close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

गुलाबी कागद, माळवाले बाबा आणि आई...

झी 24 तासच्या वृत्तनिवेदिका सुवर्णा धानोरकर यांनी त्यांचा वैयक्तिक अनुभव या ब्लॉगच्या माध्यमातून शेअर केला आहे.

गुलाबी कागद, माळवाले बाबा आणि आई...

सुवर्णा धानोरकर, झी मीडिया, मुंबई : एकदा का आई झालात की वर्षभरात नेकलेस, लिपस्टीक, पावडर, बांगड्या, इअररिंग्ज असं सगळं मोलाचं साहित्य कुठेतरी लपवून ठेवावं लागतं. प्रत्येक आईला हे करावंच लागतं. कुणी लॉकरमध्येच ठेवेल, कुणी कपाटात कपड्यांमध्ये लपवून ठेवेल, कुणी अजून कुठेतरी. उद्देश एकच आपल्या पिल्लूच्या हाती काही लागू नये. पण एकदातरी हा खजिना लेकरांच्या हाती लागतोच. कारण फिरायला जाताना आईनं घातलेले कानातले, नेकलेस, बांगड्या, ब्रेसलेट आणि लाल गुलाबी ओठ त्या चिमुकल्या, पण चाणाक्ष नजरेतून सुटत नाही, आणि मुळातच शोधक वृत्ती म्हटल्यावर आई हे सगळं आणते कुठून, याचा शोध सुरूच होतो. 

ज्या दिवशी युरेका... युरेका... होतं ना त्या दिवशी आई सगळं पाहून लेकराला उरका... उरका... ओरडायला लागते. नाहीतर तो पसारा उरकताना तिची त्रेधातिरपिट उडते. ते चित्र पाहून तिला जणू फरताळातली आजीची पैठणी गमावल्याचं दुःख होतं. बरं आईच ती कधी धपाटे घालून सगळं साहित्य लेकराकडून हिसकावून घेईल, एखादी ओरडेल, एखादी लबाडी करून एक एक वस्तू गुपचूप लपवेल, एखादी प्रेमानं समजावून सगळं साहित्य घेईल, एखादी थोडा वेळ खेळू देईल, पण लेकराच्या वृत्तीनुसार तिला स्वभावात बदल करावा लागतो बरं! एखादं लेकरू दिलीप कुमारसारखं असेल तर आई खेळू देईल थोडा वेळ आणि एखादं गोविंदासारखं असेल तर मग आईला लबाडी करावीच लागेल. एखादं त्या हेराफेरीमधल्या राजूसारखं असेल तर मग ते धपाटेच खाईल.

लेकरांना पण किती आनंद मिळतो या वस्तू खराब करण्यात. त्यांच्या लेखी ते खराब करणं नसतंच. सर्वात प्रिय टिकल्या आणि लिपस्टिक. त्या टिकल्यांसाठी कधी जमीन कपाळ होऊन जाते तर कधी लेकरांच्या इवल्याश्या कपाळावर, गालावर टिकली गुदगुल्या करते. लिपस्टिक बिचारी. तिचे हालहाल होतात. आई जितक्या नाजूक हातानं लिपस्टिक लावते तितक्याच क्रूरतेनं चिमुकले हात लिपस्टिक चेहऱ्यावर, जमिनीवर फासतात. हातभर बांगड्या, गळाभर माळा घातल्या की नटली ही मंडळी. मग त्यांच्याकडे पाहून हसावं, रडावं की पाहातच राहावं हेही कळत नाही. 

माझी कुणी एक नातेवाईक आहे. तिच्या मुलाला लिपस्टिक दिसू नये म्हणून तिनं भारीच शक्कल लढवली. बाहेर जायचं असलं की संधी मिळताच थोडी लिपस्टिक कुठेतरी लावून ठेवायची. अलमारीला कोपऱ्यात थोडी लावून ठेव, कधी एखाद्या भांड्याला लावून ठेव, कधी अजून कुठे... आणि बाहेर जायची तयारी झाली की पटकन जाऊन त्या स्पेशल लिपस्टिकवर बोट फिरवायचं आणि तेच बोट लीलया ओठांवर फिरवायचं. मग काय ! लेकराला वाटेल की  आईनं जादू केली. ते आपलं जादू कशी केली ! या विचारात, आई लेकराला उल्लू बनवलं या आनंदात. कुणा आईची अजून काही शक्कल असेलच.

