रावतेसाहेब बाळासाहेबांनी ही 'शिवशाही' बंदच केली असती...!

 'शिवशाही' या एसटी महामंडळाच्या नव्या बसने तुम्ही 'रात्रीचा प्रवास' करण्याचं 'धाडस' केलं आहे का? हे धाडस अजिबात करू नका ते जीवघेणं ठरू शकतं.

Updated: Aug 15, 2018, 12:52 PM IST
रावतेसाहेब बाळासाहेबांनी ही 'शिवशाही' बंदच केली असती...!

जयवंत पाटील, झी मीडिया, मुंबई : 'शिवशाही' या एसटी महामंडळाच्या नव्या बसने तुम्ही 'रात्रीचा प्रवास' करण्याचं 'धाडस' केलं आहे का? हे धाडस अजिबात करू नका, कारण ते जीवघेणं ठरू शकतं. एसटीच्या सुरक्षित प्रवासावर माझा नक्कीच विश्वास आहे. मात्र 'शिवशाही' बसने प्रवास केल्यानंतर,  या विश्वासाला तडा जातोय. हे माझ्या अनुभवातून आलं आहे. हा माझाचं नाही, आता शेकडो, हजारो लोकांचा अनुभव होत चालला आहे. याची कारणं देखील तेवढीच गंभीर आहेत.

बाळासाहेब आवर्जुन ही काळजी घ्यायचे...!

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना शिवसेना पदाधिकारी मुंबईत भेटायला यायचे, आणि संध्याकाळी भेटून परत गावी जायला निघायचे, तेव्हा बाळासाहेब त्यांना आवर्जुन विचारायचे, 'आता घरी जाण्याचा प्रवास कधी करणार?'. तेव्हा भेटायला आलेल्या मंडळीने जर सांगितलं की, 'आम्ही आज रात्रीच निघणार आहोत'. तेव्हा बाळासाहेब म्हणायचे, 'मोटारीचा प्रवास असेल, तर रात्री जावू नका. सकाळी निघा, थांबायची सोय नसेल, तर करू या. रात्रीचा प्रवास धोक्याचा असतो. जास्त अपघात रात्रीच होतात'.

शिवशाहीचा एक 'किस्सा' नाही 'किस्से'

आता शिवसेनेचे सरकारमधील परिवहन मंत्री दिवाकर रावतेसाहेब यांच्या 'शिवशाही बस'चा किस्सा ऐका.  शिवशाहीचा तसा एक 'किस्सा' नाही, तर अनेक 'किस्से' आहेत. या सर्व किस्यांचं किस पाडून सांगण्याचा उद्देश एकच आहे, 'प्रवासी सुरक्षितता'.

'शिवशाही'च्या सुरक्षित प्रवासावर प्रश्न चिन्हं

'शिवशाही'च्या सुरक्षित प्रवासावर प्रश्न चिन्हं लागलं असताना, प्रवास करण्याचं धाडस मी करून पाहिलं, यासाठी रात्री नाशिक ते मुंबईचा प्रवास निवडला. ही गाडी थेट जळगावहून येत होती. नाशिकहून या गाडीत बसलो, प्रवाशांसाठी महागडी असलेली ही शिवशाही बस  इगतपुरीजवळ घाटात अचानक थांबली. रस्त्याच्या बाजूला ही शिवशाही उभी होती. खाली उतरून पाहिलं, एक जण याचा व्हिडीओ बनवत होता.

कंडक्टर डोक्याला हात लावून बसला होता. ड्रायव्हर स्टेअरिंगवर डोकं ठेवून झोपला होता. मी कंडक्टरला विचारलं गाडी खराब झालीय का? 'कंडक्टर म्हणाला नाही साहेब, ड्रायव्हरला झोप येतेय. मी म्हटलं ठीक आहे, झोपू द्या. थोड्या वेळाने निघेल गाडी'.

जास्त पैसे देऊन, मरण विकत घेण्यासारखं

तेव्हा यावर कंडक्टर पुढे म्हणाला, 'साहेब हा ड्रायव्हर चांदवडच्या घाटातही असाच झोपला दीड तास, याची झोप पूर्णच होणार नाही, कारण हा डबल ड्युटी करतोय. हा कंत्राटी ड्रायव्हर आहे, एसटीकडून प्रशिक्षित नाही. अशा ड्रायव्हरला कमी पैसे मिळतात, म्हणून हे डबल ड्युटी करतात. याला मी ४ वेळेस चहा पाजला, तरी कधी पेंगेल सांगता येत नाही'. झोपलेल्या ड्रायव्हरचा व्हिडीओ काढणारा व्यक्ती म्हणत होता, 'एवढे जास्त पैसे देऊन, हे तर मरण विकत देतायत'.

मग दीड तासाने बस सुरू झाली, ड्रायव्हर बस चालवू लागला आणि कंटक्टर आणि काही प्रवासी ड्रायव्हर झोपत तर नाही ना. म्हणून त्याच्याकडे लक्ष ठेवत होते. कसारा घाट उतरल्यावर प्रवाशांना वाटलं, आपण बचावलो. ही बस तब्बल ४ तास उशीरा मुंबईत पोहोचली.

प्रशिक्षित ड्रायव्हर आणि सुरक्षितता हे समीकरण

शिवशाही बसचा अपघात कानावर पडणे नवीन राहिलेलं नाही. सर्वात महत्वाचं म्हणजे या गाडीवर एसटीचे प्रशिक्षित चालक नसतात. एकाच वेळी शिवशाहीच्या अनेक बस सुरू करण्यात आल्या, त्यामुळे कमी अनुभव असणारे, ड्रायव्हर म्हणून न चालणारे, असे लोक या गाड्या चालवू लागले आहेत. यात काही ड्रायव्हर पारंगत असतील, पण बहुतांश लोकांचं चालवण धोकायदायक आहे. ड्रायव्हर लोकांना पगार कमी असल्याने डबल ड्युटीज होत आहेत. तो सर्वात मोठा धोका आहे.

प्रशिक्षणानंतर खरी 'शिवशाही' 

एसटीचा प्रशिक्षित ड्रायव्हरला रात्री बस चालवताना झोपतोय, असं कधी कानावर आलेलं नाही. पण शिवशाही अशी धोक्यात सुरू करण्याची एसटी महामंडळाला का घाई लागली होती. अप्रशिक्षित ड्रायव्हरना रोजगार देऊ नका, असं म्हणण्याचा उद्देश नाही. 

पण निदान आता ऑफ सिझन असताना, त्यांना एसटी ड्रायव्हरसारखं चालकाचं प्रशिक्षण द्या, कमी पैशासाठी जास्त वेळ काम करत असतील, तर शिवशाहीचं भाडं प्रचंड वाढवलं, तर मग चालकालाही प्रशिक्षण दिल्यानंतर, द्या पैसे वाढवून. 

अखेर मुद्दा सुरक्षित 'शिवशाही एसटी' प्रवासाचा आहे. हे सर्व शिवशाहीचा मोठा अपघात होण्याआधी केलं, तर बरं होईल. आता तर सर्वांनाच पटेल, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब राहिले असते, तर ही शिवशाही बस सुरक्षित होईपर्यंत बंदच ठेवली असती.