BLOG : तो नव्हे ती

कधी रस्त्याने जाताना ट्रान्सजेंडर दिसले की आपली प्रतिक्रिया काय असते? नाकं मुरडतो ना आपण किंवा मग तुच्छ कुणीतरी समोर असल्याची त्यांना जाणीव करून देतो. पण जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे

Suvarna Dhanorkar सुवर्णा धानोरकर | Updated: Jan 24, 2023, 08:37 AM IST
BLOG : तो नव्हे ती  title=
transgender to advocate journey story Problems faced by transgender in society article by suvarna dhanorkar marathi news

सुवर्णा धानोरकर : बातमीच्या निमित्तानं पुन्हा एकदा ट्रान्सजेंडर समाजाला जवळून बघता आलं. अभ्यासता आलं. जेवढी दु:ख एखाद्या बलात्कार पीडित महिलेच्या वाट्याला येतात ना... त्याच तीव्रतेची दु:ख ट्रान्सजेंडरच्या वाट्यालाही येतात. घरचे नाकारतात, समाजानं तर आधीच हसं करून ठेवलेलं असतं. समाज म्हणण्यापेक्षा मी आता इथून पुढे आपण असाच शब्द वापरते.

एखाद्या मुलाचं जरा म्हणून चालणं बदललं की आपल्या भुवया उंचावणार. बायल्या म्हणून आपण हिणवणार. त्याला वाटतंय मुलीसारखं सजावं, नटावं तर नटू द्या. पण नाही! आपण जाणार त्याच्या आई वडिलांना टोचून टोचून बोलायला. एखादा समंजस असेल तर त्याही परिस्थितीत मुलांची साथ सोडत नाही. आपण त्यांच्या नाकीनऊ आणतो आणि मुलांना वाळीत टाकायला भाग पाडतो.

बरं त्यानंतर तरी त्यांचं जगणं सुसह्य असतं का... तर त्याचं उत्तर मोठ्ठा नाही असंच...

पवनला भेटले. पवन राज्यातली पहिली ट्रानस्जेंडर वकील. अॅड डॉ पवन यादव. इथपर्यंत पोहचणं सोपं नव्हतं तिच्यासाठी. ती जेव्हा कुटुंबासाठी आणि आपल्यासाठी तो होती तेव्हा तिचा स्वत:शीच लढा सुरु होता. तिला कळून चुकलेलं आपल्या आत सुरु असलेला लढा आपल्याला जिंकायचाय पण समाज, घर, जिच्या पोटी जन्म घेतलाय तीसुद्धा आपल्या विरोधात जाणार हे तिला माहित होतं. त्यामुळे तिनं मनाची पक्की तयारी केलेली. पण आपण सगळ्यांपेक्षा वेगळे आहोत हे स्वत मान्य करणं आणि समाजाला सांगणं या दोन्हीत खूप फरक आहे. त्यामुळे तिनं चंग बांधला आधी शिक्षण पूर्ण करायचं. काहीतरी ठोस हाती आल्याशिवाय तोंड उघडायचं नाही. जेव्हा तिनं सगळ्यांना ती 'तो' नाही 'ती' आहे हे सांगितलं तेव्हा मित्रांचं म्हणणं, 'अरे तुने कभी बताया नही...’ त्यावर पवनचं उत्तर विचार करायला लावणारं होतं... 'अगर तुम लोगोको पता चलता तो तुम मेरी क्या हालत करते, मुझे मोलेस्ट नही करते...?'

कधी रिक्षात बसावं तर रिक्षावाला मिररमधून सतत न्याहाळतो, रिक्षातून उतरताना बेधडकपणे तुझे बुब्ज दाबु दे म्हणतो. हा अपमान सहन करत राग गिळत तिनं आज स्व:ताला सिद्ध केलंय,. तरीही आपल्या लेखी तिची ओळख ट्रान्सजेंडरच.. ती विचारते समाजाला... 'माझ्या शिक्षणाला काय अर्थ जर तुम्हाला मी ट्रान्सजेंडरच दिसत असेल तर? तुमच्या लेखी माझ्या कामाला महत्त्व नाही का?

