close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

वाळवणावरचे चिऊ काऊ...

झी 24 तासच्या वृत्तनिवेदिका आणि निर्मात्या सुवर्णा धानोरकर यांचा ब्लॉग

Updated: Apr 18, 2019, 04:03 PM IST
वाळवणावरचे चिऊ काऊ...
सुवर्णा धानोरकर, झी मीडिया, मुंबई  : करर्म कुरर्म... करर्म कुरर्म... आठवलं का काही... मला तर खूप काही आठवतंय. एखाद्या फूड फेस्टिवलमध्ये किंवा खादी ग्रामोद्योग प्रदर्शनात गेलात की अस्सल घरगुती चवीचे पापड, लोणची असा एकतरी स्टॉल दिसला की क्षणात मी फ्लॅशबॅकमध्ये जाते. बटाट्याचे वेफर्स, साबुदाणे-भगराच्या चकल्या, ज्वारीचे पापड, उडदा- मुगाचे पापड, साबुदाण्याचे पापड, कुरडया... यादी आणखी वाढेल. नव्वदच्या दशकापर्यंत सर्व घरात होणारं हे वाळवण. मार्च एप्रिलची चाहूल लागली की सगळ्या महिलांची लगबग असायची. आधी उडदा मुगाचे पापड बनवू की कुरडया की साबुदाण्याचे पापड. हे ठरवताना चाळीतल्या आळीतल्या सगळ्या बायकांचा सहभाग असायचा. आधी कुठलं वाळवण बनवायचं आणि कुण्याच्या घरचं वाळवण आधी बनवायचं याचा निर्णय व्हायचा. आयाबाया घरकाम लवकर उरकायच्या. आम्हा चिल्यापिल्यांचीही घाईगडबड सुरू असायची. उडदा मुगाचे पापड असले की घराघरातून खलबत्यात कुटल्या जाणाऱ्या पिठाचा आवाज यायचा. मिऱ्याचा तिखट झणझणीत वास अंगणभर पसरायचा. त्या दरवळानं आमचं अर्ध लक्ष खेळण्यात आणि अर्ध त्या पिठाकडे असायचं. कधी लाट्या बनणार आणि कधी खायला मिळणार...
 
एकदा का पिठ कुटून झालं की ते वळलं जायचं आणि दोऱ्यानं त्याच्या लाट्या पाडायच्या. तोवर आजुबाजुच्या बायका आपापलं पोळपाट आणि रेघांचं (पापडासाठीचं विशिष्ट लाटणं) लाटणं घेऊन हजर. आई आली रे आली की पोरंही हक्कानं तिचा पदर धरून उभी. त्या लाट्यांच्या भांड्याकडे सगळी चिल्लीपिल्ली आशाळभूत नजरेनं पाहायची. काही लबाडांचा लाट्या कशा गटवायच्या याचा विचार सुरू असायचा. सगळ्या आपापल्या सोयीनं जागा धरून बसायच्या पापड लाटायला घेतले की पोरं आईच्या कानाशी भूणभूण करायची एक लाटी दे ना.  आई, एक लाटी देऊन पोरांना पिटाळायची. पापड लाटायला जसा वेग यायचा तसतसा सुखदु:ख सांगण्याचा वेग वाढायचा. कुणी नवऱ्याचा विषय घ्यायचा तर कुणी सासुचा, कुणी नणंदेचा...
 
 गप्पा रंगात आल्या की हमखास एखादं शेंबड रडत आईच्या कुशीत शिरायचं. पिंट्यानी त्याची चांगलीच धुलाई केलेली असायची. मग पिंट्याची आई लाटणं घेऊनच पिंट्याच्या मागावर. बाकीच्या बायकांकडून पोरांचा आणि पोरांच्या बापाचा उद्धार व्हायचा. वाईट सवयीचं पोर बापावर गेलं म्हणून उद्धार केला की सगळ्या आयांना भरून पावल्यागत व्हायचं. पुन्हा पोळपाटावरच्या लाटीवर लाटण्यानं फ्रस्ट्रेशन काढलं जायचं. पण तरी पापडाची चव कधी कडू झाली नाही. उलट संसारातल्या कटूगोड आठवणीनं तो पापड आणखी चविष्ट व्हायचा.  
 
