मी काही काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता नाही... किंवा भाजपचा विरोधकही नाही... पण तरीही गुजरात आणि हिमाचलच्या निवडणुकीचा जो निकाल लागला, त्यानंतर आपल्याशी काही बोलावे असे वाटले. त्यासाठी हा सगळा पत्रप्रपंच...
सर्वात आधी अभिनंदन... तुम्ही काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष झालात त्याबद्दल... तुम्ही गांधी घराण्याचे वारसदार आहात, त्यामुळं काँग्रेसची धुरा तुमच्या खांद्यावर आलीय, हे खरेच आहे. या पदासाठी तुमच्यापेक्षा अधिक योग्य उमेदवार तुमच्याही पक्षात असतील, हे तुम्हालाही नक्कीच ठाऊक असेल. पण तुमचे गांधी हे आडनाव आणि या नावाभोवती असलेला करिश्मा ही तुमची सर्वात मोठी जमेची बाजू आहे, हे कुणालाही विसरता येणार नाही. आपल्या देशात राजकीय घराणेशाही आहे आणि ती आनंदाने स्वीकारलीदेखील जाते, हे उघड वास्तव आहे. त्यामुळे सोनिया गांधींनंतर काँग्रेस अध्यक्षपदावर तुमचा वारसाहक्क काँग्रेसच्या यच्चयावत नेत्यांनी मान्य केला आहे.
आता पुन्हा मूळ विषयाकडे वळूया... ज्या पद्धतीने तुम्ही निवडणूक निकालांना सामोरे गेलात, दोन दोन राज्यात पराभूत झाल्यानंतरही कोणताही त्रागा किंवा वाचाळपणा केला नाहीत, ज्या धीरोदात्तपणे पराभूत काँग्रेस कार्यकर्त्यांच्या पाठीवरून कौतुकाचा हात फिरवलात, ही सगळीच प्रगल्भ नेतृत्वाची लक्षणे आहेत. जे कुणी तुम्हाला आजवर पप्पू-पप्पू म्हणून हिणवत होते... युवराज म्हणून खिल्ली उडवत आहेत, त्यांना तुम्ही घाम फोडलात. राहुल गांधी विरूद्ध पंतप्रधान नरेंद्र मोदी, त्यांचे अख्खे केंद्रीय मंत्रिमंडळ, विविध राज्यांचे मुख्यमंत्री अशी सगळी सत्ता यांच्यातील ही लढाई होती... आणि या लढाईत केवळ 19 जागा कमी पडल्या... आणखी थोडा जोर लावला असता, मतदारांना घराबाहेर काढण्यात काँग्रेसचे कार्यकर्ते यशस्वी झाले असते तर गुजरातमधील चित्र वेगळे दिसले असते. अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर विजयाचा पहिला शिरपेच तुमच्या मुकुटात खोवला गेला असता... पण भाजपच्या सत्तेपुढे तुम्ही आणि तुमचा काँग्रेस पक्ष कमी पडला. पण तरीही भाजपसारखी निवडणूक प्रचार यंत्रणा नसताना एकहाती किल्ला लढवलात. टीकेचे आणि निंदा-नालस्तीचे वार समोरून होत असताना, तुम्ही पंतप्रधानपदाचा आदर राखण्याचा आटोकाट प्रयत्न केलात. पंतप्रधान नरेंद्र मोदींना 'नीच' म्हणणाऱ्या मणिशंकर अय्यर यांना कसलाही विचार न करता पक्षातून तत्काळ निलंबित केलंत. नैतिकदृष्ट्या तुमची ही भूमिका कदाचित योग्य असेल, पण अटीतटीच्या निवडणुकीच्या राजकारणात असे वागणे योग्य आहे का? मणिशंकर अय्यर यांनी माफी मागितल्यानंतर त्या वादावर पडदा टाकता आला नसता का? हे 'नीच' प्रकरण योग्यरित्या हाताळले असते तर कदाचित वेगळा निकाल लागला असता का? विरोधक हॉटेलच्या चार भिंतीच्या आत काय करतात, याच्या व्हिडिओ सीडी तयार करून त्या प्रचारात उतरवणाऱ्यांकडून तुम्ही नैतिकतेची अपेक्षा बाळगता? इथे तुमच्या रक्तातील राजकीय परिपक्वता कमी पडली का?
