जयवंत पाटील, झी मीडिया, मुंबई : यूट्यूब चॅनेल सुरू करून लाखो रूपये कमवण्याचं स्वप्न आजच्या पिढीतले मुलं पाहत आहेत, साधारणत: 15 ते 25 वयोगटातील बहुतांश मुलांमध्ये यूट्यूबर होण्याचं स्वप्न आहे.
यात तरूणांना साथ लाभतेय, ती त्यांच्या मोबाईल फोनची. पण यूट्यूबर म्हणून करिअर निवडण्याआधी काही महत्वाच्या गोष्टी निश्चित तुम्हाला माहिती असणे अत्यंत गरजेचे आहे, याशिवाय तुम्ही यशस्वी यूट्यूबर होणे कठीण आहे.
यूट्यूबची मालकी ही गुगलकडे आहे, तेव्हा यूट्यूबवरील कॉपीराईटचे नियम देखील अतिशय कडक आहेत. तुम्ही जर या विचारात असाल की, दुसऱ्याचे व्हिडीओ, व्हॉटसअॅपवरचे व्हिडीओ आणि दुसऱ्यांचं म्युझिक वापरून, ते व्हिडीओ यूट्यूबवर अपलोड करून, आपण लाखो रूपये कमवू शकतो, तर असा विचार मनातून वेळीच काढून टाका. या भ्रमात कधीही राहू नका.
तुम्ही दुसऱ्याचे व्हिडीओ वापरले, तर व्हिडीओ अपलोड झाल्यानंतर, तुम्हाला दुसऱ्या क्षणाला यूट्यूबकडून मेसेज येईल. हा दुसऱ्याचा व्हिडीओ आहे, तो काढून टाका, तसेच हा नेमका कुणाचा व्हिडीओ आहे, हे देखील तुम्हाला सांगितले जाईल.
यानंतरही तुम्ही यूट्यूबच ऐकलं नाही, तर जेव्हा असे तुमचे 3 व्हिडीओ होतील, तेव्हा यूट्यूबची करडी नजर तुमच्यावर असेल. तुमच्यावर ज्यांचा व्हिडीओ आहे, त्यांनी दावा केला, तर याची सूचना तुम्हाला मेलने देण्यात येते.
यापैकी असे 3 दावे तुमच्या नावाने आल्यास, तुमचं यूट्यूब चॅनेलचं अपलोडिंग बंद होईल. एका क्षणी तुमचं चॅनेल आहे कुठे हे देखील तुम्हाला सापडणार नाही. एवढंच नाही, तुमचं चॅनल यूट्यूबकडे काळ्या यादीत जाईल, आणि तुम्हाला जाहिरातींचा पैसा देखील अत्यल्प मिळेल. अत्यल्प म्हणजे काहीच नसल्यासारखं ते असेल. मात्र तुम्ही नियम पाळले तर तुमचं श्रीमंत होण्याचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं.
पुढील भागात आम्ही सांगू चुकूनही तुम्हाला कॉपी राईट लागू नये म्हणून काय करता येईल, यूट्यूबने तुम्हाला भरभरून मोबादल्यात पैसे द्यावेत म्हणून काय करता येईल, आणि एक चांगले यूट्यूब चॅनेल कसे सुरू करता येईल.