सुवर्णा धानोरकर, झी मीडिया, मुंबई : प्रत्येकाच्या तोंडी सध्या रेमडेसिवीर (Remedisivir) हेच नाव आहे. बोलायला जेवढं कठिण तेवढंच मिळवायला कठिण आणि खिसा हलकं करणारं इंजेक्शन अशी या रेमडेसिवीरच्या इवल्याशा बाटलीची ख्याती. देशात जिथे जिथे म्हणून रुग्ण वाढले तिथे तिथे या रेमडेसिवीरसाठी रुग्णांचे नातेवाईक जंगजंग पछाडतायत. खरचं हे रेमडेसिवीर कोरोनावर इतकं फायदेशीर ठरतंय का? याची उत्तरं जाणून घेऊया...
रेमडेसिवीर म्हणजे एक अँटीव्हायरल आहे, आणि कोरोना हा व्हायरस आहे. अमेरिकेतल्या गिलीएड सायन्सेस या कंपनीनं हे रेमडेसिवीर तयार केलंय. हेपेटायटीस आणि सार्स आणि इबोलावर उपचारांसाठी साधारण दशकभरापूर्वी रेमडेसिवीरची निर्मिती केली. पण गंमत म्हणजे रेमडेसिवीर बाजारात आणायला परवानगीच नव्हती. पण कोरोनाच्या काही रुग्णावर याचा चांगला परिणाम होताना दिसला आणि परिस्थिती बदलली. आज दहा वर्षानंतर हेच रेमडेसिवीर म्हणजे कोरोनामुळे संगळ्यांना सळो की पळो करुन सोडतंय. हवी ती किंमत रेमडेसिवीरसाठी प्रत्येकजण मोजायला तयार आहे.
आपण भारतीय एका गोष्टीत माहीर आहोत. ती म्हणजे कुठल्या गोष्टीची वस्तुची औषधाची पदार्थाची अगदी कशाचीही चर्चा जोरात असली की आपल्या त्यावर उड्या पडतात. गेल्या दोन तीन आठवड्यात रेमडेसिवीरचंही तसंच झालंय. जो तो रुग्ण रेमडेसिवीर... रेमडेसिवीर... करतोय.
खरचं या रेमडेसिवीरनं कोरोना बरा होतो का...? कोरोनावर रेमडेसिवीरच एकमेव औषध आहे का...? याचं उत्तर तज्ज्ञ स्पष्टपणे 'नाही' असंच देतात. ट्रायल बेसिसवर गेल्या वर्षभर सगळी औषधं, दीड वर्षाच्या कोरोना बाळावर वापरली जातायत.
काही महिन्यांपूर्वीपर्यंत मलेरियासाठीची औषधं देशातून मोठ्या प्रमाणात निर्यात केली गेली. देशातल्या कोरोना रुग्णांवरही त्याचा वापर केलाय. त्यानंतर WHOनं त्याबाबत साशंकता व्यक्त करताच सगळं शांत झालं. नोव्हेंबरच्या सुमाराला रेमडेसिवीरबाबतही WHOनं असंच काही वक्तव्य केलंय.
आता सध्या रेमडेसिवीर जोरात आहे. ज्याची चलती त्याचा साठा केलाच पाहिजे असा जणू भारतातला नियम बनलाय. त्यामुळे रेमडेसिवीरचीही साठेबाजी झाली आणि होतेय. त्यामुळे किंमतीही वाढल्या आणि चोरीही. एखाद्या वस्तुची मागणी वाढली ती घातक ठरत जाते. हे वास्तव आहे. कारण त्यावर चोरमनाच्या, नफेखोराच्या नजरा जातात, त्याचे भाव वढारतात. त्याचा तुटवडा निर्माण होतो. हे चक्र आहे (शास्त्र असतं ते). पण अशा वेळी जीवापेक्षाही आपली तुंबडी भरणं या साठेबाजांना, चोरांना, नफोखोरांना महत्त्वाचं वाटतं. तुमचा जीव त्यांच्यासाठी कवडीमोल.
कोरोना व्हायरसची संख्या वाढवणाऱ्या एन्झाइमला रेमडेसिवीर रोखतं. त्यामुळे रुग्णाच्या शरीरात कोरोना व्हायरस पसरण्यापासून रोखला जातो. अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना कोरोना झालेला त्यावेळी त्यांच्यावरही रेमडेसिवीरचा वापर केलेला.
भारतात रेमडेसिवीरचं प्रोडक्शन सन फार्मा, झायडस कॅडिला, सिप्ला डॉ. रेड्डीज अशा नावाजलेल्या कंपन्या करतात.
कोरोनाच्या गंभीर रुग्णांवर रेमडेसिवीर इंजेक्शनचा वापर होतो. यासाठी रुग्णांचं वय 12 वर्षांच्या पुढे आणि वजन 40 किलोहून अधिक असायला हवं. एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी रेमडेसिवीरचा सर्रास वापर खासगी रुग्णालयामध्ये होतोय. कारण रेमडेसिवीर ही खासगी रुग्णालयांसाठी सोन्याची कोंबडी आहे.
हे प्रकार लक्षात येताच सरकारनंही तातडीनं पावलं उचलली. प्रशासनानं यावर निर्बंध आणण्याचे प्रयत्न सुरु केलेयत. खरंतर सुरुवातीपासूनचं कोरोनावरची सर्वच औषधं शासकीय रुग्णालयांमध्येच मिळतील अशी सोय करायला हवी होती. तसं झालं असतं तर रेमडेसिवीरच्या किंमती, काळाबाजार, साठेबाजी आणि नंतर तुटवडा निर्माण झालाच नसता.
कुठल्याही गोष्टीचे जसे फायदे असतात तसेच तोटेही असतात. तसेच रेमडेसिवीरचेही तोटे आहेतच. रुग्णाला रोज एक यानुसार किमान 5 रेमडेसिवीर दिली जातात. पण रेमडेसिवीर दिलेल्या रुग्णांवर याचे काय साईडइफेक्ट्स होतात ? यावरही अभ्यास सुरु आहे. त्यामुळे ते साईडइफेक्ट्सही लवकरच आपल्या समोर येतील.