आणखी एक... गुजरात निवडणूक पार पडल्यानंतर तुम्ही निकालाच्या दोन दिवस आधी काँग्रेस अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारलीत. हाच सगळा 'राज्याभिषेक सोहळा' गुजरात निवडणुकीच्या आधी तुम्हाला करून घेता आला नसता का? काँग्रेसचा नियोजित अध्यक्ष या नात्याने प्रचाराला उतरण्याऐवजी काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून तुम्ही गुजरात निवडणुकीला सामोरे गेला असता तर...? याबाबतीत तुम्हाला भाजपवाल्यांचे क्लासेस नक्कीच लावावे लागतील. हाच जर भाजप अध्यक्षपदाच्या निवडीचा कार्यक्रम असता, तर मोठा गाजावाजा करून, तामझाम करून त्याचे दिवस-रात्र ढोल बजावण्यात त्यांनी कमी केले नसते... किंबहुना त्या माध्यमातून तुम्हाला गुजरात निवडणुकीचा प्रचारही करता आला असता... आणि निवडणूक आयोगाच्या कथित आदर्श आचारसंहितेचा भंगही झाला नसता... पण काँग्रेसचे जे कुणी धोरणी आहेत, ते या सगळ्यात कमी पडले, असे वाटते. याबाबतीत भाजपवाल्यांचा हात कुणी धरणार नाही, एवढे नक्की.
हिमाचलमध्ये 'अँटी इन्कम्बन्सी'चा अर्थात सरकारविरोधी लाटेचा फटका सत्ताधारी काँग्रेसला बसला. गुजरातमध्येही भाजप सरकारच्या विरोधात जोरदार वातावरण होते. पाटीदार समाज, दलित-अल्पसंख्याक समाज सरकारवर नाराज होता. शेतकऱ्यांच्या मागण्यांना धत्तुरा लावण्यात आल्याने त्यांच्यात संताप होता. जीएसटी आणि नोटाबंदीमुळे व्यापारी वर्गाचे कंबरडे मोडले होते. हार्दिक पटेल, जिग्नेश मेवानी, अल्पेश ठाकोर अशा कट्टर भाजप विरोधकांची साथ तुम्हाला होती. तरी देखील गेल्या 22 वर्षांपासूनची भाजपची सत्ता उलथवून लावण्यात तुम्ही कमी पडलात... अशी सुवर्णसंधी रोजरोज चालून येत नसते. जेव्हा लोहा गरम असतो, तेव्हाच हातोडा मारायचा असतो... पण तो निर्णायक घाव तुम्ही घालू शकला नाहीत. निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुजराती अस्मितेचा मुद्दा उभा करून, जो भावनिक प्रचार केला, त्याचा मुकाबला करण्यात काँग्रेस आणि मित्र पक्ष कमी पडले, असे तुम्हाला वाटत नाही का? एवढा असंतोष असतानाही काँग्रेस हा समर्थ पर्याय आहे, असे गुजराती मतदारांच्या मनावर बिंबवण्यात तुम्ही कमी पडलात, हे खरे नाही का?
आता तुम्ही म्हणाल की, निकालानंतर असे शहाणपण शिकवणारे बरेच असतात. खरे आहे तुमचे. पण झालेल्या चुकांमधून प्रत्येक जण काही ना काही शिकत असतो. तुम्हीदेखील त्यातून नक्कीच काहीतरी बोध घ्याल आणि गुजरातमध्ये झालेल्या चुका पुढच्या वर्षी होणा-या कर्नाटक, राजस्थान, मध्य प्रदेशसारख्या राज्यातल्या निवडणुकीत करणार नाही, एवढीच अपेक्षा आहे.
