जयवंत पाटील, झी मीडिया, मुंबई : राज्यातील जिल्हा परिषद शाळांच्या इमारती बहुतांश, या इंग्रजांच्या काळात बांधण्यात आल्या, या इमारतींची छपरं ही कौलारू आहेत. या इमारतींच्या भिंती आजही भरभक्कम आहेत, काही इमारतींच्या भिंती बांधतांना दगडाचा वापर करण्यात आला आहे, तर काही बांधकाम विटा वापरून असलं तरी आजही ते मजबूत आहे.
कौलारू छप्पर असल्याने या शाळांच्या वर्गात वातावरण थंड राहण्यास मदत होते. कौलारू इमारतीत शिक्षक जेव्हा लहान बालकांना शिकवत असतात, तेव्हा शिक्षक नेमकं काय बोलतायत, विद्यार्थ्यांना स्पष्टपणे ऐकू जाते, आवाज कंप पावत नाही, किंवा वर्गात घुमत नाही. इयत्ता पहिली ते चौथीच्या मुलांना शिक्षकाचा आवाज स्पष्टपणे कानावर जाणे आवश्यक असते.
जिल्हा परिषद मराठी शाळांच्या बहुतांश जुन्या इमारती या पूर्व-पश्चिम अशा बांधण्यात आल्या आहेत. या इमारतीच्या खिडक्या-दरवाजे हे दक्षिण आणि उत्तर दिशेला येतात. शाळेतील वातावरण थंड रहावं, प्रकाश व्यवस्थित वर्गात यावा, यासाठी हा प्रयत्न असावा. कौलारू छप्पर हे तीनही ऋतूत इमारतीतील वातावरण सर्वसामान्य ठेवण्यास मदत करते, या उलट पत्राच्या खोलीत आजार होतात, असं म्हटलं जातं.
राज्यात अनेक कौलारू इमारती ६० ते ७० वर्षापासून कौल न बदलता तशाच डौलात उभ्या आहेत. या कौलारू इमारतींच्या छपराखाली गावातील चौथी पिढी दिमाखात शिक्षण घेत आहे. काही गावांमध्ये शाळांवर गावकऱ्यांचं लक्ष नसल्याने तोडफोडीचे प्रकार होत आहेत. कौलांखालील स्ट्रक्चर हे सागवानी लाकडांचं आहे. आता हे स्ट्रक्चर रंगरंगोटी वेळेवर न झाल्याने, पावसाळ्यापूर्वी दुरूस्ती न झाल्याने काही ठिकाणी खराब होत आहे.
मात्र शाळा दुरूस्तीला आल्यानंतर काही जिल्हा परिषदेचे इंजीनिअर्स जे स्ट्रक्चरल ऑडीट करून, शाळा दुरूस्तीचं इस्टीमेट बनवतात, ते आता अशा शाळांची वाट लावत आहेत. विदर्भ, खान्देश आणि मराठवाडा आणि कोकणात हा प्रकार सर्रास सुरू आहे.
शाळा दुरूस्तीचं इस्टीमेट बनवताना, कौलं मिळत नाहीत, सरकार लाकूड वापरण्याच्या विरोधात आहे, असं तोंडी सांगून राजकीय पुढारी, तसेच गावकऱ्यांना गंडवतात, आणि कौलं हटवून या ठिकाणी पत्रा बसवतात. ज्या ज्या गावांमध्ये पत्रा बसवला जातो, तो ३ वर्षापेक्षा जास्त काळ टिकत नाही.
पत्रा बसवण्याचा खर्च हा कौलं टाकण्यापेक्षा किती तरी पट जास्त आहे. खान्देश, मराठवाडा, विदर्भाच्या अनेक भागात तापमान ४५ अंश सेल्सिअसच्या पुढे जाते. या इमारतीत प्रचंड गरम होत असल्याने, अशा उष्ण वातावरणात विद्यार्थी कसेतरी बसतात. शिक्षक शिकवतात, तेव्हा त्यांचा आवाज पत्र्याच्या छपराखाली कंप पावतो. याच वयात त्यांच्या कानावर स्पष्टपणे शिक्षकांचे बोल पडणे आवश्यक असतं, पण पत्र्याच्या शाळांमध्ये ते शक्य होत नाही. पावसात तर पत्राचा आवाज एवढा असतो की, शिक्षक आणि विद्यार्थ्यांना तो आवाजचं ऐकत बसावं लागतं.
