलं. यासंदर्भातील खुलासा जिच्याबरोबर हे घडलंय त्या महिलेनेच आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन केला आहे. 

4 महिन्यांची ओळख अन् लग्न

सेलेना क्युनीओन्स असं या महिलेचं नाव असून तिने सोशल मीडियावर तिच्याबरोबर नेमकं काय घडलं हे सांगितलं आहे. सेलेनाला अचानक तिचा नवरा हा लग्नबंधनात अडकण्याच्या आधीपासून तिचा भाऊ असल्याचं समजलं. या दोघांना 3 मुलं असून आपला पतीच आपला भाऊ असल्याचं समजल्यानंतर सेलोनाला मोठा मानसिक धक्का बसल्याचं 'डेली स्टार'ने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे. 2006 साली सेलेनाचं लग्न झालं. लग्नाच्या आधीपासून ती तिच्या पतीला 4 महिने डेट करत होती. 4 महिन्यांच्या ओळखीनंतर दोघांनी लग्न केलं.

3 मुलंही झाली

अमेरिकेतील कोलोराडोमध्ये राहाणाऱ्या सेलेना आणि तिच्या नवऱ्याच्या 17 वर्षाच्या संसारामध्ये त्यांना 3 मुलंही झाली. तिन्ही मुलं सुदृढ आणि ठणठणीत असून जन्मापासून त्यांना आरोग्यासंदर्भातील कोणतीही समस्या नसल्याचं सेलेनाने टिकटॉकवर पोस्ट केलेल्या व्हिडीओत म्हटलं आहे. सेलेनाचा तिच्या पतीबरोबरचा संसार सुखाने सुरु असून सर्व काही अगदी व्यवस्थित सुरु आहे. दरम्यान या दोघांनी सहज एकदा डीएनए चाचणी केली असता त्यांना मोठा धक्का बसला. सहज गंमत म्हणून सेलेना आणि तिच्या नवऱ्याने केलेल्या डीएनए चाचणीमध्ये सेलेनाला हे धक्कादायक सत्य समजलं. आपला नवरा हाच आपला दूरचा भाऊ असल्याचं तिला डीएनए चाचणीमधून समजलं. माझा पती हा माझा चुलत भाऊ असल्याचं सेलेनाने व्हिडीओत म्हटलं आहे.

सर्वांनी करावी चाचणी

हे सत्य समोर आल्यानंतरही आपण नवऱ्यापासून वेगळं होणार नसल्याचं सेलेनाने व्हिडीओमध्ये म्हटलं आहे. या व्हिडीओवर आलेल्या प्रतिक्रियांमध्ये आपल्या जवळच्या नेतावाईकाबरोबर अशापद्धतीने पती-पत्नी म्हणून राहणं चुकीचं असल्याचं मत अनेकांनी मांडलं आहे. व्हिडीओ आणि सेलेनाच्या प्रोफाइलवरील इतर व्हिडीओ पाहून तुम्ही नवरा-बायको खरोखरच सारखेच दिसता असं अनेकांनी म्हटलंय. काहींनी तर सेलेनाला घटस्फोट घेण्याचा सल्ला दिला आहे. सेलेनाने या सल्ल्याकडे कानाडोळा केला आहे. केवळ रक्ताचं नातं असल्याने मी माझ्या पतीला सोडणार नाही असं सेलेनाने म्हटलं आहे. आपल्याला ज्याप्रमाणे आश्चर्याचा धक्का बसला तसं होऊ नये म्हणून इतर जोडप्यांनीही वेळीच डीएनए चाचणी करुन घ्यावी असा सल्लाही सेलेनाने दिला आहे.