मुंबई : मुंबई हल्ल्यावेळी शेकडो मुंबईकरांचे प्राण वाचवणाऱ्या छोटू चायवाला याच्या जीवनावर आता सिनेमा येतोय. या हल्ल्यावेळी मोहम्मद तोफीक शेख उर्फ छोटू चायवाला हा सीएसएमटी स्थानकावरील एका तिकीट खिडकीवरच नेहमीप्रमाणे चहा घेऊन उभा होता. त्यावेळी सगळ्यात आधी कसाब-इस्माईलचा छोटू चायवालाशी आमनासामना झाला. यावेळी कसाबने शिवीगाळ करत छोटू चायवालावर गोळीबारही केला.
छोटू चहावाल्या समोरच कसाबने एका चिमुकलीवर गोळी झाडली. हे पाहून छोटू तडक बाहेर गेला आणि त्याने बाहेर भीतीने सैरावैरा धावणाऱ्या नागरिकांना जवळच असलेल्या रेल्वेच्या आरामकक्षात नेले.
समोर साक्षात मृत्यू उभा असतानाही जीवावर उदार होऊन शेकडो मुंबईकरांचे प्राण वाचवले. त्याच्या या शौर्याचं त्यावेळी कौतुकही झालं. सरकारने त्याला नोकरीचं आश्वासनही दिलं. मात्र, मागील दहा वर्षात त्याची पूर्तता झाली नाही.
आता याच छोटूच्या असामान्य शौर्यावर आधारित 'टीमॅन' हा चित्रपट रसिकांच्या भेटीला येणार आहे.