महाराष्ट्र सरकार हे गुजरातच्या दावणीला, मराठीबाबत उदासीन - राष्ट्रवादी

राज्य सरकारकडून छापाई करण्यात आलेल्या सहावीच्या भूगोलाच्या पुस्तकात चक्क सात ते आठ पाने गुजराती भाषेतून छापण्यात आली आहेत.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Jul 13, 2018, 05:00 PM IST
महाराष्ट्र सरकार हे गुजरातच्या दावणीला, मराठीबाबत उदासीन - राष्ट्रवादी

मुंबई  :  राज्य सरकारकडून छापाई करण्यात आलेल्या सहावीच्या भूगोलाच्या पुस्तकात चक्क सात ते आठ पाने गुजराती भाषेतून छापण्यात आली आहेत. ही बाब विधिमंडळात राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे आणि विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून दाखवून दिली. त्यानंतर राष्ट्रवादीने भाजप आणि राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल चढवलाय. महाराष्ट्र सरकार हे गुजरातच्या दावणीला बांधले गेले असून ते मराठीबाबत उदासीन आहे, अशी टीका राष्ट्रवादीने केलेय.

 रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यात शासनाच्यावतीने छापण्यात आलेल्या इयत्ता सहावीच्या भूगोलाच्या पुस्तकात ७-८ पाने गुजराती भाषेत छापली गेल्याचा भोंगळ कारभार समोर आला आहे. यातून मराठी भाषेविषयी सरकारची उदासीनता दिसून येत आहे. सरकार गुजराती भाषेचे तुष्टीकरण करत आहे, असा हल्लाबोल राष्ट्रवादीचे नेते आमदार सुनील तटकरे यांनी केला.

मुंबईतील डायमंड मार्केट, कापड मार्केट, बीकेसीमधील कार्यालये, एअर इंडियाचे कार्यालय गुजरातला हलवण्याचा घाट भाजप-शिवसेना सरकारने घातला. आता पुस्तके गुजरातीत छापण्याचा पराक्रमही सरकारकडून केला जात आहे. सरकारचा शिक्षणाविषयीचा दृष्टिकोन यातून स्पष्ट होतो, असे सांगत राष्ट्रवादी याचा आम्ही निषेध करीत असल्याचे प्रतिपादन सुनील तटकरे यांनी केले.

दरम्यान, शासनाकडून छापण्यात आलेल्या सहावीच्या भूगोलाच्या पुस्तकात काही पाने गुजराती भाषेत छापली गेल्याचे समोर आले आहे. या प्रकारामुळे महाराष्ट्रातील भाजप आणि महाराष्ट्र सरकार हे गुजरातच्या दावणीला बांधले गेले आहेत, हे यातून स्पष्ट होते, अशी खरमरीत टीका विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली.