अमर काणे, झी मीडिया
नागपूरः आषाढी एकादशीला (Ashadhi Ekadashi) महाराष्ट्रात अत्यंत महत्त्व आहे. विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपुरात वैष्णवांचा जनसागर पाहायला मिळतो. चंद्रभागेचा तिर भाविकांनी फुलून गेलेला असतो. राज्यातील इतर भागातही विठुरायाच्या दर्शनासाठी आतूर झालेले असतात. पंढरीप्रमाणेच नागपूर जिल्ह्यातील धापेवाडा ही प्रती पंढरी (Pandharpur of Vidarbha) म्हणून ओळखले जाते. धापेवाडा ही विदर्भाची पंढरी म्हणूनही ओळखली जाते. या गावाला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे. आषाढी एकादशी एक दिवसावर असतानाच या गावात विठ्ठल- रखुमाई ज्या विहिरीतून अवतरले होते ती विहीर सापडली असल्याचा दावा केला जातोय.
धापेवाडा येथे सुमारे साडेतीनशे वर्ष जुने विठ्ठल-रखुमाईचे मंदिर आहे. येथे विठुरायाची 1741 साली प्राणप्रतिष्ठा करण्यात आली होती. ज्या भक्तांना आषाढीवारीला पंढरीत जायला शक्य होत नाही ते इथे दर्शनासाठी येतात. या मंदिराचीदेखील एक अख्यायिका आहे. श्री सदगुरु कोलबास्वामींना स्वप्नात दृष्टांत झाला होता. शेजारुन वाहणाऱ्या चंद्रभागा नदीजवळील विहिरीत विठ्ठल-रखुमाईच्या स्वयंभू मूर्ती आढळल्या होत्या. त्यानंतर मंदिरात या स्वयंभू मूर्तींची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली होती. मात्र, कालांतराने ती विहीर गुप्त झाली होती. आता ही विहीर सापडल्याचा दावा केला जात आहे.
चंद्रभागेच्या नदीपात्राजवळच्या विहिरीतच विठ्ठल-रखुमाईच्या मूर्ती सापडल्याची भाविकांची श्रद्धा आहे. मात्र गेल्या पाच पिढ्यांनी त्या विहरीचा शोध घेतला तरी ती नदी आजूबाजूच्या परिसरात दिसून आली नाही. अनेकदा शोध घेऊनही विहिर सापडत नव्हती. मात्र नुकतेच नदीपात्राचे खोलीकरण करत असताना एका ठिकाणी जेसीबी अडकला तेव्हा सावधगिरीने खोदकाम केल्यावर नदीपात्राच्या आत खोल पुरातन विहीर आढळून आली आहे
साडेतीनशे वर्षांपूर्वी विठ्ठल रखुमाई ज्या विहिरीतून अवतरले होते हीच ती विहीर का? असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. तर विठूरायचे भक्त पुरातन विहीर सापडल्याचा दावा करत आहेत. इतिहास संशोधक आणि पुरातत्त्व तज्ज्ञांनी याबाबत संशोधन करण्याची गरज आहे, असे मत व्यक्त केले आहे.
एका आख्यायिकेनुसार सदगुरु कोलबास्वामी महाराज हे विठ्ठलभक्त होते. न चुकता ते पंढरपूरला वारीला जायचे. पण वृद्धपकाळाने त्यांना आता वारी चुकणार अशी चिंता वाटली. ते अस्वस्थ झाले. एका रात्री कोलाबास्वामींना विठ्ठलाने स्वप्नात दृष्टांत दिला. त्यानुसार नदीच्या काठावरील एका विहिरीत शोध घेण्यास सांगितलं. त्यानुसार त्यांनी शोध घेतला असता विहिरीत विठ्ठल- रखुमाईची मूर्ती अवतरली. तेव्हापासून धापेवाड्याला विदर्भाची पंढरी म्हणून ओळखले जाते.