पण मला ना ही लपवाछपवी कधी पटलीच नाही. आजवर टिकल्यांची कितीतरी पाकीट मी वापरायच्या आधी जमिनीवर चिकटलीत. लायनर पेननं जमिनीवर, वहीवर चित्र उमटली. कधी दाढी मिशी काढली. कधी चिमुकल्या अंगभर रेघोट्या ओढून अर्ध लायनर पेन संपले, कळलंच नाही. पण ते पाहून कधीच राग नाही आला.

वस्तू संपली, खराब झाली असं कधी ध्यानीमनी आलं नाही. लिपस्टिक तर कधी गालावर, डोळ्यावर, कपाळावर तर कधी ओठांवरती विसावली. नेकलेस तर लेकरानं कधी करगोट्यासारखे वापरले, गळ्यापासून बेंबीपर्यंत अंगभर घातले आणि माळवाले बाबा म्हणून मिरवलं. तर कधी आवडले म्हणून खेळण्यांच्या बास्केटमध्ये ठेवले. माझं आवडतं पोपटी रंगचं ब्रेसलेट तर अँकलेट म्हणून घातलं आणि तुटल्यावर मग खेळण्याच्या बास्केटमध्ये विसावलं. सध्या जोर लिपस्टिक, क्लचर, टिकटॅक पिन्स, नेलपेन्ट आणि कॉम्पॅक्टवर आहे. रोजच यातलं काहीतरी कपाटातून बाहेर येतं. त्या क्षणाला जो घरात असेल त्याच्यावर मग हा खजिना वापरून प्रयोग केले जातात. 

मी तर कित्येकदा गिनीपिग झाले, अगदी आताही होते. आठवड्यातले 5 दिवस किमान 8 तास निष्णात मेकअप आर्टिस्टन  केलेला मेकअप मिरवते मी. सजून धजून फोटो काढते. इंस्टा, फेबुवर लाइक्स मिळवते. पण जी मजा या कोवळ्या हातांनी केलेल्या मेकअपमध्ये आहे ना, ती इतर कुठल्याही मेकअपमध्ये नाहीच. खरं की नाही? (अरूण, नंदा, उदय, प्रवीण, जगदिश, प्रसाद तुम्हा सगळ्या मेकअपदादांची माफी मागते. तुमच्या मेकअपपेक्षा माझ्यासाठी हा मेकअप स्पेशल असतो.)

बरं ही आताची मुलं गर्भातूनच सगळं शिकून येतात की काय असं वाटतं कधी कधी. पाच सहा वर्षांचे असताना आमच्या पिढीला अक्कल होती ती फक्त खेळायची, माकड उड्या मारत दिवसभर इकडे फिर तिकडे फिर, कोणाच्यातरी दारावरची बेल वाजून धूम ठोक, लपाछपी, कांदा फोडी, चिकटमावशी, विषांमृत, डबा एक्सप्रेस, साखळी साखळी असे अनेक खेळ होते. (घरात खेळायचं तर डॉक्टर डॉक्टर खेळ होताच) आम्हाला तेव्हा लिपस्टिक माहीत नव्हती. कॉम्पॅक्ट, लायनर, परफ्युम, डिओ या गोष्टी तर आमच्या गावीच नव्हत्या. 

