Duck Down Jacket: देशभरातील तापमानात बऱ्यापैकी घट झाली असल्याने आणि देशातील अनेक भागांमध्ये थंडीची लाट पाहायला मिळत असल्याने पहाटे तसेच रात्री बऱ्यापैकी गारवा जाणवतोय. मुंबईतही थंडीनं जोर धरला असल्याचं मागील काही आठवड्यांमध्ये पाहायला मिळत आहे. ही बोचणारी थंडी अशीच कायम राहणार असल्याने बाजारपेठांमध्ये सध्या गरम आणि ऊबदार कपडे घेण्याचा कल दिसून येत आहे. अशावेळी अनेकजण जॅकेट, स्वेटर, शॉल यासारखे गरम कपडे खरेदी करतात. सध्या बाजारात प्रामुख्याने काही वेगळ्या प्रकारचे जॅकेट उपलब्ध आहेत. फुगलेल्या दिसणाऱ्या या जॅकेटला डक डाऊन जॅकेट (Duck Down Jacket) असं म्हणतात. सध्या ही असली फुगलेली जॅकेट तरुणाईत खूप लोकप्रिय आहेत. ही जॅकेट सामान्य स्वेटरपेक्षा थोडी महाग असली तरी ती तरुणाईच्या पसंतीस उतरत आहेत. पण याची खरी किंमत कोणत्या मुक्या प्राण्याला मोजावी लागते माहित आहे का? याबद्दल जाणून घेऊयात
आजकाल डक डाऊन जॅकेटची विक्री स्वेटर, शॉल, ऊनी कपडे यांपेक्षा जास्त होत आहे. हे सोयीस्कर आणि स्टाईलिश जॅकेट दिसायला भरगच्च वाटत असलं तरी ते वजनाने अगदी हलके असते. हे फुगीर जॅकेट पक्ष्यांच्या पिसांपासून बनवले जाते. पक्ष्यांचं थंडीपासून संरक्षण होण्यासाठी नैसर्गिकरित्या त्यांना हे पिसांचं वरदान मिळालेलं असतं. ही पिसं कडाक्याच्या थंडीपासून शरीराला संरक्षण देण्यासाठी आणि उबदार ठेवण्यासाठी मदत करतात. आपण वापरतो ती डक डाऊन जॅकेट्स बदक तसेच हंस या पक्ष्यांच्या पंखांपासून बनवतात. या जॅकेटवर वापरली जाणारी पिसे ही पक्ष्यांच्या शरीरावरील छातीच्या भागावरची असतात. अशा पिसांना 'डाऊन' असे म्हणतात. आता हे वाचून तुम्हाला या जॅकेटच्या नावातील मधल्या शब्दाचा नेमका अर्थ कळला असेल. जगभरात पिसांपासून बनवलेली ही अशी जॅकेट्स 'डक डाऊन जॅकेट' नावाने ओळखली जातात. अमेरिकेतील 'द नॉर्थफेस' आणि न्यूझीलंडमधील 'काठमांडू' नावाच्या कंपन्या डाऊन जॅकेट बनवण्यासाठी प्रसिद्ध आहेत.
जगभरामध्ये प्राण्यांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या 'पेटा' (PETA म्हणजेच पीपल फॉर द एथिकल ट्रीटमेंट ऑफ एनिमल) या प्राणीप्रेमी संस्थेने हे जॅकेट्स बनवण्यामागील सत्य समोर आणले आहे. हे जॅकेट बनवण्यासाठी बदक किंवा हंस यांच्या छातीवरची मऊ पिसे खेचून काढली जातात. ही पिसे खेचून काढण्याची प्रक्रिया या पक्ष्यांसाठी फारच वेदनादायी असते. बऱ्याच वेळी या पक्ष्यांना मारून टाकलं जातं आणि त्यानंतर त्यांची पिसं काढली जातात. बहुतेकदा जिवंत पक्ष्यांच्या शरीरावरून हे 'डाऊन' नावाने ओळखली जाणारी पिसं काढली जातात. जिवंत पक्ष्यांचा वापर वारंवार करता येतो, त्यामुळे या पक्ष्यांना वेदना होत असल्या तरी त्यांना एकप्रकारे नरकयातनेत ढकलून ही पिसं मिळवली जातात. कित्येकदा हे 'डाऊन' काढताना पक्ष्यांच्या छाती जवळची त्वचा फाटून मांस बाहेर येते. अशावेळी पंख काढणाऱ्याद्वारे सुई दोरा वापरून पक्ष्यांची छाती शिवली जाते. ही पिसे काढताना पक्ष्यांना त्यांच्या नाजूक अवयवांच्या आधारे घट्ट पकडलं जातं, त्यांचे पाय रस्सीने बांधून पिसं काढली जातात. पक्ष्यांच्या शरीरावर पिसांची वेगाने वाढ व्हावी म्हणून त्यांच्या आहारामध्येही बदल केला जातो. पिसांच्या हव्यासापोटी नळीच्या मदतीने पक्षांच्या पोटात मक्याचे दाणे टाकले जातात. अशाप्रकारे दाणे टकल्याने त्यांच्या शरीरावर 10 पट जास्त पिसे उगवतात. पिसं मिळवण्यासाठी पकडून आणलेल्या या पक्ष्यांचा नैसर्गिक मृत्यु होईपर्यंत त्याच्या शरीरावरून अशीच पिसे काढली जातात. 'पेटा'ने केलेल्या दाव्यानुसार अशी जॅकेट खरेदी करणे आणि परिधान करण्याची कृती म्हणजे क्रूरतेला समर्थन करण्यासारखे आहे.
नाईकी (Nike) आणि आदीदास (Adidas) सारख्या मोठमोठ्या कंपन्यांकडून तयार करण्यात आलेली अशी डक डाऊ जॅकेटची रेंज किमान 10 हजार रुपयांपासून सुरु होते. या जॅकेट्सची महागडी रेंज अगदी काही लाखांनाही उपलब्ध आहे. अनेक साधारण कंपन्यांची निर्मिती असलेली ही जॅकेट्स 4000 रुपये ते 5000 रुपयांमध्ये उपलब्ध आहेत. स्वेटर, शॉलपेक्षा या जॅकेट्सची किंमत खूपच जास्त आहे. डाउन जॅकेटची आवश्यकता न्यूजीलैंड, कॅनडा, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, चीन आणि व्हिएतनामसारख्या थंडी जास्त असलेल्या देशांमध्ये असते. भारतात त्या तुलनेत गारठा कमी असल्याने या जॅकेट्सचा खप इतका होत नाही. केवळ फॅशनसाठी आणि छान दिसण्यासाठी या पक्ष्यांना असा अमानवी त्रास देणं योग्य आहे का? हा प्रश्न उरतोच.