70 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा शुक्रवार 16 ऑगस्ट रोजी भारताच्या माहिती आणि प्रसारण विभागाकडून करण्यात आली. 70 वे राष्ट्रीय पुरस्कार हे वर्ष 2022 रोजी प्रदर्शित झालेल्या चित्रपटांसाठी आहेत. यात वाळवी या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट म्हणून पुरस्कार जाहीर झाला. यासोबतच 'मरमर्स ऑफ द जंगल' याला सर्वोत्कृष्ट माहितीपटाचा पुरस्कार जाहीर झाला. मराठी चित्रपटांना राष्ट्रीय पातळीवर पुरस्कार मिळाल्यामुळे कलाकारांकडून आनंद व्यक्त केला जात आहे.
परेश मोकाशी यांनी वाळवी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून यात अनिता दाते, स्वप्नील जोशी आणि सुबोध भावे हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. मराठी चित्रपट वगळता 70 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये 'गुलमोहर' हा सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट ठरला आहे. तर सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट म्हणून 'कांतारा' या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. तर सर्वोत्कृष्ट कन्नड चित्रपट म्हणून 'केजीएफ 2' या चित्रपटाला पुरस्कार जाहीर झाला आहे.
70 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा झाली असून यात 'कांतारा' या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचं पारितोषिक ऋषभ शेट्टी याला मिळालं आहे. तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचं पारितोषिक विभागून देण्यात आलं असून अभिनेत्री नित्या मेनन हिला 'तिरुचित्रंबलम' करता तर मानसी पारेख हिला कच्छ एक्स्प्रेस चित्रपटासाठी मिळालं आहे. सर्वोत्कृष्ट बालकलाकारचं पारितोषिक 'मलिकप्पुरम' चित्रपटासाठी श्रीपथ हिला देण्यात आले आहे. 'ऊंचाई' या हिंदी चित्रपटासाठी जेष्ठ अभिनेत्री नीना गुप्ता यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार जाहीर झाला आहे. तर फौजा या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार पवन राज मल्होत्रा यांना घोषित करण्यात आलेला आहे. तर सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार 'ऊंचाई' या चित्रपटासाठी सूरज बड़जात्या यांना जाहीर झाला. सर्वोत्कृष्ट AVGC चित्रपटाचा पुरस्कार हा 'ब्रम्हास्त्र' ला घोषित करण्यात आलेला आहे.
संगीत विभागातील राष्ट्रीय पुरस्कार सुद्धा शुक्रवारी जाहीर करण्यात आले. यात प्रीतम यांना 'ब्रम्हास्त्र' चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट संगीतकारचा पुरस्कार जाहीर झालेला आहे. तर लोकप्रिय गायक अरिजित सिंह याला 'ब्रम्हास्त्र' या हिंदी चित्रपटाच्या 'केसरीया' या गाण्याकरता सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकाचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झालेला आहे. तर सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिकेचा पुरस्कार 'सऊदी वेल्लाक्का' या चित्रपटासाठी बॉम्बे जयश्री हिला मिळालेला आहे.