आम्हाला माहीत होते पॅराशूटचे निळ्या बाटलीतले खोबरेल तेल, लाईफबॉयचा गुलाबी साबण, शिकाकाईचा फिकट गुलाबी साबण, नंतरच्या काळात चिकचा पिवळा घट्ट शाम्पू, पॉण्डस पावडर, विको क्रीम आणि हो सणाच्या दिवशी मोतीचा गोल साबण, जास्मीन सुवासिक तेल, लाल किंवा गुलाबी नेलपॉलिश, आणि काळ्या चपट्या चौकोनी बाटलीतला मॅग्नेटचा सेंट. आहाहा ! सांगतानाच मॅग्नेटचा दरवळ नाकाजवळ. माझे पप्पा तर मॅग्नेट कपाटातल्या लॉकरमध्ये ठेवायचे. आणखी एक लहान मुलांना कायम आवडणारी वस्तू म्हणजे आई बाबांचा गॉगल किंवा चष्मा. आज सगळ्यांच्या डोळ्यावर गॉगल दिसतो. 

आम्हाला मात्र तो फक्त दुकानात दिसायचा. एकदा कुणाचातरी गॉगल ताईला सापडला. ती असेल आठ दहा वर्षांची. गॉगलचं वेड होतंच. त्यामुळे तिला तर घबाड हाती लागल्यासारखं झालेलं. दिवसभर घरात गॉगल लावून फिरत होती. गॉगल इतका आवडलेला की सू करायलाही गॉगल लावूनच गेली. आणि काय पडला ना! इतका वेळ मी तोंड पाडून बसलेली मग ती तोंड पाडून बाहेर आली, तिचा तो चेहरा मला अजूनही आठवतोय. त्यावेळी मी आणि स्मिताताई खूप हसलो. दिवसभर आम्हाला चिडवून चिडवून न थकलेली सवी ताई गॉगल पडताक्षणी हिरमुसली.

मुलांना मोठ्यांच्या चपलांचंही भारी वेड. त्यात त्या हिल्सच्या असल्या की त्यांचा कॅटवॉक बघण्यासारखा. माझ्या मुलाने पेन्सिल हिल्सची चप्पल पहिल्यांदा पाहिली तेव्हाच तिच्या प्रेमात पडला. तेव्हा पठ्ठ्याचं वय असेल जेमतेम दीड दोन वर्ष. चप्पल पाहताक्षणी, 'आईईईई आपण तुला अशी काट्याची चपल घेऊ' एक क्षण काट्याची चप्पल म्हणजे काय हेच कळेना. पण जेव्हा कळलं तेव्हा हसून हसून पोट दुखलं. पण जेव्हा ही काट्याची चप्पल घेतली, गडी खूश! आताही ती चप्पल घालायला घेतली की एकदा तरी इवलेसे पाय त्यात जातात मगच ती माझ्याकडे येते. (म्हणून मी आता ती चप्पल पेपरमध्ये जपून ठेवते)  

या चिल्लर पार्टीला नेलपॉलीशचीही भारी आवड. माझी भाची संस्कृती, तिचा तर माझ्या नेलपॉलीशवर कायम डोळा... तेव्हा तर ती लहान होती पण आता कॉलेजला जाते तरी फार काही बदललेलं नाही. तिच्या सोबतीला माझं लेकरु आहेच. पण नशीब फक्त ट्रान्सपरंट नेलपॉलीश लावून हवी. नाहीतर त्या इवल्या इवल्याश्या नखांवर तुम्हाला निळी, लाल, गुलाबी नेलपॉलीशही दिसली असती.

बाबाच्या कपड्यात तर लेकरं कसली गोड दिसतात. आईच्या साड्या, बाबाचे शर्ट बच्चेकंपनीला प्रिय. आई बाबा झाल्याचा फिल येतो म्हणे... साधी मिशी काढली बाबाचा शर्ट घातला की हे झाले इवलेसे बाबा. चार बांगड्या, आईच्या हिल्सच्या चप्पल, लिपस्टिक आणि साडी नेसली/ ड्रेस घातला की झाल्या या इवल्याशा आई. किती सोपं वाटतं ना मुलांना आई बाबा होणं ! पण जावे त्याच्या वंशा...

