'फर्जंद' सिनेमा पाहणे 'अभिमानास्पद', चुकवणे 'लज्जास्पद'

फर्जंद या सिनेमाला फार कमी सिनेमा गृहात रिलीज करण्याची संधी मिळाली असली, तरी फर्जंद सिनेमा तुम्हाला जिथे कुठे पाहण्याची संधी मिळाली तिथे जरूर पाहा.

Updated: Jun 6, 2018, 08:55 PM IST
'फर्जंद' सिनेमा पाहणे 'अभिमानास्पद', चुकवणे 'लज्जास्पद' title=

जयवंत पाटील, झी मीडिया, मुंबई : मराठीत ऐतिहासिक सिनेमा तसे फार कमी प्रमाणात येतात, मात्र फर्जंद या सिनेमाला फार कमी सिनेमा गृहात रिलीज करण्याची संधी मिळाली असली, तरी फर्जंद सिनेमा तुम्हाला जिथे कुठे पाहण्याची संधी मिळाली तिथे जरूर पाहा, कारण फर्जंद हा मराठीतील एक चांगला ऐतिहासिक सिनेमा आहे. सिनेमाची कथा, ऐतिहासिक दृश्य, कॅमेरा, संवाद हे तोडीस तोड आहेत. फर्जंद हा सिनेमा सिनेमागृहात पाहण्याची खरी मजा आहे. तुम्ही फर्जंद पाहिला नाही, आणि काही वर्षांनी तुम्हाला कुणी सांगितलं की, मराठीत फर्जंद हा बेस्ट सिनेमा आहे, तर तेव्हा तुम्हाला आपण त्यावेळी हा सिनेमा पाहिला नाही, असं चुकल्या चुकल्या सारखं वाटायला नको.

फर्जंद प्रत्येकाने पाहावा असा सिनेमा

फर्जंद सारखा सिनेमा साकारणे तसं सोपं काम नाही, प्रेक्षकांना कोणतीही प्रेम कहाणी नसताना स्क्रीनवर खिळवून ठेवणं, तेवढंही सोपं नाही, पण सिनेमाचं संगीत आणि सिनेमाचे प्रसंग आणि दृश्य तुम्हाला सेकंदभरही सिनेमाचं स्क्रीन सोडू देत नाहीत, हे या सिनेमाच्या दिग्दर्शकाचं आणि संगीतकाराचं यश आहे. ऐतिहासिक प्रसंग आणि दृश्य हिंदी सिनेमाला लाजवतील अशी आहेत.

मराठी सिनेमाच्या प्रेक्षकांसाठी अभिमानास्पद

मराठीत असा सिनेमा येणं हे प्रत्येक मराठी सिनेमाच्या प्रेक्षकांसाठी अभिमानास्पद आणि जर तुम्ही कोणत्याही भाषेतील सिनेमाचे चाहते असले, आणि तुम्ही मराठीतला हा सिनेमा टाळला तर ही लज्जास्पद बाब होती किंवा नाही, हे तुम्ही हा सिनेमा पाहून ठरवू शकता. सिनेमा ऐतिहासिक गोष्टींवर अवलंबून असला, तरी कोणतीही चूक जाणार नाही, याकडे देखील दिग्दर्शकाने लक्ष दिलं आहे. हा सिनेमा अतिशय छान बनवण्यात आला आहे, तुमच्या घरातील लहान मुलांनी देखील पाहावा, असा हा सिनेमा आहे.

मनसेची भूमिका योग्य, सरकारनेही भूमिका घ्यावी

या सिनेमाला कमी ठिकाणी रिलीज करण्याची संधी मिळाली असेल, तर ही बाब खेद जनक आहे. राज्याच्या सांस्कृतिक विभागाने देखील याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. फर्जंद हा सिमेमा एवढा चालणारा सिनेमा आहे की, थिएटर मालकांना देखील हा सिनेमा रिलीज करण्यात कोणतीही हरकत निश्चितच नसेल, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मनसेने या सिनेमाला स्क्रीन्स मिळवून देण्यासाठी, हातभार लावण्याची भूमिका घेतली असेल, तर ती निश्चितच योग्य भूमिका आहे. प्रेक्षकांनी फक्त हा सिनेमा त्यांच्याकडून चुकणार नाही, याची दक्षता घेणे आवश्यक आहे.