#तो_उध्वस्त_जीव .... सोशल मीडियावर व्हायरल

#तो_उध्वस्त_जीव म्हणाला "१० ला दोन..."  मी म्हंटलं, "नाही, १० ला एकच..." हा चेहरा नीट निरखून बघा... त्याचा 

Updated: Dec 11, 2020, 03:57 PM IST
 #तो_उध्वस्त_जीव .... सोशल मीडियावर व्हायरल

#तो_उध्वस्त_जीव म्हणाला "१० ला दोन..."  मी म्हंटलं, "नाही, १० ला एकच..." हा चेहरा नीट निरखून बघा... त्याचा अवतार बघा... त्याचा उन्हातान्हात रापलेला चेहरा बघा... चेहऱ्यावरील रेषा बघा... आणि डोळ्यांतील ते करुण भावही बघा....आपोआप त्याची दशा लक्षात येईल...

काल सकाळी, फक्त ५ रूपयांच्या ताज्या, करकरीत, देशी वाण असलेल्या तांदूळश्याच्या पेंडीचे मी मुद्दाम १० रूपये देवू केल्यानंतर आनंद, दुःख, यातना, कौतुक आणि आश्चर्य असे मिश्र भाव त्याला लपवता आलेच नाहीत... आणि डोळ्यांत सुध्दा हलकेच पाणी तरळलं... 

रात्रंदिवस काबाडकष्ट उपसणारे ते हात..! तेच हात जोडले त्या जीवाने मला... खरंतर मी त्याचे पायच धरायला हवे होते... अहो, आपल्या पिढ्यान् पिढ्यांवर उपकार करत आलाय तो... त्याच्या चेहऱ्यावरील एकच क्षणाचा का असेना पण, तो आनंद बघून मला समाधान वाटले... 

बघून शेजारचा बागवान भाजी विक्रेता म्हणाला, "आपने नेक काम किया..." मी त्याला म्हंटलं, अरे हे एवढेच आणि नेक...? नाही, त्याच्यासमोर शून्यच आहे सगळे..."

शेतकऱ्यांची परिस्थिती खरोखर  खूपच अवघड आहे... आणि फक्त शेतकऱ्यांचीच ती आहे... आपला अन्नदाता म्हणतो आपण त्याला... त्याने नाही पिकवलं तर काय खाणार ? रोज उठून खून पडातील अन्नासाठी...  मार्च/एप्रिल/मे च्या लॉकडाऊन मुळे आख्ख्या घरादाराने, 24/24 तास राबून, तयार केलेला माल, अगदी ऐनवेळी शेतकऱ्यांना कुठेही पाठवता आला नाही... 

ते कष्टाचे सोने तसेच्या तसेच शेतातच कुजले, नासून गेले... पोटच्या नुकत्याच जन्मलेल्या लेकराने मान टाकावी अशा अत्यंत विमनस्क अवस्थेत शेतकरी त्या सोन्याकडे बघून टिपं गाळण्याशिवाय काहीही करू शकला नाही... आणि जे शेतकरी माल पाठवू शकत होते, त्यांना तो माल अक्षरशः कवडीमोलाने द्यावा लागला... इतके की, घरी माघारी परतण्यासाठी गाडीभाड्याला त्याकडे पैसा नसायचा... जसं काही इतरांना पुरवण्यासाठीच फक्त आख्खं घरदार रात्रंदिवस राबलंय....

जून महिन्यात पाऊस वेळेवर पडला म्हणून पुन्हा एकदा नव्या दमाने बिचाऱ्याने पुन्हा पेरणी केली तर, 80% बियाणेच बोगस निघाली... झाली का कुणाला अटक या बोगस बियाणे प्रकरणात ??? अरे, शेतकऱ्यांशी, म्हणजेच आपल्या अन्नदात्याशीच ही गद्दारी ???

एक दिवस नक्कीच उपाशी मरणार आहोत आपण.... आपली लायकीच ती आहे... असतील कुणी पैसेवाले, तर काय नाण्यांची उसळ आणि नोटांची भाकरी खाणार आहात का ???
जुलै आणि आॕगस्ट महिन्यात तशाही परिस्थितीत कशाबशा केलेल्या पेरणीमुळे जे उगवले, तेही तेव्हा पाऊसच नंतर न आल्याने पावसा अभावी करपायला लागले... अहो किती पिळवणूक चारी बाजूंनी त्या दीनवाण्या कष्टकरी जीवाची....!!! 

काय करायचे या जीवाचे ? या #शापित जीवाने अन्न-धान्य पिकवायचे तरी कसे....? यांना खरंचंच कुणीच वाली नाही का आजही ???
सप्टेंबर जरा बरा गेला तोच, आॕक्टोबर मध्ये प्रचंड पावसाने सगळीकडे पूर आले, आणि जोमात वाढलेली उभी पिके आडवी होऊन शिवारासकट वाहून गेली... खरंचंच माझ्याकडे या दीनवाण्या जातीसाठी लिहायला आता शब्दच उरलेले नाहीत.... मी निःशब्द झालेय.....

जगात कुठलीही विपरीत परिस्थिती निर्माण झाली की, मरतो, खपतो, संपतो फक्त अन्नदाता ! वाईट आहे हे...अतिशय वाईट आहे... 

खरिप हातचा गेलाच होता... रब्बी अर्धाआधिक गेला... काही जमिनीत आजही पेरण्या करता येत नाहीयेत...  डाळी, कडधान्ये, तेलबिया, कापूस महाग होणार... आणि त्यावर तयार होणारी उत्पादनेही महाग होऊन, एक दुष्टचक्रच तयार होणार... ज्यात फक्त सामान्य जनता आणि बळीराजा भरडून निघतात....

आत्महत्या उगाचच होत नाहीत... कुणाला आपला जीव प्यारा नसतो...?
कुणीतरी काहीतरी करायला हवेय या हातांसाठी... जास्त देवू नकात, त्याला नकोच आहे जास्त काही... पण भावही करू नकात... भाव पाडून मागू नकात... एवढेच सांगणे आहे...

#शिल्पांकित____
शिल्पा गावडे (हा लेख सोशलमीडियावरुव झी २४ तासने घेतला आहे)