घरी कुणी नव्हतं म्हणून एकदा मुलाला ऑफिसला सोबत नेलं. स्वाभाविकच मेकअपरुममधलं वातावरण आवडलं पठ्ठ्याला. तिथे मिशी काढून घे, दाढी काढून घे हेच सुरु होतं. ऑफिसमधून निघायच्यावेळी म्हटलं चला पुसा आता मिशी, तर 'नाही. मी बाबा दिसतो ना, राहू दे.' लोकल ट्रेन काय आणि स्कुटीवर काय अशा आविर्भावात उभा की मी किती छान दिसतोय ना ! ज्याचं लक्ष जात होतं तो प्रत्येकजण हसतं होता. एक क्षण मला विचित्र वाटलं, हे काय, असं घेऊन जातोय आपण लेकराला? लगेच वाटलं अरे येणाऱ्या जाणाऱ्याच्या चेहऱ्यावर हसू फुलवतंय आपलं लेकरू हे काय कमी आहे. असा विचार केल्यानं हे आनंदाचं फुलपाखरू घरी पोहचेपर्यंत कित्येकांच्या चेहऱ्यावर हसू फुलवत होतं... मग मीही त्याच्यासोबत अशाच तोऱ्यात वावरले, जणू काही हा खरंच बाबा आहे. माझा इवलासा बाबा.

पूर्वी, सराफ गुलाबी पातळ कागदात दागिने द्यायचे. आम्ही ते कागद जपायचो. कारण सणाच्या दिवशी त्याच कागदाला ओठावर चोळून लिपस्टिकचा फील आणायचो. तशी आमची पिढी फारच जुगाडू डॉट कॉम. पण आम्हीच आता आमच्या मुलांना फार कष्ट करू देत नाही, त्यांच्या मनात यायच्या आत आम्हीच त्यांना वयात आणतो, दुसऱ्या तिसऱ्या वर्षीच लिपस्टिक, परफ्युम देतो. आम्हाला त्यांना कुठल्याही स्पर्धेत मागे ठेवायचं नाहीये. शेंबुडही पुसता न येणारी मुलं सर्वगुण संपन्न हवीयत. 

सर्वगुणांच्या लिस्टमध्ये माणुसकी मात्र आम्ही ऑप्शनल ठेवतो. का ? खरंतर आज आम्ही या अचल वस्तुत जास्त गुंतत चाललोय. त्यांनी स्पर्धेत कायम पुढे असावं, त्यांनी कायम यशच मिळवावे असा आमचा अट्टाहास. त्यासाठी सगळं देऊ पण आमची लिपस्टिक, दागिने खराब केलेले चालणार नाहीत. जीवापेक्षा आम्हाला मोबाईल प्रिय, पैसा प्रिय, मग काय, माणुसकी ऑप्शनल राहणारच. लिपस्टिक, मेकअपच्या या लहानसहान गोष्टीत आम्ही अडकतो. 

माफ करा रे बाळांनो ! आम्ही गर्भात तुम्हाला खूप जपतो. तिथेच तुम्हाला मोबाईल, टीव्ही, लॅपटॉपचं प्रशिक्षण देतो. मेकअप कसा करायचा तेही शिकवतो. पण माणुसकीचे संस्कार देत नाही. आनंद कसा मिळवायचा आणि सर्वदूर त्याचा सुवास पसरवायचा ते शिकवत नाही. म्हणून तर तुम्ही जेव्हा ही शंभर दोनशे रुपयाची लिपस्टिक हातात घेता तेव्हा धपाटे खाता. त्याच क्षणी तुम्हाला कळून चुकतं की जीव या शंभर दोनशेच्या वस्तूतच अडकवायचा. जीवाला जीव नाही, वस्तूला जीव लावायचा. माफ करा! आम्ही असफल पालक. आम्ही अनुभवलेल्या बालपणापासून तुम्हाला दूर ठेवतो...

हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला याबाबत तुम्ही लेखकाशी संपर्क करु शकता.

suvarnamdhanorkar@gmail.com
• TWITTER: @suvarnayb
• FACEBOOK: /suvarnamdhanorkar
• INSTAGRAM: /suvarnadhanorkar
• BLOG: suvarnadhanorkar.blogspot.com