ओला दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या फी माफीसाठी 'झी २४ तास'ची मोहीम

दुष्काळग्रस्त आणि पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांच्या फी माफीचा निर्णय लवकरच...

Updated: Nov 5, 2019, 06:01 PM IST
ओला दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या फी माफीसाठी 'झी २४ तास'ची मोहीम   title=

दीपाली जगताप-पाटील, झी २४ तास, मुंबई : ओला दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना फी माफी देऊन दिलासा देण्यासाठी 'झी २४ तास'नं अभियान सुरू केलंय. या अभियानाची दखल घेत मुंबई विद्यापीठानं घेतलीय. दुष्काळग्रस्त आणि पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांच्या फी माफीचा निर्णय लवकरच घेणार असल्याची माहिती मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांनी दिलीय. विद्यापीठात सुरु असलेल्या सीनेट बैठकीत कुलगुरूंनी हे आश्वासन दिलंय. मॅनेजमेंट काऊन्सिल बैठकीत हा निर्णय घेण्यात येणार आहे. 'झी २४ तास'च्या बातमीनंतर मुंबई विद्यापीठातल्या ओला दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळालाय.

अवकाळी पावसानं राज्यात शेतीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहेच, पण आता शेतकरी कुटुंबातल्या मुलांच्या शिक्षणावरही हा पाऊस उठलाय. विद्यापीठांमध्ये शिक्षण घेणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना फी कशी भरायची? हा प्रश्न अनेक विद्यार्थ्यांप्रमाणेच मुंबई विद्यापीठात 'मास्टर्स इन कम्प्यूटर सायन्स'च्या दुसऱ्या वर्षाला शिकणाऱ्या मनोज हायगले या विद्यार्थ्यालाही सतावतोय. मनोज मुळचा नांदेड जिल्ह्यातला... सोयाबीन, तूरीच्या शेतीवरच घर चालतं... अतीवृष्टीनं पीक हातचं गेलं... कम्प्यूटर सायन्सची फी ३५ हजार रुपये, परीक्षा फी सहा हजार रुपये, वसतीगृह फी साडे सहा हजार रुपये... आता एवढा खर्च या परिस्थितीत कसा परवडणार? या प्रश्नानं मनोजचं शिक्षणात लक्ष लागेनासं झालंय.

'विद्यापीठाची अर्धी फी भरलीय. पण १५ हजार रुपये कॉलेजमध्ये द्यायचे आहेत. जेवणासाठी मेसचा खर्चही रोजचा आहेच... घरातलं सोनं विकण्याशिवाय काहीही पर्याय समोर दिसत नाही' असं म्हणत मनोजनं आपली व्यथा 'झी २४ तास'समोर बोलून दाखवली.

अशीच परिस्थिती सौरभची... सौरभ खाडे हा विद्यार्थी 'फीजिक्स'मधून एमएससी करतोय. तो पूरग्रस्त कोल्हापूरचा... त्यांच्या घरच्या शेतीत लावलेला सगळा ऊस पाण्याखाली जाऊन कुजला. हा तोटा लगेच भरुन निघणारा नाही. शिक्षण पूर्ण केलं नाही तर नोकरीचीही हमी नाही. 'कुटुंबात इतरही भावंडं शिक्षण घेत आहेत. सगळ्यांचा खर्च आहे. नोकऱ्याही नाहीत. विद्यापीठाने फी माफ केली तर वर्ष पूर्ण होईल' असं सौरभ म्हणतोय.

मनोज, सौरभसारखे शेकडो विद्यार्थी या दुष्टचक्रात अडकले आहेत. सरकारकडून १० हजार कोटींची मदत जाहीर झालीय. मात्र त्यात शेतकऱ्यांच्या मुलांच्या शैक्षणिक खर्चाचा समावेश सध्यातरी नाही. त्यामुळे राज्यभरातील विद्यापीठांनी याचा विचार करावा आणि शुल्क माफ केलं जावं, अशी मागणी केली जातेय. अद्याप तरी याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आला नसल्याची माहिती मुंबई विद्यापीठानं दिलीय.

केवळ मुंबई विद्यापीठातच नव्हे तर राज्यातील सर्व विद्यापीठांमध्ये दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांची फी माफ करण्याची मागणी होतेय. त्यामुळे राज्य सरकारनेच सर्व विद्यापीठांना योग्य त्या सूचना देण्याची गरज आहे.