close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

'भारत' चित्रपटाचा व्यवसाय वाढता वाढता वाढे!

चित्रपट १०० कोटींच्या घरात पोहोचण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.  

Updated: Jun 9, 2019, 09:34 AM IST
'भारत' चित्रपटाचा व्यवसाय वाढता वाढता वाढे!

मुंबई : अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री कतरिना कैफ स्टारर 'भारत' हा चित्रपट ५ जून रोजी प्रदर्शित करण्यात आला. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच मुसंडी मारली. चित्रपट प्रदर्शित होताच तिसऱ्या दिवशी चित्रपटाने ९६ कोटींच्या घरात पोहोचला आहे. चाहत्यांमध्ये असणारं सलमानचं वेड आणि त्याला ईदचं निमित्त याचा फायदा चित्रपटाला झाला. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी चित्रपटाने जवळपास ४२ कोटी रूपयांचा गल्ला जमवला होता. 

ट्रेड अॅनलिस्ट तरण आदर्श यांनी सोशल मीडिच्या मध्यमातून चित्रपटाच्या कमाईचा आकडा जारी केला आहे. सलमानच्या 'भारत' चित्रपटाने बुधवारी ४२.३० कोटी रूपयांचा गल्ला जमवला, गुरूवारी चित्रपटाने ३१ कोटी जमवले, तर शुक्रवारी चित्रपटाचा वेग मंदावलेला दिसला. शुक्रवारी चित्रपटाने २२.४० कोटींची कमाई केली. तर तीन दिवसात चित्रपटाने ९५.५० कोटींपर्यंत मजल मारली. तर सलग पाचव्या दिवशी चित्रपट १०० कोटींच्या घरात पोहोचण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.    

यंदाच्या वर्षी पहिल्याच दिवशी दमदार ओपनिंग करणाऱ्या चित्रपटांपैकी सलमानचा 'भारत' चित्रपट दुसऱ्या क्रमांकावर आहे, तर पहिल्या क्रमांकावर अभिनेता अमिर खान आणि अभिनेत्री कतरिना कैफ यांच्या मुख्य भूमिका असणारा 'ठग्ज ऑफ हिंदोस्तान' हा चित्रपट आहे. 'ठग्स...'ने प्रदर्शनानंतर पहिल्याच दिवशी ५२ कोटी रूपयांचा गल्ला जमवत मजल मारली होती. 

गेल्या काही वर्षांपसून सलमानचा प्रत्येक चित्रपट ईदच्या मुहूर्तावर रूपेरी पडद्यावर प्रदर्शित होतो. २००९ साली प्रभुदेवा दिग्दर्शित 'वॉन्टेड' चित्रपटापासून ते नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'भारत' चित्रपटापर्यंत सलमानचे सर्व चित्रपट ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित करण्यात आले आहेत जे मोठ्या प्रमाणात यशस्वीसुद्धा ठरले आहेत. त्यामुळे ईद आणि सलमानचे चित्रपट हे समीकरणही आता चाहत्यांच्या सवयीचं झालं आहे.