बाल ठाकरे का लडका आ रहा है.......

अयोध्येत शरयूतीरी होणाऱ्या शिवसेनेच्या यात्रेसाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे...

Updated: Nov 28, 2018, 08:03 PM IST
बाल ठाकरे का लडका आ रहा है....... title=

प्रसाद काथे, अयोध्या : अयोध्येत शरयूतीरी होणाऱ्या शिवसेनेच्या यात्रेसाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे...त्यातच विश्व हिंदू परिषदेच्या धर्मसभेचीही भर पडली आहे. अयोध्या पुन्हा एकदा पोलिसांची छावणी बनू पाहते आहे. उध्दव यांच्या सभेला कोणतीही कायदेशीर परवानगी नाही, परंतु त्यांना राज्य सरकारच्या पाहुण्यांचा दर्जा देण्यात आला आहे...महाराष्ट्रातून शिवनेरीची माती घेऊन उध्दव ठाकरे अयोध्येकडे निघाले आहेत...इथल्या जनतेत मात्र चर्चा आहे, मुंबईसे बाल ठाकरे का लडका आ रहा है, बाल ठाकरे का लडका आ रहा है...

अयोध्येत बाबरी मशीद उद्ध्वस्त झाल्यानंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी खुलेआमपणे ठाम भूमिका घेणारा नेता अशी त्यांची ख्याती पसरली. अयोध्येतील जुने जाणतेही आज त्याचीच आठवण काढतात. त्यामुळेच शिवसेनेचे आजचे अध्यक्ष उध्दव ठाकरे अयोध्येत येणार असताना, त्यांच्याबद्दल बाल ठाकरेका लडका आ रहा है, अशा शब्दांत औत्सुक्य आहे.

शिवसेना दौऱ्यामुळे इथे ठिकठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. चौकाचौकात उत्तर प्रदेश पोलिसांनी सुरक्षा कठडे उभे केले आहेत. धार्मिक कार्यक्रमांच्या आयोजनाबरोबरच इथे सध्या पुन्हा एकदा अयोध्या आणि रामजन्मभूमी हे आस्थेचे विषय बनले आहेत.

उध्दव ठाकरे यांच्या दौऱ्याला कायदेशीर परवानगी मिळेल, याची सूतराम शक्यता नाही. सर्वोच्च न्यायालयाने रामजन्मभूमी परिसरात सभांना बंदी घातली आहे. परिणामी उद्धव ठाकरेंच्या सभा होणार नाहीत. त्यावर तोडगा काढण्यात आला आहे, तो जनसंवाद कार्यक्रमाने. रामसीताविवाह स्थळ मैदानात उध्दव ठाकरे साधुसंतांचे आशीर्वाद घेतील व तेथील जनसमुदायाला संबोधित करतील. पोलिसांची सर्व ठिकाणी अत्यंत करडी नजर आहे. प्रवेशद्वारापासून ते कार्यक्रमस्थळापर्यंत बॅनर लागलेले आहेत. पण या कार्यक्रमात चर्चा आहे विश्व हिंदू परिषदेच्या कार्यक्रमाची. नदीच्या जवळपास धर्मसभेचे एकास दोन असे बॅनर आहेत. त्यांच्या कार्यक्रमावरही प्रशासनाचे काटेकोर लक्ष आहे.

राज्याचे सरकारी पाहुणे असलेले उध्दव ठाकरे यांना झेड प्लस सुरक्षा असल्याने सुरक्षेची एकूणच जबाबदारी प्रशासनावर आहे. शिवसेनाप्रमुखांच्या दौऱ्यात त्यादृष्टीने काही बदलही करण्यात आले आहेत. शरयू नदीची आरती आटोपून हॉटेलवर परतणाऱ्या उध्दव ठाकरे यांना साधुसंतांच्या आशीर्वाद सभेला सामोरे जावे लागेल. त्यामुळे फैजाबादमधून थेट अयोध्येत पोहोचणारे उध्दव ठाकरे साधुसंतांना भेटतील. तिथेच ते शिवनेरीवरून आणलेली माती राममंदिर उभारणीसाठी देतील व त्यांचे आशीर्वाद घेतील. त्यांच्यासोबत येणाऱ्या महाराष्ट्रातून शिवसैनिकांपुढे एकच अडचण आहे ती निवासाची. कार्तिकी पौर्णिमा, विश्वहिंदूपरिषेदेचे कार्यक्रम व शिवसेनेचा दौरा या तिन्ही गोष्टी एकत्र आल्यामुळे निवास व्यवस्थेवर प्रचंड ताण आला आहे.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवसेनानेते तेथील प्रमुख मंदिरांना भेटी देत आहेत व साधुसंतांची कार्यक्रमाला उपस्थिती असावी यासाठी शिवसेना नेत्यांची कवायत सुरू आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रचंड प्रयत्न करत आहेत. बाबरी मशीद पाडल्यानंतर बाळासाहेब ठाकरे चर्चेत आले, मात्र त्यानंतर रामजन्मभूमी आंदोलनापासून शिवसेना दूर होती. आज पुन्हा शिवसेना येथे चर्चेत आली आहे. बाळासाहेब ठाकरे यांचा मुलगा म्हणून उत्तर भारतीयांच्या मनांत शिवसेनेविषयी आस्था आहे व त्यामुळे उध्दव ठाकरे यांना स्वतःची वेगळी ओळख करून द्यावी लागणार नाही. पण पाय रोवण्यासाठी माती शोधावी लागेल.

महाराष्ट्रात भाजपला शह देण्यासाठी रामाच्या आशिर्वादाची फार गरज आहे. रविवारी 25 नोव्हेंबर रोजी सकाळी प्रचंड सुरक्षेसह ते रामजन्मभूमीतून फैजाबादला जातील. फैजाबादला ते पत्रकार परिषद घेतील. अयोध्येत पत्रकार परिषद घेण्याचा त्यांचा निर्णय प्रशासनाने अमान्य केला आहे. येथे कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यावर प्रशासनाचे लक्ष आहे. रविवारचा मावळतीच्या सूर्यापर्यंत रामनामाचा जयघोष होईल व त्यातच उध्दव ठाकरे आणि शिवसैनिक मुंबईची परतीची वाट धरतील.