तिला कुणी काम द्यायला तयार नसतं. पण त्या रिक्षावाल्यासारखे अनेक भेटतात त्यांची एकच डिमांड असते. 'ये! झोप मी पाचशे देतो.’ हे ऐकुन मी अवाक झाले. पवन म्हणते 'तुम्ही जर मला अर्ध्या तासात पाचशे रुपये देणार असाल तर मी कशाला करेन ना काम...? तुम्ही आम्हाला हे काम करायला भाग पाडता. तुम्ही आम्हाला वेश्या व्यवसायात ढकलता. आमची इच्छा असो वा नसो...’
तिचं बोलणं ऐकून माझे डोळे अक्षरश पाणावले. काय बोलावं कळेच ना.

मी सहजच तिला विचारलं मनातून सतत स्त्रीत्वाची जाणिव होते मग आपण एखादं मुलं दत्तक घ्यावं असं नाही वाटतं? त्यावर पवननं मार्मिक उत्तर दिलं, 'एक दिवस असा येईल की जेव्ही कोर्ट आम्हाला म्हणेल तुम्ही मुलांचं छान संगोपन करू शकता. तुम्हालाही मुल दत्तक घेण्याचा अधिकार आहे.'

पवनचं काम मोठं आहे. सर्वसामान्यांच्या केस लढत असतानाच पवननं ट्रान्सजेंडरसाठी स्वतंत्र शौचालयाचा लढा दिला. ट्रान्सजेंडर वेलफेअर बोर्डसाठी प्रत्येक राज्यात प्रयत्न व्हायला हवेत असं पवन पोटतिडकीनं सांगते. राज्यातली ती पहिली ट्रान्सजेंडर वकील. लवकरच राज्यातली पहिली ट्रान्सजेंडर पोलीसही आपल्याला दिसेल. पण करियरमधल्या अचिव्हमेंट्स त्यांना फक्त सुख देतात. समाधान, आनंद, पूर्णत्वाची जाणिव फक्त कुटंब आणि आपण देऊ शकतो. त्यासाठी आपण पुढाकार घ्यायला हवा. पवननं ट्रान्सजेंडर समाजासाठी लढा द्यायचा निर्णय घेतलाय. त्यासाठी ती झटतेय. समाजातला एक घटक असूनही आपण त्यांना का नाकारतो या प्रश्नाचं उत्तर पवनला हवंय. तिला आपल्याकडून फार काही नकोय फक्त हवाय मोकळा श्वास घेऊन जगण्याचा अधिकार जसं आपण जगतो तसं तिलाही मनमोकळं जगायचंय. कुणी तिच्याकडे तुच्छ नजरेनं पाहु नये. तिला झोपायला बोलावू नये. तिला वेगळ्या शौचालयासाठी गयावया करावी लागू नये. बास...

याउपर मलाही लिहिणं शक्य होत नाहीये. तिच्याशी बोलून तिच्या व्यथा जाणल्या असं म्हणण्यापेक्षा तिच्याशी बोलून समाज म्हणून आपल्याकडून होत असलेल्या चुका प्रकर्षानं दिसल्या, असं म्हणेन.
थोडा वेळ थांबते. माही, पवनचीच सहकारी तिच्याविषयी लिहिन पुढच्या भागात. पण हे वाचून शांत बसू नका अशा अनेक पवन आसपास आहेत त्यांना आपल्यात कसं सामावून घेता येईल याचा विचार करुया. बघा कसं जमतंय. 

SOCIAL MEDIA ACCOUNTS:

TWITTER: https://twitter.com/suvarnayb

FACEBOOK:  https://www.facebook.com/suvarnamdhanorkar

FACEBOOK PAGE:  https://www.facebook.com/suvarnadhanorkarofficial

INSTAGRAM:  https://www.instagram.com/suvarnadhanorkar/

KOO: @suvarnad

(विशेष नोंद : वरील माहिती ही बातमी नसून ब्लॉग आहे. ब्लॉगमधील मतं लेखिकेची वयक्तिक मते आहेत आहेत.)