Ashadhi Ekadashi 2023 : आषाढी एकादशी अवघ्या काही दिवसांवर येऊन थोपलेली असतानाच आता राज्याच्या विविध भागांमधून संतमंडळींच्या पालख्यांनी प्रस्थान ठेवण्यास सुरुवात केली आहे. हजारोंच्या संख्येनं वारकरी या पालखी सोहळ्यांमध्ये सहभागी होत पायवारी करत पंढरपूरच्या दिशेनं रवाना होत आहेत. सध्या काही संतांच्या पालख्यांनी प्रस्थान ठेवलेलं असतानाच संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या पालख्यांचा प्रस्थान सोहळा नुकताच पार पडला.
सदरील दोन्ही पालखी सोहळ्यांना होणारी गर्दी आणि त्याचे प्रवासमार्गांवर होणारे परिणाम पाहता पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी नागरिकांना वाहतुकीच्या मार्गांमध्ये बदल झाले असून, त्यांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचं आवाहन केलं आहे.
संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पुणे- सासवड- लोणंद मार्गे पुणे ग्रामीण भागातून पंढरपूरच्या दिशेनं निघेल. तर, संत तुकाराम महाराजांची पालखी पुण्यातून निघून सोलापूरच्या दिशेनं रवाना होईल. या मार्गात पालखी बारामतीतून पुढे अकलूजमार्गे पंढरपुरात येईल. परिणामी दोन्ही पालख्यांच्या अनुशंगानं पुण्यातील वाहतुकीचे नियम 14 जून ते 24 जूनपर्यंत बदलण्यात येतील. ज्यामुळं नागरिकांना पर्यायी मार्गांची वाट धरावी लागणार आहे.
पुढे पालखी अंथुर्णे, इंदापूर, सराटी येथे मुक्कामी असतानासुद्धा वाहतुकीत पालखीच्या वेळांना अनुसरून काही बदल करण्यात आले आहेत. पुणे वाहतूक पोलिसांच्या शाखेकडून सदर बदलांनी नागरिकांना वेळोवेळी माहिती देण्यात येईल.