close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

सरंजामदारांमुळे राष्ट्रवादी सर्वसामान्यांपासून 'वंचित'

बिनधास्त तरूणांना साद घालणारं भाषण करतायत. हे चित्र कदाचित शरद पवार विरोधकांना पटणार नाही, किंवा पचवता येणार नाही. पण याकडे दुर्लक्ष देखील करता येणार नाही.

जयवंत पाटील | Updated: Sep 23, 2019, 09:02 PM IST
सरंजामदारांमुळे राष्ट्रवादी सर्वसामान्यांपासून 'वंचित'

जयवंत पाटील, झी मीडिया, मुंबई : शरद पवारांच्या सभेला सध्या गर्दी होत आहे, शरद पवारांच्या सभेत तरूणांचा वेगळाच उत्साह दिसून येत आहे. शरद पवारही नुकतेच राजकारणात आल्यासारखे बिनधास्त तरूणांना साद घालणारं भाषण करतायत. हे चित्र कदाचित शरद पवार विरोधकांना पटणार नाही, किंवा पचवता येणार नाही. पण याकडे दुर्लक्ष देखील करता येणार नाही. शरद पवारांच्या राष्ट्रवादीला गळती लागली हे खरंय. शरद पवारांच्या राजकीय कारकिर्दीतली ही पक्षासाठी सर्वात मोठी नामुष्की, हानी आहे, असं देखील म्हणता येईल. 

तर दुसरीकडे विरोधकांनी नकळतपणे राबवलेली ही पक्षातील सर्वात मोठी 'स्वच्छता मोहिम' आहे, हे देखील नाकारता येणार नाही, कारण पक्षातून जवळजवळ सर्वच 'राजकीय सरंजामदार' आपोआपच साफ झाले आहेत.  पण पवारांचा आता खरा लढा हा, भाजप किंवा शिवसेनेशी नाही, तर त्यांनीच वाढवलेल्या संरजामदारांविरोधात आहे.

कारण सर्वसामान्यांच्या दृष्टीकोनातून शरद पवारांनी आर आर पाटील यांच्यानंतर, सर्वसामान्य घराचं एकही रोपटं पक्षात लावलं नाही. लावलं असेल तर ते नावारूपास आलं नाहीत म्हणून ते 'वंचित'च राहिलंय. 

राष्ट्रवादी हा 'मराठ्यांचा पक्ष' असं सहज बोललं जातं. पण सहज पडताळून पाहा, चिकित्सा करा. राष्ट्रवादीतील मंत्री मराठ्यांएवढेच इतर समाजातील देखील होते. किंबहुना तेवढेच शिवसेना आणि भाजप युतीचं सरकार असताना त्यांच्या मंत्रिमंडळातही होते, पण राष्ट्रवादीलाच मराठ्यांचा पक्ष म्हटलं गेलं.

पण राष्ट्रवादीकडून मराठ्यांचा पक्ष हे म्हणणाऱ्यांना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष विरोध झाला नाही. राष्ट्रवादी हा मराठ्यांचा पक्ष म्हणता येणार नाही, पण तो राजकीय सरंजामदारांनी भरलेला पक्ष झाला होता, हे नक्कीच म्हणता येईल.

पवारांच्या आजूबाजूला सत्तेची फळं चाखण्यासाठी आतापर्यंत राजकीय सरंजामदारच होते. जेव्हा राष्ट्रवादीत सरंजामदारच मंत्रीपदं घेऊ लागली, तेव्हा नक्कीच ते सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागणारं होतं. 

सरंजामदार कधीच पक्षाचा विचार सर्वसामान्यांमध्ये रूजवू शकत नाहीत, आणि मग पक्षाला मरणाच्या कळा येतात, आणि लढा न देता जीव लपवत सरंजामदार सैरावैरा धावत सुटतात, हे आता सिद्ध झालं आहे.

राष्ट्रवादीला गळती लागल्यानंतर, शरद पवारांवर अनेकांनी आपल्या लेखातून ताशेर ओढले. शरद पवारांची ओळख ही शेतकरी नेता अशी आहे. याच ओळखीवर ते आतापर्यंत तग धरून आहेत.

पवारांनी शेतीशिवाय क्रिकेटच्या राजकारणात जगमोहन दालमिया यांच्यावर विजय मिळवला. ही नक्कीच मोठी बाब होती. क्रिकेटच्या राजकारणात वर्षानुवर्ष मुरलेल्या मुंबईकरांना जमलं नाही, ते गाव खेड्यातून आलेल्या पुढाऱ्याने करून दाखवलं, तो एक इतिहास आहे. 

पण पवारांचा मूळ विषय हा शेती होता. हे कदाचित ते 'लवासा'च्या काळात ते विसरले असावेत, त्यासाठी त्यांना आता संघर्ष करावा लागतोय की काय?

राष्ट्रवादीची आताची जी स्थिती आहे, ती सर्व काही संपल्यासारखी दिसत नाही. कारण सरंजामदारांचा विळखा सुटल्यानंतर पवारांना आता सर्वसामान्य स्पष्ट दिसू लागले आहेत. म्हणूनच वयाच्या ८० व्या वर्षी, २१ वर्षाच्या पुढाऱ्याला लाजवतील, अशी भाषण पवार करतायत आणि तरूणांचा तेवढाच मोठा प्रतिसाद त्यांना मिळतोय. पण पवारांचा आता खरा लढा हा त्यांनीच वाढवलेल्या संरजामदारांविरोधात आहे.