दक्षता ठसाळे - घोसाळकर, झी मीडिया, मुंबई : आजूबाजूला कॅन्सरग्रस्त रूग्ण बघितला तर पहिलं लक्ष हे त्यांच्या केसांवर जातं. उपचारादरम्यान त्यांचं शरीर तर थकलेलं असतंच पण किमोथेरपीमुळे गळलेल्या केसांचं शल्य त्यांच्या चेहऱ्यावर अधिक दिसतं. अनेक महिला केस गळले म्हणून घरातून बाहेर पडणं टाळतात. तर काहीजणी डोक्याला रूमाल बांधून फिरतात. अशावेळी आपण फक्त बघ्याच्या भूमिकेत असतो.
आपण काही तरी यासाठी करायला हवं असं वाटतं होतं. कारण रक्तदान, अवयवदान याबाबत आता जागृती होतेय. कॅन्सरग्रस्तांसाठी केसदान करण्याबाबत लोकांना फार माहिती नाही. मृत्यूनंतर अवयवदान केलं जातं पण जिवंतपणी आपण काय करू शकतो तर ते म्हणजे 'केसदान.' नेमकं हे कसं करायचं याबाबत फार काही माहिती नव्हती.
19 वर्षांच्या किरण गितेने कॅन्सरग्रस्त रूग्णांना केसदान केले ही बातमी काही दिवसांपूर्वी वाचली होती. किरणशी संपर्क साधला बातमी संदर्भात तिच्याशी बोलणं झालं. आणि या समस्येची तीव्रता कळाली. त्यानंतर केसदान करण्याचा विचार केला. पण कामाच्या ओघात प्रत्यक्षात कृती करण्याचं राहून जात होतं. केस विंचरताना प्रत्येकवेळी ही गोष्ट मनात येत होती. आपण केसं विंचरतो. केस गळतात म्हणून ते सहज फेकूनही देतो. पण या केसांचं महत्व त्या रूग्णांनाच अधिक, हे जाणवत होतं.
पु्न्हा एकदा किरणशी संपर्क साधला. 'अप्रोच हेल्पींग हँड्स फाऊंडेशन' संस्थेबद्दल किरणकडून कळलंच होतं. 'अप्रोच' ही संस्था 'मदत' संस्थेशी जोडली गेलेली असून ही संस्था टाटा रूग्णालयाच्या संपर्कात आहे. यासाठी 'अप्रोच' संस्थेचा स्वयंसेवक शिशिर जैनशी संपर्क साधला. केसदान करण्यासाठी लागणारी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या मनाची तयारी. माझे केस फार लांब सडक नव्हते पण तरी देखील केसं कापणार याची रूखरूख ही होतीच. पण हेतू समोर असल्यामुळे त्याचं फारसं काही वाटत नव्हतं.
केसदान करण्यासाठी पहिलं तर तुमच्या मनाची तयारी असणं गरजेचं आहे. दुसरं महत्वाचं म्हणजे कमीत कमी 12 इंच आणि त्याहून जास्त लांब केस तुम्ही दान करू शकता. टाटा मेमोरिअल संस्थेमार्फत कॅन्सरग्रस्त रूग्णांना केसाचा विग देण्यात येतो. 'मदत संस्था' टाटा रूग्णालयामार्फत हे कार्य करते. केसदान केल्यानंतर सर्वात प्रथम त्याचं वर्गीकरण केलं जातं. पाच ते सहा डोनरने केसदान केल्यानंतर त्याचा एक विग बनतो.
अनेक विग बाजारात सहज उपलब्ध होतात. पण हे विग प्राण्यांच्या केसांपासून तयार केलेले असता. हे असे विग कॅन्सरग्रस्त रूग्णांच्या त्वचेला हानी पोहचवू शकतात. अगोदरच किमोथेरपी आणि उपचारामुळे हैराण झालेल्या रूग्णांना आणखी त्रास होऊ नये याची काळजी घेऊन नैसर्गिक केसांना विग तयार केला जातो.
'अप्रोच' संस्थेने 50 विग तयार करण्याचा मानस केला आहे. त्यामुळे जवळपास 300 हून अधिक डोनरची याकरता गरज आहे. लांब केस असलेल्या महिलांनी पुढे येऊन कॅन्सरग्रस्त महिलांसाठी केसदान करायला हवेत. याकरता 'अप्रोच' संस्थेचे स्वयंसेवक आपल्याला मदत करतात. जर तुम्हाला कुणाला केसदान करायचे असतील तर 'अप्रोच' संस्थेच्या शिशिर जैनशी किंवा माझ्याशी संपर्क साधू शकता.
शिशिर जैन - 8275394886