पणजी : गोव्याच्या ४८ व्या इफ्फी महोत्सवात मराठीचाच बोलबाला दिसून आलाय. इंडियन पॅनोरामात तब्बल अकरा मराठी सिनेमे दाखविण्यात येणार आहे. राज्य शासन सहा सिनेमांचे प्रमोशन करणार आहे.
सिनेमांचा महाकुंभ असणाऱ्या भारताच्या ४८ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अर्थात गोवा इफ्फीत देशाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या इंडियन पॅनोरमाला विशेष महत्व असतं या विभागात प्रथमच बंगाली आणि मल्ल्याळम चित्रपटांना टक्कर देत तब्बल ११ मराठी चित्रपटांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे निश्चितच हा मराठी चित्रपट सृष्टीचा सन्मान आहे .
याशिवाय राज्य शासन अन्य सहा चित्रपटांचं प्रमोशन करणार असल्यानं यंदा गोवा इफ्फीत उच्चांकी १७ चित्रपटांचं प्रदर्शन होईल. मागील वर्षी या विभागात मराठीतील चार सिनेमे आणि तीन लघुपटांचा यात समावेश होता .
भारतीय सिनेसृष्टीतलं वैविध्य प्रतिबिंबीत करणारा विभाग म्हणजे इफ्फीतील इंडियन पॅनोरमा. इफ्फीच्या आंतरराष्ट्रीय व्यासपिठावर प्रादेशिक सिनेमांना संधी देण्याचे काम हा विभाग करतो.
यंदा या विभागात कासव , व्हेंटीलेटर ,रेडू ,इदाक, पिपंळ ,मुरंबा ,क्षितिज ए हॉरीझॉन या चित्रपटांचा समावेश करण्यात आला आहे तर खिडकी आणि बलुतं या लघुपटांचा समावेश यावेळी असणार आहे. याशिवाय राज्य शासन फिल्म बाजारमध्ये शासनाच्यावतीने सहा चित्रपटांचं प्रोमोशन करण्यात येणार आहे.