आणखी एक... या निवडणुकीत तुमचा पराभव झाला, पण ही निवडणूक नक्कीच तुम्हाला अनुभवसंपन्न करून गेली असेल. तुम्ही अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्याला जेमतेम तीन दिवस झालेत. प्रगल्भ आणि परिपक्व नेतृत्व अशी स्वतःची इमेज तयार करण्यात तुम्ही काही अंशी सफल ठरलात, हे तुमच्या विरोधकांनाही मान्य करावे लागेल. 'पप्पू' इमेज मोडीत काढण्यात तुम्ही यशस्वी झालात. गुजरातमध्ये भाजप जिंकूनही हरला आणि काँग्रेस पराभूत होऊनही जिंकली, असे वर्णन आता केले जात आहे. ही तुमच्या नेतृत्वावरची पसंतीची पावती आहे. आता तुमच्याकडून अपेक्षा उंचावल्या आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीसाठी जेमतेम दीड वर्षे उरले आहे. 2014 ची परिस्थिती आणि 2017 ची सध्याची परिस्थिती यात किती फरक पडला आहे, याची जाणीव हळूहळू देशातील जनतेला होते आहे. मनमोहन सिंग यांची धोरणे किती योग्य होती, याची साक्ष जनतेला पटू लागली आहे. केवळ भाषणबाजी करून देश चालवता येत नाही, याची खात्री पटू लागली आहे. आता वेळ काँग्रेसची आहे. लोकांचा अपेक्षाभंग होतो आहे, अनेक भक्त मंडळीदेखील सावध झालीत. आता जबाबदारी काँग्रेसची आहे. केवळ एकट्याच्या जोरावर निवडणुका जिंकण्याचे काँग्रेसचे दिवस इतिहासजमा झालेत. आपल्या समविचारी मित्रपक्षांना सोबत घेऊन निवडणूक व्यूहरचना आखण्याची नितांत गरज आहे. त्यादृष्टीने आपण आतापासूनच पावले उचलावीत, अशी अपेक्षा आहे. काँग्रेसच्या रूपाने भाजपला समर्थ पर्याय उभा करण्याची गरज आहे.
याआधी 1999 साली भाजपचा 'फील गुड'चा फुगा फुटला आणि काँग्रेसला आयती सत्ता मिळाली. आता पुन्हा एकदा 'अच्छे दिन'चा फुगा फुटेल आणि देशातील जनता स्वतःच्या हातांनी सत्ता काँग्रेसच्या हातात ठेवेल, अशा भ्रमात तुम्ही राहू नका. निवडणुका जिंकण्यासाठी यावेळी काँग्रेसला म्हणजे तुम्हाला जीवापाड मेहनत घ्यावी लागेल. गुजरातच्या जनतेला विश्वास देण्यात तुम्ही कमी पडलात... 2019 च्या लोकसभा निवडणुकीत देशातील जनतेला विश्वास देण्यात कमी पडलात, तर पुढची पाच वर्षे पुन्हा हात चोळत बसावे लागेल... तेव्हा गुजराती जनतेने दिलेल्या निकालाचा खरा अन्वयार्थ समजून घ्या... समर्थ पर्याय द्या आणि त्यासाठी आतापासूनच कामाला लागा...
अन्यथा आता केवळ कर्नाटक, पंजाब, मिझोराम आणि पाँडेचरी या चार राज्यांमध्ये सत्तेवर असलेली काँग्रेस औषधालाही सापडणार नाही... आणि काँग्रेसमुक्त भारताचं नरेंद्र मोदींचं स्वप्न साकार होईल...
तूर्तास एवढेच... कळावे, लोभ असावा...