बघा जमतंय का...

कोरोनाच्या काळात गर्दी धोक्याची ठरू नये म्हणून सगळीकडेच प्रशासनाने प्रयत्न केले. पण तरीही गर्दी झालीच.

Updated: Oct 19, 2021, 01:33 PM IST
बघा जमतंय का... title=

सुवर्णा धानोरकर, झी 24 तास : गणेशोत्सव जवळ आला निर्बंध शिथिल झाले आणि आपण एखाद्या कैद्याची सुटका झाल्यासारखे सुसाट सुटलो. यामुळे पुढे काय वाढून ठेवलंय याचा विचार करण्याच्या मनस्थितीतच आपण नाही. कोरोना काळात सगळ्यांनी जवळचे, दुरचे सखेसोबती गमावले. पण आपण मुळातच उत्सवप्रिय त्यामुळे त्या दु:खातून बाहेर पडण्यासाठी आपण बाप्पाचा आधार घेतला. बाप्पाच्या आडे मनाला विरंगुळा मिळवण्याचा प्रयत्न केला. म्हणून आपण घाबाहेर पडलो. बाप्पासाठी भरपूर खरेदी केली. सोबत आपलीही शॉपिंग झालीच. बाप्पाच्या दर्शनाला घरातंही गर्दी झाली. दीड दिवस, पाच दिवस आणि दहा दिवस घरात राबता... दहा दिवस आनंदाचे, भेटीगाठीचे, गुजगोष्टींचे गेले. दहावा दिवस गर्दीचा...

ही गर्दी धोक्याची ठरू नये म्हणून सगळीकडेच प्रशासनाने प्रयत्न केले. पण तरीही गर्दी झालीच. ही गर्दी होती गणेश भक्तांची... ही गर्दी होती नाचायची हौस असणा-यांची... ही गर्दी होती गर्दीची नशा असणाऱ्यांची... ही गर्दी होती या नशेत धुंद होणाऱ्यांची... ही गर्दी होती या गर्दीत हात साफ करताय येतोय का हा विचार आणि कृती करणा-यांची आणि हो एक छुपी गर्दीही होतीच. त्या गर्दीचा आकडा आणि परिणाम काही दिवसात कळतीलच.

पण पुढचे काही दिवस प्रशासनाच्या मनातही गर्दी असेल. ही गर्दी असेल पुढच्या नियोजनाच्या विचारांची...ही गर्दी असेल आता रुग्ण वाढले तर काय! या विचारांची... ही गर्दी असेल ऑक्सिजन बेड, आयसीयू आणि औषधाच्या नावांची...ही गर्दी असेल कोविड केअर सेंटर्सच्या नावांची...

ही गर्दी जशी आपल्याला धुंद करते तशी ती आपला तोलही ढासळवते. तोल गेला की पुढचं गणित बिनसतं. हे आपण या काळात बघतोच आहे. प्रत्येकाने काही ना काही स्वप्न रंगवली. पण एखाद्याला कोरोना झाला की मग त्याच्या स्वप्नांना एकतर पुढची तारीख मिळते किंवा मग त्याला एक्सपायरी डेट असेल तर सगळंच संपल्याची भावना मनात गर्दी करते. 

इथून पुढचे काही दिवस सगळ्यांनी सांभळून राहा, काळजी घ्या, गरज वाटली, शंका वाटली तर टेस्ट करा. पण आपण खरंच टेस्ट करणार का... जर आपल्या मनातही गर्दी झाली तर मग टेस्टपासून पळणंच सुरु होईल. कोरोना झाला तर, क्वारंटिन सेंटर, हॉस्पिटल, औषधं, पोस्ट कोरोना काय काय होईल या सगळ्या प्रश्नांची मनात गर्दी... जर झालाच कोरोना तर 19 सप्टेंबरची गर्दीत आपण केलेली मौज आठवेल... आपण नियम पाळायला हवे होते हेही आठवेल... 

पण आपला स्वभावच मुळात वाहवत जाण्याचा. आपण नियम, निर्बँध कायम नजरेआड करतो. जाऊ दे, एका दिवसाने काय फरक पडतोय माझ्या एकट्याने काही गर्दी होत नाही... ही वृत्ती मारक ठरते. आजवर तेच झालंय. हीच वृत्ती आपल्याला घातक ठरली. मग यातून शहाणपण नको का घ्यायला? यातून नको का काही शिकायला? सगळंच नजरेआड करुन कसं बरं चालेल? 

आता डोक्याला हात मारून घ्यायची वेळ येऊ द्यायची नाहीये. त्यामुळे किमान आतातरी भानावर येऊया... आतातरी लक्षणं जाणवली तर टेस्ट करून घेऊया... म्हणजे कुणामुळे तरी आपल्याला झालेलं इन्फेक्शन आपल्याकडून दुसऱ्या कुणाला होऊ नये याचा विचार करूया...आणि हो आपल्या आसपासच्या कुणालाही हे सगळं सागणं शक्य असेल तर त्यांनाही सांगूया... हे अक्कल शिकवणं नव्हे किंवा फुकटचे सल्ले देणंही नव्हे... हे आहे एकमेकांना तंदुरुस्त आणि कोरोनामुक्त ठेवण्यासाठीचं सांगणं आणि मागणंही... बघा जमतंय का...