 पंख्याच्या एकसुरी भर्रभर्र आवाजात लाटण्याचा, पापड पेपरवर सुकायला टाकतानाचा आवाज आणि आयांच्या तोंडून सुखदु:खाची होणारी पखरणं या साऱ्यात दुपारची शांतता अंगावर यायची. पोरं मात्र अंगणात आनंदात खेळत असायची. आज दुपारी 'झोप रे थोडावेळ...' म्हणून आई ओरडणार नाही हा आनंदच पोरांसाठी खूप मोठ्ठा असायचा. अधेमधे चहाचे घोट घशाखाली उतरवत लाट्यांचं भांडंही रिकामं व्हायचं. थोड्याथोड्या वेळानं पंख्याखाली सुकलेले पापड एखादी बाहेर आणून उन्हात टाकायची. तेवढं काम करता करता एखाद्या तरी पोराच्या ढुंगणावर चापट्या मारून ओरडायचीच 'उनात नका रे खेळू, पापडावर लक्ष ठेवा. चिमण्या कावळे बसतील, हाकला जरा.'  पोरं पण एकसुरात 'हो...' तो काळ फारच वेगळा अख्या चाळीतली पोरं माझीच, अशी प्रत्येक आई हक्कानं ओरडायची. मारायची. पण उंबरा ओलांडून आत आला की बळेच ताटावर बसवायची. पोटच्या पोरासारखीच शेजारच्या पोरालाही पोटभर खाऊ घालायची.  
 
गव्हाच्या कुरडयांसाठी आईनं चीक काढायला घेतला की पोरंसोरं घरापासून दूर पळायची. आंबवल्या गव्हाचा वास नकोसा. पण दुसऱ्या दिवशी कुरडयांसाठी शिजवलेला चीक आधी पोरांच्या पोटात जायचा आणि मग उन्हात प्लॅस्टिकवर कुरडईच्या रुपात दिसायचा. सगळ्यांच्या घरातले पापड, कुरडया एकाच दिवशी अंगणात. त्यावर चिमण्या कावळे बसू नये म्हणून पोरांची ड्युटी. आईचा पोरांवर भारी विश्वास. 'ए पोरा खेळू नको दिवसभर, पापडावर लक्ष ठेव. कावळे चिमण्या चोच मारतील' पोरं हुश्शार. चिमण्या कावळ्यांची काय मजल पापडाला चोच लावायची. दिवसभर उन्हात राखणदारी करायची तर मोबदला नको का! म्हणून पोरंच कुरडया पापडांवर चोच मारायचे. पुन्हा जागा रिकामी दिसायला नको म्हणून पापडांची फेरफार. आईलाही हे माहीत असायचं पण आईच ती, सगळं माहीत असूनही पोरांनाच राखणदारीला ठेवायची.  

 
आताही काही ठिकाणी वाळवण केलं जातं. पण ती सर कुठे. आमच्यासारखी उनाड पोरं कुठे... आताच्या पोरांचं बालपण हरवलंय मोबाईल आणि व्हिडीओ गेममध्ये. वाळवणाला राखणदारीला ना पोरं आहेत, ना त्या पापडवर चोच मारायला चिऊ काऊ. म्हणून तर कितीही पापड कुरडया खा त्याला चवच नाही. त्याला ना पोरांच्या खट्याळ लबाडीचा वास ना चिऊ काऊंच्या चोचीची खूण. 
   

  

आजही मार्च एप्रिल आला की ते दिवस आठवतात. आयाबायांची नजर चुकवून पळवलेल्या लाट्या आठवतात. दातात अडकलेला मिऱ्याचा कण अजूनही जिभेवर चव देऊन जातो.(सुटलं ना तोंडाला पाणी ?गेली ना जिभ दातावर?)  पंख्याच्या भर्रभर्र आवाजानं सुकणारे ओलसर पापड आठवतात... थोड्या ओल्या सुकल्या कुरडयांचा लुसलुसशीत स्पर्श हातांना जाणवतो. प्लास्टिकवरून हळू हळू काढताना तुटणाऱ्या साबुदाण्याच्या चकल्या डोळ्यांपुढे येतात. ज्वारीचे पापड फाटक्या धोतरावरून काढण्यासाठी त्यावर पाणी टाकल्याचा भास होतो, त्यावेळचा पापडाचा आंबुस आणि उष्ण सुवास नाकाशी दरवळतोय. सगळं नुकतचं घडून गेल्यासारखं. पण तरीही आसपास त्याची खूणही नाही. सगळं फक्त डोळ्यांपुढे तरळतंय.