काही इंजीनियर्स शाळांवर पत्रा टाकण्याचा घाट का घालतात? याची काही प्राथमिक कारणं दिसून येतात. कमी प्रतीचा पत्रा वापरून भरपूर पैसा वाचवता येता, सरकारचा नाही कंत्राटदाराचा. शाळेच्या इमारतीचं जुनं सागवान लाकूड प्रचंड महागात विकलं जातं, जे खराब झालं सांगून, कामात नसल्याचं दाखवलं जातं. आर्थिक फायद्यासाठी हा प्रकार होत असल्याचं सांगण्यात येतं.
या उलट जुन्या पण शाळेच्या मजबूत भिंती, ज्या पावसाच्या पाण्याने सर्दावलेल्या आहेत. तेथे सिमेंट प्लास्टर, तसेच वॉटर प्रुफ केमिकल वापरून दुरूस्त करणे आवश्यक आहे. कौलांखालील लाकडी स्ट्रक्चर आणखी मजबूत करता येतं, ग्रामीण भागात आजही मोठ्या प्रमाणात जुनी लाकडं मोठ्या प्रमाणात मिळतात, त्यातून चांगली दुरूस्ती होवू शकते.
मजबूत सपोर्टसाठी लोखंडाचाही वापर होवू शकतो. एकंदरीत स्ट्रक्चरल ऑडीट न करताच, सरळसरळ इंजीनिअर्स पत्रा ठोकण्यावर भर देतात असं दिसून येत आहे. कौलं ही सहज उपलब्ध आहेत, यात मंगलोरीयन कौलं वापरूनच या शाळा बनवण्यात आल्या आहेत.
जुन्या इमारतीचं कौल तोलुन धरण्याचं स्ट्रक्चर मजबूत केलं, दुरूस्त करून रंगरंगोटी केल्यास त्या छपराचं आणखी ५० वर्षे आयुष्य वाढू शकतं, मात्र पत्रा ३ वर्षही जात नाही, आणि उन्हाचा आणि आवाजाचा त्रास हा वेगळाच असतो. काही ठिकाणी वादळाने पत्रा उडून जाणे, गळणे हे प्रकार लगेच सुरू होतात.
याकडे राज्य सरकारने लक्ष घालून ज्या इमारतींच्या भिंती मजबूत आहेत, तसेच जुन्याकाळी ज्या शाळांची छपरं कौलारू होती, ती पुन्हा कौलारूच झाली पाहिजेत यावर भर दिला पाहिजे. इंग्लिश मीडियमचा राज्यात पेव फुटला असला, मराठी शाळेत आजही विद्यार्थ्यांची संख्या एवढी कमी झालेली नाही, उलट काही सजग पालक पुन्हा आपल्या पाल्यांना मराठी शाळेत टाकत आहेत. तेव्हा आपण मराठीकडे परतण्याआधी, शाळेच्या इमारती देखील मजबूत असणे आवश्यक आहे.
ज्या शाळांच्या इमारतींवर पत्रा टाकण्यात आला आहे, ते कोंबड्यांचे खुराडे झाले आहेत, कारण या पत्राखाली कोंबल्यासारखं होवून लहान मुलांना प्रचंड गरम होतं, न कळत का असेना आपण त्या बालकांचा 'बालहक्क' हिरावून घेत आहोत, असं वाटतं.
सर्व शिक्षा अभियानाखाली बांधल्या जाणाऱ्या नव्या इमारती तर आणखी विचित्र आहेत, या जुन्या शाळांच्या आधी पडक्या आणि गळक्या होतात, वातावरण आणि या शाळांची उंची पाहून तुम्हाला या शाळा जेल असल्यासारख्या वाटतात.
सरकारने याबाबतीत वास्तूतज्ञांचा सल्ला घेऊन, जुन्या शाळांच्या बाबतीत दुरूस्तीचे, तसेच नव्या शाळेचं बांधकाम कसं असेल, मुलांसाठी ते किती सोयीचं असेल, वातावरण किती थंड असेल, किती इको-फ्रेंडली असेल याचा विचार करून धोरण ठरवणे आवश्यक आहे.