Xi Jinping यांच्या बॉडीगार्डला मागच्या मागे अडवलं अन्...; Red Carpet वरील धक्कादायक Video

Xi Jinping Security BRICS Summit Video: सध्या दक्षिण आफ्रिकेमध्ये सुरु असलेल्या ब्रिक्स देशांच्या परिषदेसाठी चीन, भारत, ब्राझील, दक्षिण आफ्रिका, रशिया या देशांचे प्रमुख नेते उपस्थित आहेत. याच परिषदेदरम्यान एक विचित्र प्रकार घडला असून त्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Aug 24, 2023, 02:31 PM IST
Xi Jinping यांच्या बॉडीगार्डला मागच्या मागे अडवलं अन्...; Red Carpet वरील धक्कादायक Video title=
हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे

Xi Jinping Security BRICS Summit Video: दक्षिण आफ्रिकेमध्ये सध्या 15 वी ब्रिक्स परिषद सुरु आहे. ब्रिक्स देशांचे प्रमुख नेते सध्या दक्षिण आफ्रिकेच्या राजधानीचं शहर असलेल्या जोहान्सबर्गमध्ये आहेत. चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग सुद्धा ब्रिक्स देशांच्या परिषदेमध्ये सहभागी झाले आहेत. मात्र बुधवारी ब्रिक्सच्या बैठकीदरम्यान क्षी जिनपिंग यांच्याबरोबर एक विचित्र घटना घडली. या घटनेनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं हे विशेष.

नेमकं घडलं काय?

राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग हे बुधवारी ब्रिक्सच्या बैठकीसाठी रेड कार्पेटवर पोहोचले. त्यावेळी त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेल्या सुरक्षा अधिकाऱ्याला अचानक रोखण्यात आलं. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडीओमध्ये क्षी जिनपिंग ब्रिक्स परिषदेच्या बैठकीसाठी रेड कार्पेटवर चालत बैठकीच्या हॉलच्या दिशेने जाऊ लागले. त्यांच्या मागे त्यांचा सुरक्षारक्षक म्हणजेच बॉडीगार्डही चालत होता. क्षी जिनपिंग चालत एका दरवाजा ओलांडून पुढे गेले. त्यानंतर त्यांच्या मागून काही अंतरावर चालणाऱ्या सुरक्षारक्षकानेही दरवाजातून आत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. पण या दरवाजाजवळ असलेल्या सुरक्षारक्षकांनी या व्यक्तीला हटकलं. मात्र त्या व्यक्तीने पुढे जाण्याचा प्रयत्न केला असता त्याला दरवाजाच्या एका धक्का देत मार्गातून बाजूला काढलं. त्यानंतर हा मोठा दरवाजा बंद करण्यात आला.

अचानक दरवाजा बंद झाला

क्षी जिनपिंग यांना काही कळण्याआधीच दरवाजा बंद करुन घेण्यात आला होता. क्षी जिनपिंग जेव्हा मागे पाहतात तेव्हा ते ज्या दारातून आत आले तो दरवाजा बंद होता. आपल्या मागून येणारा सुरक्षारक्षक कुठे गेला याबद्दल क्षी जिनपिंग गोंधळलेल्या अवस्थेत होते. थांबत थांबत मागे पाहत ते हळूहळू चालत होते. 

जिनपिंग काय म्हणाले?

क्षी जिनपिंग यांनी ब्रिक्स परिषदेला संबोधित केलं. आंतरराष्ट्रीय नियमांना संयुक्त राष्ट्रांच्या धोरणांनुसार आणि सिद्धांनुसार सर्व देशांसाठी संयुक्तपणे लिहिलं पाहिजे. एखाद्या ठराविक देशाच्या दृष्टीकोनातून हे नियम तयार करता कामा नये. ब्रिक्स देशांनी एकमेकांबरोबर खांद्याला खांदा लावून उभं राहणं फार गरजेचं आहे. विभाजन करणाऱ्यांपासून आपण सर्वांनी दूर राहिलं पाहिजे असं क्षी जिनपिंग आपल्या भाषणामध्ये म्हणाले. क्षी जिनपिंग यांनी कोणत्याही देशाचा थेट नाव घेऊन उल्लेख केला नसला तरी त्यांच्या या भाषणाचा रोख अमेरिकेच्या दिशेने होता असं म्हटलं जात आहे. शांतता आणि सहकार्य कायम ठेवण्यासाठी राजकीय आणि सुरक्षेसंदर्भातील सहयोग वाढवणं गरजेचं असल्याचंही क्षी जिनपिंग यांनी भाषणात म्हटलं. शीत युद्धाची मानसिकता अजूनही जगासमोर धोका म्हणून उभी असल्याचंही क्षी जिनपिंग यांनी सांगितलं.